दुष्काळग्रस्तांचे लोंढे पुण्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

गावाकडं पोट भरायचं साधन नाय. शहरात कामधंदा मिळतो. थोडंफार पैसे मिळतात. त्यातून कसाबसा पोटाचा प्रश्‍न मिटतो; पण गावाकडं पाठवायला पैसाच उरत नाही. 

-विनोद भुसे, कोथरूड 

पुणे : "पाऊस अवकाळी झाला आहे. रान उदास झालंय, विहिरी-नद्या-नाले कोरडे झालेत. गवत वाळून चाललंय. उभी पिकं करपून जात आहेत. शेतकऱ्यानं कसं जगायचं... अशा व्यथा मांडत ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, रोजगाराच्या शोधात शहरात दाखल झाले आहेत. निदान शहरात तरी हाताला काम मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. ही संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. 

राज्यातील 34 पैकी 22 जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात अनेक लोंढे शहरात येत आहेत. शहरात खडकी, शिवाजीनगर, कात्रज, स्वारगेट, हडपसर, कोथरूड, औंध, वारजे माळवाडी, पद्मावती आदी परिसरात तसेच शहरालगतच्या औद्योगिक वसाहतींमध्ये हे दुष्काळग्रस्त दिसत आहेत. मॉल, सिक्‍युरिटी गार्ड, केटरर्स, हॉटेलमध्ये मिळेल ते काम करून ते गुजराण करीत आहेत. त्यात थोडेफार शिकलेले तरुण वृत्तपत्रांमधील तसेच भिंतीवर चिटकवलेल्या जाहिराती न्याहाळत कामाच्या शोधात रस्त्यांवर दिसून येत आहेत. 

शहरात राहण्याचा प्रश्‍न असल्याने अनेक जण मिळेल तिथे पथारी टाकत आहेत, तर काही जण झोपडपट्टी-वस्त्यांमध्ये नातेवाइकांच्या आश्रयाने राहत आहेत. स्थलांतरामुळे अनेकांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा अर्ध्यावर सुटली आहे. त्यातूनही नवे प्रश्‍न त्यांच्यासमोर उभे राहिले आहेत. 

पुणे चांगलं शहर आहे. काही दिवस कंपाउंडर म्हणून काम केलं. काही दिवस दुकानात मालविक्री केली. शहरं जगवतात, गावाकडं जगणं मुश्‍किल आहे. 

- गजानन महाडिक, वारजे माळवाडी 

पावसानं पाठ फिरविली अन शेतीही अडचणीत आली. म्हणून सोलापुरात एक हॉटेलात काम केलं. तथं पैसे मिळालं म्हणून पुणं गाठलं. रात्रपाळीत सिक्‍युरिटी गार्ड म्हणून लागलो. काही का होईना हातात काम आहे. दुष्काळ जिवावर उठलाय. 

- अर्जुन सुकळे, शिवाजीनगर 

गावाकडे वावरात काम नाही. रोजच्या रोज मजुरी हातात येईलच, हे पण सांगता येत नाही. इथं विद्यापीठात ठेकेदाराकडून झाडू मारायचं काम मिळालंय. महिन्याकाठी पगार मिळतो; पण साऱ्या गरजा त्यातून भागत नाहीत. 

- सयाजी कांबळे, औंध 

एका खासगी गाडीवर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रवास आणि खोकी उचलावी लागतात. गावी पाणी नाही म्हणून नाइलाजास्तव शहरात यावं लागलं. 

-रूपेश हातोळे, कोथरूड 

Web Title: Drought Affected Peoples Shifted in Pune