Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial : शंभूभक्तांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

श्रीक्षेत्र तुळापुरात छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम वेगात सुरू.
vadhu budruk chhatrapati sambhaji maharaj Memorial
vadhu budruk chhatrapati sambhaji maharaj Memorialsakal
Updated on

केसनंद - स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र तुळापूर व श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथील महाराजांच्या समाधिस्थळी शंभूराजांच्या जाज्वल्य पराक्रमाला साजेसे जागतिक दर्जाचे स्मारक साकारण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या विकास आराखड्यानुसार श्रीक्षेत्र तुळापुरात छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम वेगात सुरू आहे. शंभूराजेंच्या स्मारकाच्या या कामातून अनेक वर्षांचे स्वप्न साकार होणार असल्याने शंभूभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

छत्रपती शंभूराजांच्या जाज्वल्य पराक्रमाला साजेसे जागतिक दर्जाचे स्मारक साकारण्यासाठी शासनाने श्रीक्षेत्र वढू बुद्रुक व तुळापूरसाठी सुमारे ३९७ कोटींचा विकास आराखडा मंजूर केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात त्यासाठी २७० कोटी रुपये मंजूर केल्याने श्रीक्षेत्र तुळापूर येथे स्मारकाच्या कामास वेगात सुरुवात झाली आहे.

या आराखड्यात ३ डी प्रोजेक्शन, मॅपिंग, होलोग्राफी, मोशन सिम्युलेशन आदी अत्याधुनिक संकल्पनांचा वापर करून महाराजांशी संबंधित ऐतिहासिक घटनांचं सादरीकरण दिसणार आहे. तर अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या सादरीकरणाला एक प्रकारचा जिवंतपणा येणार आहे. तर स्मारकाच्या उभारणीमध्ये दगडी कातीव, कोरीव बांधकाम करत मजबूत बांधकाम करण्यात येणार आहे.

श्रीक्षेत्र तुळापूर येथे आठ एकर जागेमध्ये १६व्या शतकातील मराठा स्थापत्यकलेला साजेसे असे स्मारक साकारले जात आहे. यामध्ये कोरीव कामासह दगडी भिंती व सागवानी लाकडाच्या वापरातून ४० फूट उंच व २० फूट रुंद असे भव्य प्रवेशद्वार उभारले जात आहे.

प्रवेशद्वारातून आत आल्यावर भव्य बलिदानस्थळ परिसर व त्यामागे १०० फूट लांब व १०० फूट उंचीच्या दगडी भिंतीत ६५ फूट उंचीचे शंभुराजांचे प्रतिकात्मक शिल्प साकारण्यात येणार आहे. या शिल्पाचे प्रतिबिंब ‘पाथ ऑफ रिफ्लेक्शन’ धर्तीवर समोरील पाण्यात दिसणार आहे.

त्याशेजारी प्रशासकीय इमारत व ऐतिहासिक संग्रहालय उभारले जात असून, त्यात विविध भाषेत स्वयंचलित ध्वनिफितीद्वारे ऐतिहासिक संदर्भासह माहिती शंभुभक्तांना मिळणार आहे. त्यालगतच ऐतिहासिक काळातला सदर बाजार, तसेच शेजारी ८२ आसन क्षमतेचे प्रेक्षागृह उभारले जात असून, त्यात आधुनिक १०डि तंत्रज्ञानासह ऐतिहासिक प्रसंगाचे चित्रण शंभुभक्तांना अनुभवण्यास मिळणार आहे.

त्यासोबतच ऐतिहासिक ग्रंथालय, दगडी तटबंदी, भीमा नदीकाठी त्रिवेणी संगमाचे आकर्षक दृष्य पाहण्यासाठी अष्टकोनी प्रेक्षक व्हीविंग गॅलरी उभारण्यात येत आहे. त्यालगतच भीमा- भामा- इंद्रायणीच्या त्रिवेणी संगमावर जाण्यासाठी नदीकाठी ५०० मीटर लांबीचा घाटही बांधण्यात येणार आहे.

