रजपूत झोपडपट्टीतील 150 घरात घुसले ड्रेनेजचे पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drainage water into 150 houses in Rajput slums

रजपूत झोपडपट्टीतील 150 घरात घुसले ड्रेनेजचे पाणी

कोथरूड - राजमयूर सोसायटीतील ड्रेनेजवाहीनी तुंबल्यामुळे रजपूत झोपडपट्टीतील घराच्या फरशांमधून ड्रेनेजचे पाणी निघू लागले. हा प्रश्न सोडवता न आल्याने गेले बारा दिवस रजपूत झोपडपट्टी मधील गल्ली बोळ व घरातून ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. परंतु प्रशासनाला या पाण्याला मार्ग काढून देता आला नाही. संतापलेल्या महिलांनी पोलिस चौकी गाठून यासंदर्भात तक्रार दिली. एवढे करुनही तक्रारीचे निवारण न झाल्यास महापालिकेत जावून अधिका-यांना या पाण्याने आंघोळ घालणार असल्याचे महिलांनी सांगितले.

सोमवारी पावसाचा जोर वाढल्यानंतर वस्तीतील घरातून मोठ्या प्रमाणात पाणी येवू लागले. रस्त्यावरील ड्रेनेजची झाकणे काढली तरी त्यातून खुप मोठ्य प्रमाणावर पाणी येत आहे. मारुती दवंडे यांना पक्षघात झाल्याने ते हालचाल करु शकत नाही. त्यांच्या घरात फूटभर पाणी साठले होते. पाणी उपसले तरी कमी होत नव्हते. सोमनाथ रजपूत व विलास खोल्लम या ज्येष्ठांची तीच परिस्थीती झाली आहे. दुस-यांच्या घरात स्वयंपाक बनवून, मुलांना ठेवून दिवस कंठन्याची वेळ येथील रहीवाशांवर आली आहे.

मिलन कुदळे, सुवर्णा गजमल, संध्या अडागळे, नंदा रजपूत, हेमा निकम, पुष्पा उदेक, हेमा सणस, सारिका कदम, गणेश धूत, संतोष कदम यांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. दिडशेहून अधिक घरांना या पाण्याचा त्रास होत आहे. वस्तीतील महिला म्हणाल्या की, सोसायटीचे पाणी आमच्याकडे सोडले आहे. चेंबरवर सोसायटीतील एका कुटूंबाने घर बांधले आहे. त्यावर महानगरपालिकेने कारवाई केली नाही. आता त्या घऱातसुध्दा ड्रेनेजचे पाणी आले आहे. अधिकारी म्हणतात पाणी कुठून येतेय हे आम्हालाच समजत नाही. आता आम्ही काय करायचे.

यापूर्वी धो धो पाऊस झाला तरी आमच्या वस्तीत कधी पाणी आले नव्हते. आत्ताच असे काय झाले की १२ दिवस आमच्या घरातून ड्रेनेजचे पाणी येत आहे. अधिकारी त्यावर काहीच उपाय योजना करु शकत नाहीत का. असा प्रश्न रजपूत झोपडपट्टीत राहणा-या विठाबाई निम्हण विचारत होत्या.

नंदा रजपूत ही विद्यार्थीनी म्हणाली की, आम्ही सिंगल रुम मध्ये (छोट्या घरात) राहतो. घरात जर सारखे पाणी असेल तर आम्ही अभ्यास कुठे आणि कसा करायचा. घरात सगळे गटाराचे पाणी येत आहे. आम्ही कुठे रहायचे, थांबायचे, बसायचे असा प्रश्न आम्हाला पडला आहे. वासामुळे जेवण जात नाही.

अनिल राणे म्हणाले की, मेट्रोचे काम करताना ड्रेनेज वाहीन्या दुसरीकडे जोडल्या गेल्या आहेत. त्याचा परिणाम येथील वाहीन्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाणी आले व लोकांच्या घरातून पाणी येवू लागले आहे. ड्रेनेज वाहीन्यांचे योग्य व्यवस्थापन केले नाही त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिका-यांनी प्रथम वस्तीतील लोकांची समस्या सोडवावी.

अभियंता विज्ञान गायकवाड म्हणाले की, येथील लोकांचे जवळील शाळेत तात्पुरते पुनर्वसन करायला आम्ही तयार आहोत परंतु लोक दुसरीकडे जायला तयार नाहीत. चेंबर खचल्यामुळे पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. दुरुस्तीच्या कामात सततच्या पावसाचा अडथळा येत आहे. आम्ही लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

राम बोरकर म्हणाले की, येथील आजारी लोकांना शाळेत ठेवून काय उपयोग. त्याऐवजी त्यांना दवाखान्यात ठेवावे. येथील लोकांच्या आरोग्याला धोका होवू नये म्हणून योग्य काळजी घ्यावी. घरातून वाहणा-या पाण्याचा तातडीने बंदोबस्त करावा.

गायत्री लांडे म्हणाल्या की, वस्तीमध्ये वाहणा-या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात प्रशासनाला पुर्णपणे अपयश आले आहे. पावसाचे पाणी आणि घराच्या फरशीतून निघणारे पाणी यामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. आत्तापर्यंत अशी घटना कधीच झाली नव्हती. लोकांची या प्रश्नातून सुटका व्हावी यासाठी महापालिकेने युध्दपातळीवर काम करुन नागरिकांना दिलासा द्यावा.

Web Title: Drainage Water Into 150 Houses In Rajput Slums

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top