

सोमाटणे, ता. १९ : दुष्काळी परिस्थितीमुळे पशुखाद्य आणि चाऱ्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, कडबा व खुराकाची टंचाई निर्माण झाली आहे. पैसे देऊनही वेळेवर पुरेसा चारा उपलब्ध होत नसल्याने पवनमावळातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
शेतीला जोडधंदा म्हणून पवनमावळातील शेतकरी गेल्या अनेक पिढ्यांपासून गाय, म्हैस आदी पशुपालनाचा व्यवसाय करतात. मावळात ओल्या चाऱ्याचे उत्पादन होत असले, तरी कडबा आणि खुराक बाहेरील भागातून आणावा लागतो. सध्या मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगर आदी भागांत दुष्काळी परिस्थिती असल्याने तेथील शेतकऱ्यांनी कडब्याची विक्री बंद केली आहे. त्यामुळे पवनमावळात कडब्याची आवक थांबली असून, त्याचा मोठा फटका येथील पशुपालकांना बसत आहे.
सध्या उसाचे वाढे प्रतिक्विंटल ५०० रुपये, ऊस ५५० रुपये, गव्हाचा भुसा दोन ते तीन हजार रुपये, तर खुराकाचे दर प्रतिक्विंटल अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. दुसरीकडे, दुधाच्या दरात मात्र त्या तुलनेत फारशी वाढ झालेली नाही. सध्या गायीचे दूध ४५ रुपये, तर म्हशीचे दूध ६५ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.
चारा आणि खुराकाच्या वाढत्या किमतींमुळे पशुपालनाचा खर्च वाढला आहे. आगाऊ पैसे देऊनही वेळेवर पुरेसा कडबा व खुराक मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांचे संगोपन करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने पशुपालकांना अनुदानावर चारा उपलब्ध करून द्यावा किंवा चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे कडबा आणि खुराकाची टंचाई निर्माण झाली आहे. आगाऊ पैसे देऊनही वेळेवर माल उपलब्ध होत नसल्याने पुरवठा करणे कठीण झाले आहे. शासनाने चारा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
- शेखर मुऱ्हे, खुराक व चारा पुरवठादार, सोमाटणे
पशुपालन हा शेतकऱ्यांसाठी चांगला जोडधंदा आहे. मात्र, दुष्काळामुळे चारा आणि खुराकाची टंचाई निर्माण झाली असून, पशुपालकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करावी.
- दिलीप राक्षे, दूध उत्पादक शेतकरी, साळुंब्रे
PNE26W66741
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.