‘दुष्काळात पीक, चाऱ्याचे नियोजन आवश्यक’

‘दुष्काळात पीक, चाऱ्याचे नियोजन आवश्यक’
Published on: 

नारायणगाव, ता. १८ : दुष्काळजन्य परिस्थितीत हवामानातील अनिश्चितता, पाणीटंचाईच्या काळात पिके, जनावरे आणि उपलब्ध संसाधनांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. दुष्काळजन्य परिस्थितीत पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे पिकांची वाढ, उत्पादन व जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पीक व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन आणि पर्यायी रोजगाराचे योग्य नियोजन आवश्यक आहे, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष, कृषिरत्न अनिल मेहेर यांनी दिला आहे.

पिकांचे व्यवस्थापन करताना घ्यावयाची काळजी
- उपलब्ध पाण्याच्या प्रमाणानुसार कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करावी.
- पिकांच्या संवेदनशील वाढीच्या अवस्थेत पाणी देण्यास प्राधान्य द्यावे.
- ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा.
- पिकांमध्ये आच्छादन (मल्चिंग) करून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवावा.
- अनावश्यक आंतरमशागत टाळावी, जेणेकरून जमिनीतील ओलावा टिकून राहील.
- पिकांमध्ये तणांचे नियंत्रण करून पाणी व अन्नद्रव्यांची स्पर्धा कमी करावी.

रब्बी हंगामासाठी नियोजन
- कमी कालावधीच्या व कमी पाण्यात येणाऱ्या वाणांची निवड करावी.
- पाण्याची उपलब्धता निश्चित करूनच क्षेत्र नियोजन करावे.
- पाण्याअभावी मोठ्या क्षेत्रावर गहू, कांदा लागवड करण्याचे नियोजन टाळावे.
- हरभरा, ज्वारी यांसारख्या तुलनेने कमी पाणी लागणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे.
- जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी रुंद वरंबा-सरी किंवा योग्य सरी पद्धतीचा वापर करावा.
- पेरणीपूर्वी बियाण्यांची जैविक बीजप्रक्रिया करावी.

पाणी व्यवस्थापन
- शेततळ्यात उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर काटेकोरपणे करावा.
- ठिबक व तुषार सिंचनाचा वापर वाढवावा.
- शेतातील पाण्याची गळती व अनावश्यक प्रवाह थांबवावा.
- पावसाचे पाणी अडविण्यासाठी बांधबंदिस्ती, समतल चर व शेततळ्यांची व्यवस्था करावी.
- विहीर व कूपनलिकेतील पाण्याचा वापर नियोजनपूर्वक करावा.

जनावरांचे व्यवस्थापन व चारा नियोजन
- जनावरांना स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.
- जनावरांना सावलीत ठेवावे व उष्णतेपासून संरक्षण करावे.
- हिरव्या चाऱ्याऐवजी उपलब्धतेनुसार मुरघास, वाळलेला चारा व कडबा वापरावा.
- चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी चारा कुट्टी यंत्राचा वापर करावा.
- संतुलित पशुखाद्य व खनिज मिश्रणाचा वापर करावा.

फळबागांचे व्यवस्थापन
- फळझाडांच्या बुंध्याभोवती पालापाचोळा, गवत किंवा सेंद्रिय आच्छादन करावे.
- ठिबक सिंचनाद्वारे मुळांच्या कार्यक्षेत्रात पाणी द्यावे.
- फळबागेतील अनावश्यक फांद्यांची छाटणी टाळावी. गरजेनुसार शास्त्रीय छाटणी करावी.
- नवीन लागवड क्षेत्र कमी ठेवावे व उपलब्ध पाण्याच्या क्षमतेनुसार नियोजन करावे.
- पाण्याचा ताण असताना अनावश्यक खतांची मात्रा व फवारण्या टाळाव्यात.
- फळबागेत आंतरपीक घेताना पाण्याची उपलब्धता विचारात घ्यावी.

शेतकऱ्यांनी करावयाच्या पर्यायी उपाययोजना
- शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय यांचे उपलब्ध संसाधनांनुसार नियोजन करावे.
- कमी पाण्यात तयार होणाऱ्या भाजीपाला व चारा पिकांचा विचार करावा.
- शेतमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन उपक्रम राबवावेत.
- शेतकरी उत्पादक कंपनी व बचत गटांच्या माध्यमातून सामूहिक उपक्रम राबवावेत.
- नुकसान झाल्यास विहित मुदतीत विमा कंपनीला कळवावे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूची: दुष्काळ व्यवस्थापन चेकलिस्ट
- उपलब्ध पाण्याचा ताळेबंद तयार करणे
- पिकांचे क्षेत्र व पाणी उपलब्धतेनुसार नियोजन
- ठिबक किंवा तुषार सिंचनाची दुरुस्ती
- शेतातील आच्छादनाची व्यवस्था
- जनावरांसाठी पिण्याचे पाणी व चारा साठवणे
- मुरघास तयार करणे व चारा कुट्टी करणे
- पावसाचे पाणी अडविण्याची कामे करणे


08910

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.