अबब...वळण्यात अजगराने गिळले वानर!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

मुळशी धरण भागातील वळणे (ता. मुळशी) येथे सुमारे अकरा फूट लांब अजगराने वानराला गिळल्याची घटना नुकतीच घडली.

माले (पुणे) : मुळशी धरण भागातील वळणे (ता. मुळशी) येथे सुमारे अकरा फूट लांब अजगराने वानराला गिळल्याची घटना नुकतीच घडली.

वळणेवाडी येथे मानवी वस्तीजवळ घडलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली होती. सर्पमित्र, स्थानिक ग्रामस्थ, वनखात्याचे कर्मचारी यांनी अजगराला पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडले.

वळणेवाडी ग्रामपंचायतीच्या जलवाहिनीजवळ गुरे चारणाऱ्या कातकरी ग्रामस्थांना फुत्काराचा आवाज येत होता. त्यामुळे जवळ जाऊन पाहिले असता सुमारे अकरा फूट लांब अजगर गुरांवर फुत्कारत असल्याचे दिसले. घाबरून त्यांनी वळण्याचे माजी उपसरपंच ज्ञानेश्‍वर भावेकर व इतर ग्रामस्थांना बोलावले. मानवी वस्ती जवळच
असल्याने पाळीव प्राणी, लहान मुलांना धोका वाटल्याने ग्रामस्थांनी सर्पमित्र भारत रासनकर यांना बोलावले. सर्पमित्र आल्यावर त्यांनी पाहिले असता अजगराने भक्ष्य गिळले होते. त्यामुळे त्याचे पोट फुगले होते. अजगराला मानवी वस्तीपासून दूर सोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यावेळी अजगराने भक्ष्य पोटातून बाहेर टाकण्यास सुरुवात केली. काही वेळात अजगराने पोटातून एका वानराला बाहेर टाकले. रासनकर व योगेश भावेकर यांनी अजगराला पकडून पोत्यात टाकले. नंतर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर अजगराची वैद्यकीय तपासणी करून ताम्हिणी अभयारण्यात सोडण्यात आले.

अजगराला पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यासाठी सर्पमित्र अरुण गुंड,पौडचे वनपाल एम. एस. हिरेमठ, वनरक्षक परमेश्‍वर कासुळे, वनमजूर नाना भिलारे, स्थानिक ज्ञानेश्‍वर भावेकर, भरत भावेकर यांनी प्रयत्न केले, अशी माहिती वळण्याचे सरपंच समीर सातपुते यांनी दिली.

सुमारे अकरा फूट लांबीचा हा मादी अजगर असून तो 13 ते 14 वर्षांचा असावा. त्याचे वजन सुमारे 35 किलो असून पूर्ण वाढ झालेला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर अजगराला ताम्हिणी अभयारण्य परिसरात सोडण्यात आले.
-एम. एस. हिरेमठ,
वनपाल, पौड (ता. मुळशी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The dragon swallowed the monkey in valne!