पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आठ वर्ष उलटल्यानंतर या प्रकरणाचा खटला अखेर सुरू झाला आहे. खटल्यातील पहिल्या साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. त्यानंतर बचाव पक्षाने साक्षीदाराची उलट तपासणी घेतली.
विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.
डॉ. दाभोलकर आठवड्यातून एक ते दोन वेळा सदाशिव पेठेतील अमेय अपार्टमेंटमध्ये राहत. ते राहत असलेल्या शेजारच्या सदनिकेत वास्तव्यास असलेले अविनाश धवलभक्त यांची साक्ष नोंदविण्यात आली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर संबंधित सदनिकेतून पुस्तक, डायरी, कपडे असे काही साहित्य पोलिसांनी हस्तगत केले होते. त्या प्रक्रियेत धवलभक्त हे पंच होते अशी माहिती, या प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयास दिली. बचाव पक्षाच्या वतीने ॲड. प्रकाश साळशिंगीकर, ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर, ॲड. सुवर्णा आव्हाड- वस्त यांनी कामकाज पाहिले. ॲड. इचलकरंजीकर यांनी साक्षीदाराची उलट तपासणी केली.
या खटल्यास सरकारी वकिलांना साहाय्य करीत बाजू मांडण्याची संधी मिळण्याबाबत ॲड. ओंकार नेवगी यांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यास न्यायालयाने मंजूर दिली आहे. ॲड. नेवगी हे दाभोलकर कुटुंबीयांचे वकील आहेत. खटल्याची पुढील सुनावणी १३ नोव्हेंबर रोजी होणार असून त्यात फिर्यादी असलेले सहायक पोलिस निरीक्षक नारायण रानगट यांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे.
या प्रकरणातील आरोपींना गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल मुंबर्इतील खाडीत टाकून दिल्याचे तपासात समोर आले होते. सीबीआयने दुबर्इतील एका संस्थेद्वारे या पिस्तुलाचा शोध घेतला होता. त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्याची मागणी ॲड. इचलकरंजीकर यांनी केली. या खटल्यात एकूण ७०० साक्षीदार असून त्यातील ३२ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे तर बचाव पक्षाचे सुमारे ८० साक्षीदार आहेत.
कारागृह अधीक्षकांना सूचना
मला आठवड्यातून एक दिवस व्हीसीद्वारे वकील आणि कुटुंबीयांशी बोलण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र बोलू दिले जात नसल्याची तक्रार डॉ. वीरेंद्र तावडे याने न्यायालयात केली. त्यावर कारागृह अधीक्षकांना म्हणणे सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत, अशी माहिती ॲड. इचलकरंजीकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.