पुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी राबविला जातोय अनोखा उपक्रम

Dr Sushma Date works In order to control the number of stray dogs
Dr Sushma Date works In order to control the number of stray dogs

पुणे : पुण्यातील ‘डेक्कन जिमखाना प्राणी कल्याण गटा’मार्फत भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी अभ्यासपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. कचरा व्यवस्थापन, कुत्र्यांना पकडून त्यांचं निर्बिजीकरण व त्यांना पालक मिळवून देण्यासाठी जनजागृती यांसारख्या उपाययोजना आठ वर्षांपासून अमलात आणल्या जात आहेत. या यशस्वी प्रारूपाच्या धर्तीवर पुण्यातील निरनिराळ्या प्रभागांमध्ये आता काम केलं जाऊ लागलं आहे, अशी माहिती गटातील डॉ. सुषमा दाते यांनी दिली.


सुषमा म्हणाल्या, ‘‘नागरी प्रश्नांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, उपाययोजना अमलात आणण्यासाठीच्या कृती कार्यक्रमांत त्यांचा सहभाग वाढवणे यासाठी ‘डेक्कन जिमखाना परिसर समिती’ कार्य करते. कचरा समस्या, परिसरातील टेकड्यांचं संरक्षण व संवर्धन, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, वाहतूक आदी संदर्भात समितीचं काम चालतं. याचाच एक भाग म्हणून आमचा गट प्राणी कल्याणासाठी आठ वर्षांपासून काम करतो आहे. याचं कारण भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, त्यांच्या भुंकण्या व चावण्याचा त्रास यांसारख्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळत होत्या. प्राणीप्रेमी सोडले तर इतरांच्या प्रतिक्रिया तीव्र होत्या. कुत्री व माणसं यांच्यातील संघर्ष विचारपूर्वक हाताळण्यासाठी आम्ही काही जण स्वयंसेवक म्हणून पुढे आलो. सुरुवातीला प्रभाग छत्तीसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर काही उपाय करून पाहायचं ठरलं. भटक्या कुत्र्यांना मारून टाकण्यासारख्या क्रूर उपायाऐवजी, महापालिकेतील संबंधित खात्याच्या मदतीने वेगळं पाऊल उचलण्यात आलं. एखाद्या ठिकाणाहून भटकी कुत्री पकडून निर्बिजीकरण करून पुन्हा, त्याच जागी सोडून देणं सुरू झालं. यामुळे त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणायला मदत झाली. कुत्री आपल्या हद्दीत सहसा इतर कुत्र्यांना शिरकाव करू देत नाहीत. यामुळे आधीच्या कळपामुळे नव्याने तेथे येणाऱ्या कुत्र्यांना प्रतिबंध होतो.’’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुषमा यांनी असंही सांगितलं की, ''कुत्र्यांना त्रास देऊ पाहणाऱ्यांच्या किंवा त्यांना परक्या, संशयास्पद वाटणाऱ्या माणसांच्या मागे ती लागू शकतात. परिसरातील माणसांनी दोस्ती केल्यास त्यांचा उपद्रव न होता राखणीसाठी मदतच होऊ शकते. पाळणाऱ्यांनी महागडी कुत्री विकत आणण्यापेक्षा अशी कुत्री स्वीकारावीत. त्यांची प्रतिकारशक्तीही चांगली असते. एखाद्या भागात इतस्ततः पसरलेल्या कचऱ्यातून खायला मिळत राहिलं तरी तेथे कुत्र्यांची संख्या वाढू लागते. तेथे नव्याने येणाऱ्या कुत्र्यांशी आधीच्या कुत्र्यांची झुंज व त्याचा फटका परिसरातील लोकांना होऊ शकतो. हे टाळण्यासाठी कचरा व्यवस्थापन हा मूलभूत उपाय आम्ही अनुसरला. या निरनिराळ्या प्रयत्नांच्या एकत्रित यशातून इतर प्रभागांमधील रहिवाशांनी प्रेरणा घेतली. आता बाणेर, मगरपट्टा, विमाननगर, बावधन, वारजे आदी भागांत या प्रकारे काम सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे अपघातग्रस्त किंवा आजारी असलेल्या भटक्या कुत्र्यांवर औषधोपचार तसंच खाणं-पिणं देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. लोकांनी दिलेल्या देणगीतून ही सेवा चालते. मी स्वतः व माझ्या परिचयातील काही मंडळींनी अशा अपघातग्रस्त अथवा आजारातून बऱ्या झालेल्या कुत्र्यांना नंतर आमच्याकडे पाळलं. कुत्र्यांना पालक मिळाले. आमच्यासाठी घरात प्रेमळ सदस्य वाढल्याची भावना होती.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com