डॉ. हॉकिंग यांच्या सिद्धांताला संशोधकांचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

संशोधनाचे महत्त्व  

  • आदिम कृष्णविवरांपासून कृष्णपदार्थ बनले असण्याची शक्‍यता फेटाळली गेली
  • विश्‍वाच्या मूलभूत संरचनेसाठी जबाबदार असणाऱ्या घटकांबद्दलच्या ज्ञानात अधिक भर
  • आदिम काळातील विश्‍वाच्या भौतिकशास्त्राबद्दल काही गणितीय अटींची परिणामे निश्‍चित

पुणे - विश्‍वनिर्मितीच्या सुरवातीच्या काळातील कृष्णविवरातून कृष्णपदार्थांची निर्मिती झाली असावी, असा सिद्धान्त काही दशकांपूर्वी शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांनी मांडला होता. मात्र, त्यांच्या सिद्धान्ताला ‘आयुका’तील दोन शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या एका संशोधकांच्या गटाने आव्हान दिले आहे. ‘एकूण कृष्णपदार्थांपैकी एक टक्‍क्‍यापेक्षा कमी प्रमाण हे कृष्णविवरांपासून बनले आहे,’ हे या संशोधकांनी निरीक्षणातून सिद्ध केले आहे.

भारतासह जपान आणि अमेरिका या देशांतील एका संयुक्त संशोधन गटाने काढलेल्या निष्कर्षामुळे आता डॉ. हॉकिंग यांनी मांडलेल्या ‘विश्‍वनिर्मितीच्या सुरवातीच्या काळातील कृष्णविवर हे कृष्णपदार्थाच्या (डार्क मॅटर) निर्मितीला कारणीभूत’ असल्याच्या सिद्धान्ताला आव्हान मिळाले आहे. या संशोधन गटाचा कृष्णपदार्थ आणि विश्‍वाच्या सुरवातीच्या काळातील कृष्णविवर याबद्दलचा संशोधन निबंध ‘नेचर ॲस्ट्रोनॉमी’ नियतकालिकात सोमवारी प्रसिद्ध झाला. एकूण अकरा संशोधकांच्या गटात आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रातील (आयुका) डॉ. सुहृद मोरे आणि डॉ. अनुप्रीता मोरे हे शास्त्रज्ञ आहेत.

ब्रह्मांडामध्ये कृष्णपदार्थ ८५ टक्के आहेत. आजपर्यंत कृष्णपदार्थ कण शोधण्याचे प्रयत्न झाले. त्यातील बरेच भूमिगत प्रयोग स्वरूपात होते. मात्र, त्यांच्या निर्मितीचा शोध घेणे अशक्‍य झाले. डॉ. हॉकिंग यांनी १९७१ मध्ये ‘आदिम कृष्णविवर हे विश्‍वाच्या निर्मितीनंतर सुरवातीच्या काळात जन्माला आले असावेत आणि यापासून कृष्णपदार्थाची निर्मिती झाली असावी,’ असा सिद्धान्त मांडला होता. 

संशोधन गटाने ‘ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग परिणाम’ ही संकल्पना वापरून पृथ्वीजवळ असणाऱ्या देवयानी (अँड्रोमेडा) दीर्घिकेमधील अवकाशातील कृष्णविवरांचा शोध घेऊन त्यांचा अभ्यास केला. दूर अंतरावरील ताऱ्यांकडून येणाऱ्या प्रकाशात एखादे खगोलीय वस्तुमान आल्यास प्रकाशाची दिशा बदलते, याला ‘ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग’ म्हणतात. शक्तिशाली दुर्बिणीच्या साह्याने हे निरीक्षण शक्‍य होते. सुबारू या दुर्बिणीच्या साह्याने गटाने ‘अवकाशातील कृष्णविवर कशी वाटचाल करतात’ याचा अंदाज घेत देवयानी दीर्घिकेची अनेक निरीक्षणे नोंदवली, असे डॉ. सुहृद आणि डॉ. अनुप्रीता मोरे यांनी सांगितले. या दुर्बिणीच्या साह्याने नोंदविलेल्या सलग १९० निरीक्षणातून कृष्णविवरांमुळे देवयानी दीर्घिकेमधील जवळपास एक हजार तारे अधिक प्रकाशमान होण्याची अपेक्षा होती. परंतु, तसे दिसले नाही.

त्यामुळे एकूण कृष्णपदार्थांपैकी एक टक्‍क्‍यापेक्षा कमी प्रमाण हे आपल्या चंद्राएवढ्या वस्तुमान असलेल्या कृष्णविवरांपासून बनल्याचे संशोधनातून सिद्ध झाल्याचे डॉ. सुहृद मोरे यांनी सांगितले.

Web Title: dr stephen hawking Scientist Theories