या संपूर्ण स्मारकाचे तसेच विशाल त्रिवेणी संगमाचे आकर्षक दृष्य डोळ्यात साठवण्यासाठी भीमा नदीवर १८ मीटर रुंद आणि २३० मीटर लांबीच्या पुलावर अष्टकोनी आकाराचे व्हीविंग डेकही असणार आहेत. या पुलामुळे परिसराचे सुंदर दृश्य व स्मारक पाहिल्यानंतर आपटीमार्गे वढू येथील स्मारकाकडे जाता येणार आहे.

वढू बुद्रुकलाही भव्य स्मारक

तुळापूरप्रमाणेच श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथेही भव्य स्मारक साकारण्यात येणार आहे. येथील आराखड्यानुसार ४० फूट उंच व २० फूट रुंद भव्य प्रवेशद्वार, तर ६५ फुटी ३२ खांबातून ठराविक ठिकाणाहून दिसणारे शंभूराजांचे इन्व्हिजिबल शिल्प, तसेच वढू बुद्रुक व तुळापूर येथेही प्रत्येकी ६.५० कोटींचा भव्य १०० फुटी हिंदवी ध्वज, समाधिस्थळ, मेघडंबरी, संग्रहालय, ग्रंथालय, तटबंदी यासह भीमा नदीवरील आकर्षक संरक्षक घाट, वाहनतळ, होलोग्राम आधारित चित्रफीत, शंभूराजांच्या कालखंडातील सदर बाजार पेठ अशा विविध संकल्पनांमधून शंभूराजांच्या पराक्रमाला साजेसे भव्य स्मारक साकारण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

श्रीक्षेत्र तुळापूर तसेच वढू येथे साकारणारे ऐतिहासिक स्मारक स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या जाज्वल्य पराक्रमाची साक्ष देणारे व अनेक पिढ्यांसाठी स्फूर्ती व प्रेरणादायक ठरणार असल्याने आम्ही या स्मारक उभारणीत अत्यंत बारकाईने लक्ष देत आहोत. वढू येथील कामही जागा उपलब्ध झाल्यानंतर वेगात पूर्ण करण्यात येईल. दरम्यान, स्मारक उभारणीच्या या कामाच्या माध्यमातून धर्मवीर छत्रपती शंभूराजेंच्या प्रेरणादायी स्मृती जपण्याची व राजांची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे समाधान आहे.

- संजय गावडे, स्मारक प्रकल्पाचे कंत्राटदार

परिसराचा होणार ऐतिहासिक कायापालट

वढू-तुळापूर ही दोन्ही तीर्थस्थळे जोडली जाऊन या परिसराचा आणखी मोठा विकास व्हावा, यासाठी तुळापूर ते वढू बुद्रुकला जोडणारा भूसंपादनासह सुमारे ३४ कोटी ८६ लाख खर्चाचा वढू बुद्रुक ते वढू खुर्द पूलही उभारण्यात येत आहे. तसेच, भीमा नदीवर आपटी ते तुळापूर या पुलाचेही नियोजन असल्याने या संपूर्ण ऐतिहासिक परिसराचा कायापालट नजीकच्या काळात पाहावयास मिळणार आहे.

सध्या तुळापूर येथे स्मारकाचे, प्रवेशद्वार, प्रशासकीय इमारत, व्हिविंग गॅलरी, नदीघाट, सदर बाजार तसेच म्युझियमच्या इमारतीचे जुन्या शैलीतील दगडी काम पारंपरिक पिढीजात कारागिरांच्या माध्यमातून वेगात सुरू आहे, तर सध्या एकूण काम ४० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून येथील स्मशानभूमीचे स्थलांतर झाल्यानंतर जुन्या ऐतिहासिक नदीघाटाला जोडूनच नव्या २२० मीटर लांबीच्या सलग घाटाचे कामही पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच, इतिहासकार, शिल्पकार यांच्या माध्यमातून पुतळा उभारणीसाठीचीही कार्यवाहीही कलासंचालनालयाकडून करण्यात येत आहे.

- जान्हवी रोडे, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com