दुष्काळाचा बाजार समित्यांनाही फटका सोयाबीन आवकेत मोठी घट; आगामी काळात आर्थिक अडचणींची शक्यता

दुष्काळाचा बाजार समित्यांनाही फटका सोयाबीन आवकेत मोठी घट; आगामी काळात आर्थिक अडचणींची शक्यता
Published on: 

सोयाबीन आवक घटल्याने
बाजार समित्यांचे उत्पन्न घटणार

ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीनच्या उत्पादकतेत ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. त्याचा परिणाम कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतमालाच्या आवकेवरही दिसून येत आहे. दसऱ्यानंतर सोयाबीनची आवक वाढून बाजारातील उलाढालीला वेग येतो. मात्र, यंदा उत्पादनात मोठी घट झाल्याने सोयाबीनची आवक निम्म्यापेक्षाही कमी होत असल्याचे सांगितले जाते. यामुळे बाजार समित्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, आगामी काळात त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे या क्षेत्रातील जाणकार आतापासूनच सांगू लागले आहेत.
यंदा पावसाने ओढ दिल्याने खरिपातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी एकरी एक क्विंटलही उत्पादन झालेले नाही, तर काही भागांत एकरी दोन ते तीन क्विंटल उतारा मिळत आहे. परिणामी, सोयाबीनची सरासरी उत्पादकता ५० टक्क्यांपेक्षाही खाली घसरल्याचे चित्र आहे. बाजारात सोयाबीनचे दर सात हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. आता हे दर सात हजार रुपयांच्या आत आले आहेत.
अकोला बाजारपेठेत सध्या दररोज सुमारे तीन हजार क्विंटलच्या आत सोयाबीनची आवक होत आहे. दरवर्षी याच कालावधीत यापेक्षा दीड ते दुप्पट आवक होते. तालुकास्तरावरील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक काही क्विंटलपर्यंतच मर्यादित राहिली आहे. त्यामुळे बाजार समित्यांमधील व्यवहारांची उलाढालही घटली आहे.
शुक्रवारी (ता. ३०) अकोला बाजार समितीत सोयाबीनची २ हजार ४९० क्विंटल आवक झाली. हरभऱ्याची ४६३ क्विंटल, तर तुरीची ३२८ क्विंटल आवक नोंदविण्यात आली. इतर शेतमालाची आवक नगण्य राहिली. त्यामुळे यंदाच्या हंगामात दुष्काळाचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर शेतमालाच्या व्यापारावर अवलंबून असलेल्या बाजार समित्यांनाही बसत असल्याचे स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.