
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचा वर्धापन दिन सोहळा व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
जल्लोषपूर्ण वातावरणात नाट्य परिषदेच्या पुरस्कारांचे वितरण
पुणे - ज्येष्ठ आणि नवोदित कलाकारांचा सन्मान, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांनी हाऊसफुल्ल झालेले बालगंधर्व रंगमंदिर, प्रत्येक पुरस्काराची घोषणा होताक्षणी होणारा टाळ्यांचा कडकडाट आणि जोडीला कसदार मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे सादरीकरण... अशा जल्लोषपूर्ण वातावरणात बुधवारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचा वर्धापन दिन सोहळा व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी लीला गांधी, भालचंद्र पानसे, अजित सातभाई, सुहासिनी देशपांडे, सुरेश देशमुख, जयमाला इनामदार, रजनी भट, अनंत मेहेंदळे तसेच परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष विजय पटवर्धन, कार्याध्यक्ष दीपक रेगे आदी उपस्थित होते. यावेळी रंगभूमीवरील प्रदीर्घ सेवेसाठी रवींद्र खरे यांना तर अखंड नाट्यसेवेसाटी सुनील गोडबोले या ज्येष्ठ रंगकर्मींना सन्मानित करण्यात आले. संगीत क्षेत्रातील दीर्घकालीन सेवेबद्दल राजीव परांजपे यांना तर उत्कृष्ट गद्यनट म्हणून श्रीराम रानडे यांना गौरवण्यात आले. यासह संदेश बेंद्रे, आदित्य मोडक, नितीश पाटणकर, डॉ. संजीव पाटील, बाळू निकाळजे, सुरेंद्र माजगावकर, नंदा-उमा इस्लामपुरकर, अमोद देव, उन्नती कांबळे, अंकिता शिवतरे, प्रदीप जाधव, हिराबाई सदाशिव कांबळे, दयानंद घोटकर, बाळू वाघुले, चैतन्य देशमुख, सुधीर फडतरे आणि ऋजुता देशमुख यांनाही विविध पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले.
पारितोषिक वितरणासह यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. स्वाती दातार यांच्या शिष्या, ‘अभिरंग, पुणे’ व ‘नटरंग ॲकॅडमी’ संस्थेचे कलाकार, ‘राजा सिंह’ या नाटकातील कलाकार तसेच बाळू निकाळजे, संजय मगर, दयानंद घोटकर, सुरेंद्र माजगांवकर, चैताली माजगांवकर, नंदा आणि उमा इस्लामपुरकर यांनी सादरीकरण केले. संजीवकुमार पाटील, मेघा पाटील, निता दोंदे, आशुतोष नेर्लेकर, केतन क्षीरसागर, आरती पाठक आणि योगिनी पोफळे यांनी सूत्रसंचालन केले. मेघा पाटील यांनी लेखन केले. दीपक रेगे आणि विजय पटवर्धन यांनी दिग्दर्शन केले.
बालगंधर्वच्या पुनर्विकासाच्या विरोधाचा पुनुरुच्चार
ज्येष्ठ रंगकर्मी रजनी भट यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाला विरोध असल्याचा पुनुरुच्चार केला. ‘बालगंधर्व रंगमंदिर हे कलाकारांसाठी मंदिरासारखेच पवित्र आहे. त्यावर घाला घालण्यापूर्वी कलाकारांवर घाला घालावा लागेल. अजून पंचवीस वर्षे तरी ही वास्तू व्यवस्थित असेल. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर पाडू नये’, अशी मागणी त्यांनी केली.
Web Title: Drama Conference Award Distribution Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..