ज्योती वाघमारे बातमी
SLC26B28346
सोलापूर : खासदार म्हणून निवड झाल्यानंतर डॉ. ज्योती वाघमारे यांचे पत्रकार संघापर्यंत घोड्यावरून झालेले आगमन.
---
एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यालाच आपले कुटुंब मानले
खासदार डॉ. ज्योती वाघमारे; खासदार म्हणून निवडीनंतर सोलापुरात जल्लोषात स्वागत
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ७ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य कष्टकरी कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यांचाच वारसा पुढे चालवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासारख्या गरीब, मागासवर्गीय कुटुंबातील मुलीला देशाच्या सर्वोच्च सभागृहात खासदार केले. आजच्या राजकारणात काहींना स्वतःचे कुटुंब हाच पक्ष वाटतो, मात्र एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यालाच आपले कुटुंब मानले आहे, असे सडेतोड प्रतिपादन नूतन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी केले.
राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर सोलापुरात प्रथमच आलेल्या डॉ. वाघमारे यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा, विश्वभूषण लिमये आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. वाघमारे पुढे म्हणाल्या, अनेक दिग्गज प्रतिस्पर्धी समोर असतानाही एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोणतीही जात-पात न पाहता केवळ कर्तृत्व पाहून मला ही मोठी संधी दिली. विशेष म्हणजे, त्यांनीच माझे डिपॉझिटही भरले आहे. सोलापुरात महायुतीतील एक पत्रकार नगरसेवक तर दुसरा पत्रकार खासदार झाल्याने आता पत्रकारांना खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ आले आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी त्यांनी श्रमिक पत्रकार संघाच्या पायरीवर नतमस्तक होऊन प्रवेश केला. त्या म्हणाल्या, मी निवेदिका आणि प्रवक्ता असताना पत्रकार बांधवांनी मला भावाप्रमाणे खंबीर साथ दिली, म्हणूनच मी आज इथंपर्यंत पोचू शकले. तत्पूर्वी, चार हुतात्मा पुतळा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव डॉ. वाघमारे चक्क घोड्यावर स्वार होऊन पत्रकार संघापर्यंत आल्या. ‘खासदार ज्योतीताई तुम आगे बढो’ अशा घोषणांनी सोलापूर शहर दणाणून गेले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन किरण बनसोडे यांनी केले.
---
गल्लीतला आवाज दिल्लीत पोचवणार!
मी सोलापूरच्या जगजीवनराम वस्तीत राहणारी एक सामान्य पत्रकार आणि शिक्षिका आहे. पत्रकारितेच्या वारशामुळेच मला बोलण्याचे, लिहिण्याचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळाले. आज मी खासदार झाले नसून सोलापूरचा प्रत्येक पत्रकार खासदार झाला आहे. गल्लीतला हा आवाज आता दिल्लीच्या तख्तापर्यंत पोचवेन आणि सर्वांना अभिमान वाटेल असे कार्य करेन, असा विश्वास खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

