राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी यांची आज (रविवार) सर्वानुमते निवड करण्यात आली.

पुणे : राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी यांची आज (रविवार) सर्वानुमते निवड करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाच्या राज्यमंडळ आणि सेवादल मंडळाची राष्ट्रीय बैठक साने गुरुजी स्मारक येथे आयोजित करण्यात आली होती. माजी अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी डॉ. देवी यांच्याकडे अध्यक्ष पदाची सूत्रे सोपवली. 

राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. गणेश देवी म्हणाले, 'राष्ट्र सेवा दलाच्या प्रत्येक कार्यकर्त्याजवळ लोकशाही, समाजवाद आणि साने गुरुजींच्या विचारांची शिदोरी आहे. सेवा दल कार्यकर्त्यांजवळ प्रगल्भता, कृतीशिलता आणि सभानता ही त्रिगुणसूत्री आहे. या वारशाच्या जोरावर देशातील लोकशाही, समाजवाद मानणाऱ्या नागरिकांकडे जाऊन आपण त्यांना सेवा दलाशी जोडूया. 

राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश परांजपे, विश्वस्त आमदार कपिल पाटील, अंजलीताई आंबेडकर, डॉ. झहीर काझी, सुरेखाताई दळवी, माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा, अरविंद कपोले, भरत लाटकर हे यावेळी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून झाकीर अत्तार यांनी काम पाहिले. 

डॉ. गणेश देवी यांच्याविषयी 
पद्मश्री डॉ. गणेश देवी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषाशास्त्रज्ञ, विचारवंत आणि सांस्कृतिक नेते म्हणून प्रसिध्द आहेत. राष्ट्रीय किंवा राजभाषा म्हणून मान्यता नसलेल्या चाळीस भाषांना त्यांनी नवी ओळख मिळवून दिली. देशातील लुप्त होणाऱ्या शेकडो वंचित व भटक्या समाजाच्या भाषांना त्यांनी आपल्या कामाने संजीवनी दिली. देशातील 750 भाषांची नोंद करण्याचं संशोधनाचं ऐतिहासिक काम देवी यांनी त्यांच्या तीन हजार सहकारी अभ्यासकांच्या साथीने तीन वर्षात पूर्ण केलं आहे.  

पुणे जिल्हयातील भोर हे डॉ. गणेश देवी यांचं जन्मगाव. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ तसेच इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ लिड्समध्येही त्यांनी शिक्षण घेतलं. मराठी, गुजराती आणि इंग्रजी भाषेत त्यांनी लेखन केलं. वानप्रस्थ (मराठी), आदिवासी जाने छे (गुजराती), अफ्टर अ‍ॅम्नेशिया (इंग्रजी) ही डॉ. देवी यांची पुस्तकं गाजली असून शंभरच्या वर त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्काराने त्यांचा गौरव केला आहे. तसेच साहित्य अकादमीचा देशपातळीवरील मानाचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.

देशात नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विचारवंतांच्या हत्येनंतर अस्वस्थ होऊन डॉ. देवी यांनी 'दक्षिणायन' ही चळवळ सुरु केली. त्यात देशभरातील हजारो लेखक, कलाकार, शास्त्रज्ञ, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते सामील झाले. विचारवंतांच्या हत्येचा निषेध म्हणून पुरस्कार वापसीच्या चळवळीला चालनाही डॉ. देवी यांनी दिली. 'दक्षिणायन' आता देशातली महत्त्वाची वैचारिक चळवळ बनली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Ganesh Devi is appointed as a National President of Rastra Seva Dal