

राज्यात आतापर्यंत केवळ
आठ टक्के रब्बी पेरणी
पावणे पाच लाख हेक्टर क्षेत्रापैकी दोन लाख हेक्टरवर ज्वारी
सूर्यकांत नेटके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः राज्यात यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बीच्या पेरण्यांना मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या केवळ आठ टक्के म्हणजे ४ लाख ५९ हजार २१० हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीचा वाटा सर्वाधिक असून, २ लाख ३ हजार ५४० हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी संपूर्ण रब्बी हंगामात ज्वारीची १३ लाख ८९ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.
गेल्या वर्षी दिवाळीनंतरही परतीचा पाऊस सुरू होता. त्यामुळे ज्वारीची पेरणी उशिराने झाली होती. यंदा मात्र आता पेरणीची शक्यता मावळल्यासारखी आहे. रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, हरभरा आणि गव्हाचे क्षेत्र अधिक असते. परंतु, यंदा ज्वारी आणि हरभऱ्याचा पट्टा असलेल्या भागातच दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याचे आतापर्यंतच्या पेरणीच्या स्थितीवरून दिसून येत आहे.
राज्यात रब्बीचे सरासरी ५७ लाख ८० हजार ४१७ हेक्टर क्षेत्र आहे. रब्बीमध्ये प्रामुख्याने ज्वारी, मका, गहू आणि हरभरा ही पिके अधिक घेतली जातात. ज्वारीची साधारणतः ३० ऑक्टोबरपर्यंत पेरणी केली जाते. जानेवारीपर्यंत गव्हाची, तर डिसेंबरअखेरपर्यंत हरभऱ्याची पेरणी होते. यंदा रब्बीच्या पेरण्यांवर दुष्काळी स्थिती आणि पावसाच्या अभावाचा गंभीर परिणाम झाला आहे. आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या केवळ आठ टक्के म्हणजे ४ लाख ५९ हजार २१० हेक्टरवर पेरणी झाली आहे.
राज्यात प्रामुख्याने ज्या जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते, त्याच भागात यंदा तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे ज्वारीची पेरणी अपेक्षित प्रमाणात झालेली नाही. ज्वारीचे सरासरी १४ लाख ९५ हजार ७९२ हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत २ लाख ३ हजार ५४० हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या १४ टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या (२०२५-२६) संपूर्ण रब्बी हंगामात १३ लाख ८९ हजार हेक्टरवर, तर २०२४-२५ मध्ये १९ लाख ४१ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. गेल्या वर्षी परतीचा पाऊस उशिरापर्यंत सुरू असल्याने डिसेंबरमध्ये ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली होती. यंदा मात्र आता क्षेत्रवाढीची शक्यता फारच कमी आहे.
रब्बी हंगामात विदर्भात ज्वारीचे क्षेत्र अत्यल्प आहे. आतापर्यंत पेरलेल्या ज्वारीचे क्षेत्र बोटावर मोजण्याइतकेच आहे. सर्वाधिक पेरणी क्षेत्र अहिल्यानगर जिल्ह्यात असून, त्यापाठोपाठ सोलापूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा ज्वारीची अल्प पेरणी झाली आहे. राज्यात ज्या भागात ज्वारीचे क्षेत्र अधिक असते, त्याच भागाला दुष्काळाची तीव्र झळ बसत आहे. पाणी उपलब्ध नसल्याचा मोठा फटका ज्वारीच्या पेरणीला बसल्याचे पाहायला मिळत आहे.
हरभऱ्याचे सरासरी २५ लाख १६ हजार ६२७ हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत १ लाख ७८ हजार ५५१ हेक्टरवर म्हणजे सात टक्के पेरणी झाली आहे. हरभऱ्याची नोव्हेंबरअखेरपर्यंत पेरणी होते. शिवाय, कमी पाण्यावर येणारे पीक असल्याने अजूनही हरभऱ्याचे क्षेत्र वाढू शकते. दिवाळीनंतर एखादा अवकाळी पाऊस झाला, तर चाऱ्याच्या आशेने का होईना, ज्वारीचे क्षेत्र बऱ्यापैकी वाढू शकते. मक्याचे सरासरी क्षेत्र पावणे चार लाख हेक्टर असून, आतापर्यंत ४९ हजार ३१४ हेक्टरवर म्हणजे १३ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारी आणि हरभऱ्याचा पट्टा असलेल्या भागातच दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याचे आतापर्यंतच्या पेरणीच्या स्थितीवरून दिसून येत आहे.
चौकट
ज्वारीचे पेरणी क्षेत्र (हेक्टर)(कंसात सरासरी क्षेत्र)
धुळे : ९४० (११,९४४)
जळगाव : ९,४५९ (४४,७९७)
अहिल्यानगर : ३०,५१३ (१,६२,९०९)
पुणे : ८,२२६ (८८,३३७)
सोलापूर : २९,९९२ (२,७५,०८८)
सातारा : १५,२९१ (१,२३,७८४)
सांगली : २७,४२४ (१,२६,०२९)
कोल्हापूर : १,१६८ (११,८६७)
छत्रपती संभाजीनगर : १,६७१ (४४,११९)
जालना : ३,३५२ (१,०२,१५८)
बीड : ३८,३४२ (१,२८,१०९)
लातूर : २,७२० (३३,००९)
परभणी : १२,२४९ (९७,४६५)
हिंगोली : २,७४० (९,५६५)
बुलडाणा : २,१०४ (१६,१२०)
चौकट
चारा तरी होईल...
राज्यातील अहिल्यानगर, सोलापूर, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे तसेच सांगली आणि सातारा भागात रब्बी हंगामात ज्वारीचे क्षेत्र अधिक असते. यंदा खरिपातील पिके आली नाहीत. प्रशासनानेही पाणी उपलब्ध असलेल्या भागात चारा पिकांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे. ज्वारीचे पीक येवो अथवा न येवो, थोडीफार ज्वारी आली तर चारा तरी होईल, या आशेनेही अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी केल्याचे दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.