

डॉ. सुनीता सावरकर यांना
भीमाबाई आंबेडकर पुरस्कार जाहीर
सातारा, ता. ८ ः येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या भीमाबाई आंबेडकर पुरस्कारासाठी इतिहास अभ्यासक डॉ. सुनीता सावरकर (नागपूर) यांची निवड करण्यात आली आहे, याबाबतची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे व निमंत्रक दिनकर झिंब्रे यांनी दिली.
डॉ. सुनीता सावरकर केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय अंतर्गत कार्यरत आंबेडकर फाउंडेशन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डॉ. आंबेडकर चेअर इन दलित हिस्ट्रीच्या विभागप्रमुख व सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. आंबेडकरांचे विचार व त्यांची समकालीन सुसंगतता, डॉ. आंबेडकर पूर्व व नंतरच्या काळातील भारतीय दलित इतिहास, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती समाजाचा सामाजिक- राजकीय इतिहास, स्त्रीवादी इतिहास लेखन व इतिहासातील दलित आदिवासी व ओबीसी महिलांचे योगदान आदी विषयात त्यांनी मौलिक स्वरूपाचे संशोधन केले आहे. मराठी विश्वकोशामध्ये त्यांनी २१ नोंदी लिहिल्या आहेत. त्यांना संशोधनासाठी राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप, नरहर कुरुंदकर, तसेच साधना साप्ताहिकाची ‘तांबे - रायमाने’ इत्यादी फेलोशिप मिळाल्या आहेत.
त्यांच्या प्रकाशित साहित्यामधील ‘ढोर चांभार स्त्रियांच्या आंबेडकरी जाणिवांचा परीघ’ या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार व भंडारा येथील वैनाकाठ फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे. ‘खानदेशातील भिल्ल आदिवासी आणि आंबेडकरी चळवळ’ या ग्रंथास नगर साहित्य परिषदेचा समीक्षात्मक ग्रंथ पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत काम करणाऱ्या पहिल्या कर्तबगार चर्मकार महिला गुणाबाई गाडेकर यांचे ‘स्मृतिगंध’ या आत्मचरित्राचे संपादन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार जाहीर केला आहे. दहा हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.