

दुष्काळात दूध उत्पादक तरतील
---
शेती परवडत नसताना निश्चित भाव मिळवून देणारे आणि दर दहा दिवसाने विक्रीचे पैसे हाती देणारे दूध हे एकमेव साधन शेतकऱ्यांच्या हाती आहे. मात्र, दुष्काळी स्थितीमुळे पाणी व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर दूधधंद्याचे सध्याचे अर्थचक्र विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांच्याशी केलेली बातचीत :
—-----
मनोज कापडे
--------
यंदाचा दुष्काळ दूधधंद्याच्या मुळावर उठणारा ठरेल, अशी भीती व्यक्त केली जातेय. त्याबद्दल काय सांगाल?
- मला तसे वाटत नाही. दुष्काळाच्या झळा दूधधंद्याला लागतील यात शंका नाही. मात्र, शेतकऱ्यांपासून ते डेअरी प्रकल्पांपर्यंत दूधधंद्याची नीटपणे बसलेली घडी पूर्णपणे विस्कळीत होईल, असे मला वाटत नाही. हे विधान मी धाडसाने का करतोय, कारण मी डेअरी उद्योगाचा गेल्या ४० वर्षांचा प्रवास बघतोय आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी यापूर्वीही अनेकदा दुष्काळाच्या झळा सोसल्या आहे. परंतु, दरवेळी ते अधिक सजग झाले आहे. दुष्काळातही शेतकऱ्यांनी दुधाचे उत्पादन घटू दिलेले नाही. हे का घडते तेदेखील मी तुम्हाला सांगतो. दुधाचे इतर शेतमालासारखे नाही. शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेला कांदा किंवा इतर कोणत्याही शेतमालाचा भाव अचानक कोसळतो. त्यानंतर एका क्षणात त्या शेतमालाची माती होते. दुधाचे तसे नाही. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीत दुधाचा वाटा मोठा आणि महत्त्वाचा राहिला आहे. कारण, दुधाचे दर सतत स्थिर असतात. दुधाचे दर घटत नाही, असे मला म्हणायचे नाही. मात्र, इतर शेतमालासारखे ते मोठ्या प्रमाणात कोसळतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दूध रस्त्यावर ओतावे लागते, असे नेहमी होत नाही. दुधाचे बाजार १-२ रुपयांनी कमी होतात आणि तसेच ते वाढतही जातात. दुधाच्या बाजारात तुलनेने स्थिरता असते. खासगी किंवा सहकारी दूध प्रकल्पांकडून खरेदी केलेल्या दुधाचे पैसे संबंधित शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे न चुकता ठरलेल्या तारखांना मिळत आहेत. त्यामुळे माझ्या शेतातील कोणत्याही पिकाने दगा दिला तरी दूध मला वाऱ्यावर सोडणार नाही, दुधाचे पैसे हमखास मिळतीलच, अशा विश्वास दूध उत्पादक शेतकऱ्याला असतो. या विश्वासाला यापूर्वीच्या कोणत्याही दुष्काळात डेअरी उद्योगाने तडा जाऊ दिलेला नाही. तुम्हाला मी खात्रीने सांगतो की, या दुष्काळातदेखील शेतकऱ्यांना त्यांच्या दर्जेदार दुधाला चांगली किंमत मिळेल. तसेच, दूध उत्पादक शेतकरीसुद्धा कितीही प्रतिकूल स्थिती आली तरी तरतील, ते चारा पाण्याचे योग्य नियोजन करतील आणि निर्भेळ दुधाचा पुरवठा जिद्दीने चालू ठेवतील.
शेतकऱ्यांना दुधाचे दर कसे मिळतील?
- दुधाला दर यापुढेही चांगलेच मिळतील. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या म्हणजेच एफडीएच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची झालेली नियुक्ती दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडली. तुमच्या लक्षात येईल त्यांची नियुक्ती झाल्यानंतर दुधाच्या खरेदीदरात सतत वाढ झालेली आहे. गेल्या काही महिन्यात खरेदी दरात एकूण पाच रुपयांची वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांना यापुढेही दुधाला चांगले दर मिळत राहतील. माझ्या मते, दुष्काळाची तीव्रता वाढत जात असताना दुसऱ्या बाजूला दुधासाठी मागणी वाढत राहील व त्यातून शेतकऱ्यांना खरेदी दरात एकूण ४-५ रुपयांची वाढ मिळण्यास अनुकूल स्थिती राहील. म्हणजेच आधी गाय दुधासाठी शेतकऱ्याला प्रतिलिटर ३७ रुपये दर मिळत होता. तो वाढत जात आता ४२ रुपयांपर्यंत गेला व यापुढेही हा दर वाढता राहील व ४५ रुपयांच्या पुढे जाईल. त्यामुळे शेतकरी दुभती जनावरे जिवापाड सांभाळतील. त्यांच्या चारा, पाण्याची व्यवस्था करतील. बागायती भागात दुभत्या जनावरांच्या संगोपनात कमी अडचणी येतील; परंतु कोरडवाहू भागात अडचणी वाढतील. तरीदेखील कोरडवाहू भागातील दूध उत्पादक शेतकरीसुद्धा ऐन दुष्काळात स्वतःचा दूध धंदा सावरतील, त्यासाठी खूप धडपड करतील. कारण, हमखास पैसा हवा असल्यास त्यासाठी संघर्ष करावाच लागेल, हे दूध उत्पादक शेतकरी चांगला जाणतो.
दुष्काळी स्थितीत सरकारने नेमके काय करायला हवे?
