प्रबोधनात्मक उपक्रमांनी ‘बार्टी’तर्फे विद्यार्थी दिन साजरा

प्रबोधनात्मक उपक्रमांनी ‘बार्टी’तर्फे विद्यार्थी दिन साजरा
Published on: 

पुणे, ता. ८ : ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये सात नोव्हेंबर १९०० ला प्रवेश घेतला. ही घटना केवळ शैक्षणिक नव्हे, तर सामाजिक आणि वैचारिक क्रांतीची सुरुवात होती. साताऱ्यातून सुरू झालेला त्यांचा शैक्षणिक प्रवास कोलंबिया विद्यापीठापर्यंत पोहोचला. त्यांचा ज्ञानाचा आणि समतेचा वारसा पुढील पिढीने जपावा,’’ असे आवाहन सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या वतीने विद्यार्थी दिनानिमित्त साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे विविध प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, ‘बार्टी’च्या निबंधक डॉ. सुचिता शिंदे, सेवा व विस्तार विभागाचे विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, विद्यार्थी उपस्थित होते.

या प्रसंगी शाळेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. शहरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समता सैनिक दल आणि महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांनी मानवंदना दिली.

विद्यार्थ्यांसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक क्रांतीचे तत्त्वज्ञान’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये यश पाटील याने प्रथम, अनिकेत वनारे याने द्वितीय, तर वैभवी पाटकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. सृजना सरवदे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. यावेळी ‘बार्टी’तर्फे महापुरुषांच्या ग्रंथांचे पुस्तक प्रदर्शन आणि सवलतीच्या दरात विक्रीचे आयोजन केले होते. शाहीर राजेंद्र कांबळे आणि त्यांच्या संचाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साताऱ्यातील आठवणींना उजाळा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.