प्रदेश उपाध्यक्षपदाने खटावचा गौरव; इनामदारांच्या मातीचा सन्मान – आ. महेश शिंदे
डॉ. प्रिया शिंदे यांच्या निवडीने खटावचा सन्मान
महेश शिंदे; भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड, नव्या सदस्यांचाही सन्मान
खटाव, ता. ३ : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. प्रिया शिंदे यांची झालेली नियुक्ती ही केवळ व्यक्तीचा नव्हे, तर खटावच्या जनतेचा सन्मान आहे. पक्षप्रमुखांनी हे महत्त्वाचे पद बहाल करून लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मभूमीचाही गौरव केला आहे, असे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले.
डॉ. प्रिया शिंदे यांच्या निवडीबद्दल तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या भव्य नागरिक सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमास भाजपचे सचिव भरत मुळे, तालुकाध्यक्ष शिवाजी शेडगे, शिवसेना तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर काटकर, पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य शशिकांत रोमन, हणमंत बोटे, रेश्मा शेडगे, नवनाथ वलेकर, अभयराजे घाटगे, प्रीती त्रिपुटे, स्मिता सावंत, गणपत शिंदे, गणेश कर्णे, रूपाली जगताप, संगीता शिंदे, हरी सावंत, योगेश लावंड, रणजित शिंदे, मधुकर ढाणे व गावोगावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेल्या यशामागे गेल्या काही वर्षांत केलेली विकासकामे, जनतेशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि कार्यकर्त्यांची निष्ठा हे प्रमुख घटक आहेत. निवडणूक संपल्यानंतर राजकीय मतभेदही संपले पाहिजेत. रामोशीवाडी ते भाडळे, पुढे बिचुकले व अपशिंगेपर्यंत पाणी पोहोचवण्याचे नियोजन सुरू असून, नेर तलावातून मांजरवाडीमार्गे गारोडी, डिस्कळ व राजापूरच्या शिवारात पाणी नेण्याचा आराखडा तयार आहे.’’ खटावचे भूमिपुत्र लक्ष्मणराव इनामदार यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे नेत आहोत. त्यांचे शिष्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच खटावला भेट देतील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषद निवडणुकीत भावनिक वातावरणाचा परिणाम झाल्याने काही ठिकाणी अल्प फरकाने पराभव झाला. मात्र, कार्यकर्त्यांनी ताकदीने लढत दिली, असे स्पष्ट करत त्यांनी जिहे-कठापूर योजनेंतर्गत २२०० कोटी रुपयांचे टेंडर पूर्ण झाल्याची माहिती दिली. दरम्यान, खटावचे माजी सरपंच बबनराव गाडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. प्रिया शिंदे म्हणाल्या, ‘‘हे पद म्हणजे मतदारसंघातील प्रत्येक महिलेचा सन्मान आहे. पक्षाने सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत जनसेवेला अधिक बळ देईन.’’
कार्यक्रमात मधुकर पाटोळे, राहुल शिंदे, शशिकांत रोमन, राजनंदा पाटील, नेहा रजपूत, नंदा भूप यांनी मनोगत व्यक्त केले. सुहास जोशी यांनी प्रास्ताविक केले. सुनीता काटकर व स्वप्नाली बर्गे यांनी सूत्रसंचालन केले. संजय घाडगे यांनी आभार मानले.
.........................................
दहा दिवसांत कामास सुरुवात
मतदारसंघातील ९८ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे आमचे ध्येय आहे. दहा दिवसांत वर्कऑर्डर मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. विसापूर, रेवलकरवाडी, खबालवाडी, जांब, जाखणगाव आदी गावांनाही सिंचन योजनेत समाविष्ट केले जाणार असुन, दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या योजना टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाहीही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.
...........................................
फोटो :.................KHA26B01357
खटाव : सत्कार सोहळ्यात संवाद साधताना डॉ. प्रिया शिंदे. त्या वेळी व्यासपीठावर महेश शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर. (राजेंद्र शिंदे : सकाळ छायाचित्रसेवा)
......................................
............................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