- सरकारला सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही. मात्र, चाऱ्याचे व्यवस्थित नियोजन, पुरवठा झाला तरी दूध उत्पादकांना आधार मिळेल. पश्चिम महाराष्ट्रातील बागायती भागात शेतकऱ्याला कसेबसे चारा नियोजन करता येईल. परंतु, विदर्भ, मराठवाड्यात बारकाईने लक्ष द्यावे लागेल. अर्थात, तेथेही चाऱ्याची स्थिती अतिशय वाईट आहे, असे नाही. काही माध्यमांकडून आत्तापासूनच थोडे अतिरंजित अंदाज दुष्काळाबाबत दिले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दुष्काळाबाबत अकारण भीती तयार होते आहे. दुष्काळाबाबत शेतकऱ्यांना घाबरवून सोडणारी माहिती देण्यापेक्षा त्यांना दुष्काळाशी दोन हात करायला उपयुक्त ठरणारी माहिती द्यायला हवी. अर्थात, दुष्काळात कसे नियोजन करायचे हे शेतकरी जाणतो. दुष्काळी स्थितीतदेखील जगण्याचा मार्ग विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच शोधलेले होते. त्यामुळेच तर या भागातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर राज्यभर पसरले. तुम्ही बघाल काहीही झाले तरी दुष्काळी भागातील मजूरदेखील आपली जनावरे वाऱ्यावर सोडत नाही. तो ऊस तोड मजुरीचे काम करतो आणि उसाचे वाढे आपल्या जनावरांना घालतो. त्यांना जगविण्यासाठी तो धडपडतो. राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाची चाहूल गेल्या एक दोन महिन्यांपासून लागलेली आहे. खरिपात शेतकऱ्यांना ज्वारी मिळालेली नाही. मात्र, त्याचा कडबा मिळालेला आहे. पीक हाती लागलेले नाही. परंतु, त्यातून थोडा चारा निश्चित मिळालेला आहे.
दुष्काळाची चाहूल गेल्या महिन्यात लागल्याचे तुम्ही म्हणता; मग दुधाचे उत्पादन घटले आहे का?
- नाही. मी तेच सांगतोय ना की दुष्काळी स्थितीतदेखील राज्यातील शेतकरी दुधाचे उत्पादन घटू देत नाहीत. उलट मागील एक दोन महिन्यात दुधाचे उत्पादन वाढलेले आहे. दुधामधील भेसळ कमी झालेली आहे. एफडीएच्या यंत्रणेने दूध भेसळीतील माफियांना वठणीवर आणलेले आहे. यामुळे निर्भेळ दुधाचे दर वाढले आहेत. दर वाढल्यामुळे शेतकरी अधिक काळजी घेत दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करतो आहे. दुधाला चांगला दर मिळू लागला की शेतकऱ्यांनादेखील गायीगुरांचे, गोठ्याचे नीट नियोजन करणे शक्य होते.
तुकाराम मुंढे यांच्यामुळे डेअरी उद्योगात नेमका काय बदल झाला आहे?
- डेअरी उद्योगातील भेसळखोरांना त्यांनीच धडा शिकवला. हे काम यापूर्वी कोणालाही जमले नव्हते. दुधात भेसळ किती प्रमाणात व्हायची, ती करणारी मंडळी कोण आहेत, यावर मी मत व्यक्त करणार नाही. मात्र, अशा लोकांवर आता कारवाई होत आहे. काही डेअऱ्यांना कुलपं ठोकण्यात आली, काहींना गजाआड केले गेले, काहींना भेसळधंद्यांतून पळवून लावले. सध्या दुधातील भेसळीला ९० टक्के आळा बसला आहे. तुम्हाला सांगतो, काही ठिकाणी दूध उत्पादकांकडून दुधात पाणी टाकण्याचे प्रकार होत होते. मात्र, त्यालाही आता आळा बसला आहे. झाले ते चांगलेच झाले. त्यामुळे दुधाची गुणवत्ता वाढली असून यातून दूध उत्पादकांची विश्वासार्हता आता वाढली आहे. दुधाळ जनावरांना ऑक्सिटोसिन इंजेक्शन देण्याचे प्रकारदेखील थांबले आहेत.
दुष्काळी स्थितीत डेअरी उद्योगाने काय भूमिका घ्यावी, असे तुम्हाला वाटते.
- डेअरी उद्योगाने या राज्यातील शेतकऱ्यांच्या निर्भेळ दुधाला चांगला दर द्यावा, इतकीच माझी अपेक्षा आहे. शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा मोबदला दिल्यास तो कोणत्याही परिस्थितीत गुणवत्तापूर्ण उत्पादन विक्रीसाठी आणतो. शेतकऱ्याला दुधासाठी चांगला खरेदी दर द्यायलाच पाहिजे. दर चांगले मिळाल्यास तो कोठूनही चारा, पाणी आणेल. तो जनावरांना प्रतिकूल स्थितीत सांभाळेल. मात्र, हमाली खूप आणि दुधाला दाम नाही, अशी स्थिती झाल्यास शेतकरी मागे हटतो. त्यामुळे शेतकऱ्याला सरकारने मदत करायची असल्यास ती चाऱ्यासाठी करावी आणि डेअरी उद्योगाने मदत करायची असल्यास शेतकऱ्याला चांगला दर द्यावा, असे मला वाटते. सध्या राज्यातील शेतकरी रोज अंदाजे एक कोटी ६० लाख लिटरहून अधिक दुधाचा पुरवठा करीत आहेत. पुढे दुष्काळाची तीव्रता वाढत जाईल. पण, जर तुम्ही शेतकऱ्यांना चांगला दूध दर दिल्यास ते ऐन दुष्काळातदेखील दूध पुरवठ्यात घट येऊ देणार नाहीत, अशी मला खात्री वाटते.
-----
संपर्क : प्रकाश कुतवळ
९६०४३३२२५५
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.