Pune : विद्यापीठातील डॉ. प्रियांका जावळे यांची परराष्ट्र मंत्रालयात ' विधी अधिकारी ' म्हणून निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठातील डॉ. प्रियांका जावळे यांची परराष्ट्र मंत्रालयात ' विधी अधिकारी ' म्हणून निवड

विद्यापीठातील डॉ. प्रियांका जावळे यांची परराष्ट्र मंत्रालयात ' विधी अधिकारी ' म्हणून निवड

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी विभागातील डॉ. प्रियांका जावळे यांची नुकतीच केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात विधी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेतून त्यांची ही निवड करण्यात आली आहे. परराष्ट्र कायदा, धोरण आणि व्यवहारामध्ये अनुभवी व्यक्तींपैकी यासाठी देशातून तीन जणांची निवड केली असून त्यात पुणे विद्यापीठाच्या ‘पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप’ करणाऱ्या डॉ. जावळे यांचा समावेश आहे.

जावळे यांनी ‘न्यूक्लिअर एनर्जी लॉ’ या विषयात पीएच.डी केली आहे. त्या सध्या विद्यापीठाच्या विधी विभागात ‘पोस्ट डॉक्टरेट रिसर्च’ करत आहेत. त्या ‘अंतरिक्ष कायदा व धोरण’ (स्पेस लॉ) विषयात काम करत असून मुख्यत: ‘द युज ऑफ न्यूक्लिअर इन स्पेस एक्सप्लोरेशन : लॉ अँड पॉलिसी’ विषयात विधी विभागातील ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. दुर्गामिनी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली त्या अभ्यास करत आहेत.

डॉ. जावळे यांनी त्यांचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑटोनॉमिक एनर्जी एजन्सी (आयएईए) या ऑस्ट्रियामध्ये झालेल्या परिषदेत सादर केला आहे. या व्यतिरिक्त युनायटेड नेशन्स, तुर्की, एपीएससीओ यांसारख्या परिषदेत त्यांचे अहवाल सादर करण्यासाठी निवडले आहेत. त्याच बरोबर डॉ. जावळे यांची इंटरनॅशनल ‘युथ न्यूक्लिअर काँग्रेस २०२०’ या सिडनी येथील परिषदेत त्यांच्या अभ्यासाचे सादरीकरण करण्यासाठी निवड झाली होती. अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषद, बैठका, चर्चांमध्ये त्यांचा सहभाग आहे.

loading image
go to top