esakal | नेपच्यूनची प्रतियुती
sakal

बोलून बातमी शोधा

नेपच्यूनची प्रतियुती

नेपच्यूनची प्रतियुती

sakal_logo
By
डॉ. प्रकाश तुपे (खगोलशास्त्राचे अभ्यासक)

सूर्यमालेतील सर्वांत दूरचा व पृथ्वीपेक्षा चौपट मोठा असलेल्या नेपच्यून गृहाची प्रतियुती १४ सप्टेंबर रोजी होत आहे. प्रतियुती वेळी पृथ्वीच्या एका बाजूस गृह व विरुद्ध बाजूस सूर्य असतो. प्रतियुतीच्या दिवशी गृह पूर्वेस सूर्यास्तास उगवतो व रात्रभर आकाशाची फेरी मारून सूर्योदयी पश्चिमेस मावळतो. तसेच यावेळी तो पृथ्वीजवळ आल्याने मोठा व तेजस्वी दिसतो. नेपच्यून कुंभ राशीतील पूर्वेकडील भागात म्हणजे मीन पंचका जवळ दिसेल. या निळसर रंगाच्या गृहाला पाहण्यासाठी बॉयनॉक्युलरची गरज लागेल. तो आपल्यापासून ४.३ अब्ज किलोमीट दूर असून देखील त्याची तेजस्विता ७.७ असल्याने नेपच्यूनची २ विकलांची छोटी तबकडी या महिन्यात पाहता येईल.

गृह

बुध : पश्चिमेस बुध दिसत आहे. सूर्यास्तानंतर काही वेळातच तो क्षितिजालगत दिसू लागेल. महिन्याच्या प्रारंभी तो आठच्या सुमारास मावळेल. बुध सूर्यापासून दूर होत १४ तारखेला सूर्यापासून दूरातदूर अशा २७ अंशावर पोचेल. बुधाची तेजस्विता शून्य असल्याने पश्चिम क्षितिज स्वच्छ असल्यास तो क्षितिजालगत सहज दिसेल. बुधाच्या वरच्या बाजूस चित्रेचा तारा व शुक्र दिसत आहे. चंद्राजवळ बुध ८ सप्टेंबर रोजी दिसेल.

शुक्र : पश्चिम क्षितिजावर सूर्यास्तानंतर शुक्र दिसेल. शुक्राची तेजस्विता उणे ४.० असल्याने तो संध्याकाळच्या संधी प्रकाशात सहज दिसू शकेल. महिन्याच्या प्रारंभी शुक्राच्या खालच्या बाजूस चित्रेचा तारा दिसेल. शुक्र या ताऱ्यालगत ४-५ तारखेला दिसेल. तर चंद्राजवळ १० तारखेला दिसेल. या महिन्यात शुक्र रात्री नऊ वाजेपर्यंत दिसत राहील.

मंगळ ः गेल्या महिन्याच्या अखेरीस मंगळ सूर्याजवळ गेल्याने दिसेनासा झाला होता. या महिन्यात देखील सूर्याजवळ असल्याने मंगळ दिसू शकणार नाही.

गुरू ः गेल्याच महिन्यात गुरूची प्रतिपूर्ती झाली होती. याचमुळे तो रात्रभर तेजस्वी दिसेल. अंधार पडताच पूर्वेस गुरू दिसू लागेल व रात्रभर आकाशाची फेरी मारून पहाटे पाचच्या सुमारास मावळेल. तो मकर राशीत वक्र गतीने हलताना दिसेल. गुरूचे बिंब तब्बल ४८ विकलांएवढे मोठे दिसत असल्याने त्याच्या बिंबावरचे दोन चट्टे व भोवतालचे चार चंद्र ठळकपणे दिसतील. तसेच या चंद्राची ग्रहणे व पिधाने सहजपणे दिसू शकतील. चंद्राजवळ गुरू १८ तारखेला दिसेल.

शनी ः दक्षिणपूर्व क्षितीजावर मकर राशीतील पश्‍चिमेकडच्या भागात पिवळसर रंगाचा शनी दिसेल. महिन्याच्या प्रारंभी तो अंधार पडताच दिसू लागेल व पहाटे चार वाजता मावळताना दिसेल. शनीची तेजस्विता ०.३ असून त्याच्या १८ विकलांच्या बिंबाभोवती १९ अंशाने कललेली कडी दिसतील. चंद्राजवळ शनी १६-१७ सप्टेंबर रोजी दिसेल.

युरेनस-नेपच्यून ः युरेनस मेष राशीत दिसत असून तो या राशीच्या ओमिकॉन व सीग्मा ताऱ्यांच्या परिसरात आहे. त्याची तेजस्विता ५.८ आहे. नेपच्यूनची प्रतियुती १४ सप्टेंबर रोजी होत असल्याने तो रात्रभर दिसेल. तो कुंभ राशीत दिसत असून त्याची तेजस्विता ७.७ असेल.

चंद्र-सूर्य ः श्रावण अमावस्या ६ सप्टेंबर रोजी तर भाद्रपद पौर्णिमा १९ सप्टेंबर रोजी होईल. चंद्र पृथ्वीजवळ (३,६८,४६२ कि.मी.) ११ तारखेला तर पृथ्वीपासून दूर (४,०४,६४० कि.मी.) २७ सप्टेंबर रोजी होईल.

सूर्य २३ सप्टेंबर रोजी ‘शरद संपात’ बिंदूवर पोहोचेल. या दिवशी सूर्य बरोबर पूर्वेस उगवून पश्‍चिमेस मावळेल. तसेच या दिवशी सर्वत्र दिवस रात्र समसमान असतात.

loading image
go to top