
मिसाईल वूमनच लोकमान्य पुरस्काराने सन्मान
पुणे : चीनपासून अमेरिकेपर्यंत सर्वांनाच धडकी भरविणाऱ्या अग्नी-५ या क्षेपणास्राच्या(Agni-5 Missile) निर्मात्या आणि भारताच्या मिसाईल वुमन डॉ. टॅसी थॉमस (Tessy Thomas)यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित या पुरस्कार कार्यक्रमाला लोकमान्य टिळक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक, डॉ. गीताली टिळक आणि डॉ. रोहीत टिळक उपस्थित होते. देशाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) अॅरोनॅटीकल सिस्टम विभागाच्या महासंचालक म्हणून डॉ. थॉमस कार्यरत आहेत.
क्षेपणास्र प्रणाली विकसित करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या महिला शास्रज्ञ आहेत. पुरस्काराला उत्तर देताना डॉ. थॉमस म्हणाल्या,‘‘लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. टिळकांची स्वातंत्र्याची कल्पना ही आज आत्मनिर्भर भारताच्या रूपाने आपल्या समोर आहे. तीस वर्षांपूर्वी डॉ.कलामांनी स्वदेशी क्षेपणास्र निर्मितीचे प्रयत्न सुरू केले. त्यांनी दाखविलेले आत्मनिर्भरतेचे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले आहे. आज आपण क्षेपणास्रांपासून तेजस सारख्या लढाऊ विमानांच्या निर्यातीपर्यंतची मजल मारली आहे.’’
पाटील म्हणाले, ‘‘माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा वारसा डॉ. थॉमस चालवत आहे. अग्नी-५ या क्षेपणास्राच्या निर्मितीत योगदान असलेल्या डॉ. थॉमस यांनी देशाची संरक्षण क्षमता कैक पटींनी वाढविली आहे.’’ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाची मान उंचविणाऱ्या महिला शास्रज्ञाची पूजा बांधण्याचे काम या पुरस्काराच्या रूपाने झाले आहे, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘देशात कोणतेही सरकार येवू, शास्रज्ञांचे काम अविरत चालू असते. शास्रज्ञांच्या यशाचे श्रेय घेण्याचे काम कोणतेच सरकार करू शकत नाही.’’ देशाच्या जडणघडणीत मूलभूत योगदान देणाऱ्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येत असल्याचे डॉ. दीपक टिळक यांनी सांगितले.
Web Title: Drdo Scientist Tessy Thomas Agni 5 Missile Receive Tilak National Award
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..