

वनविभागाचा चारा आता पशुपालकांना मिळणार
- गवत लिलाव बंद, कापणी, वाहतुकीसाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी
ॲग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुपालक आणि वन्यजीवांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वन विभागाच्या अखत्यारीतील क्षेत्रातील गवताचा लिलाव बंद करण्यात आला असून, हा चारा आता स्थानिक पशुपालकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच, चाऱ्याच्या वापर आणि वितरणापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
वनक्षेत्रातील गवताची कापणी, बांधणी आणि वाहतुकीसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. चाऱ्याची तातडीने कापणी, साठवण आणि वितरण करण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था, कंपन्या तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या संस्थांची मदत घेतली जाणार आहे. चारा उत्पादनासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या वनजमिनी उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. वाढत्या उन्हाच्या आणि दुष्काळाच्या झळा वन्यप्राण्यांना बसू नयेत, यासाठी वनविभाग आणि वनविकास महामंडळामार्फत विशेष कृती आराखडा राबविला जात आहे.
वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे, वनतळी, वॉटर होल्स, टँकर्स, सोलार पंप, नवीन बोअरवेल आणि मातीचे बंधारे बांधले जाणार आहेत. तसेच, विद्यमान पाणथळांचे परीक्षणही केले जाईल. आगीची जोखीम लक्षात घेऊन जाळपट्टे (अग्निरेषा) तयार करण्यापूर्वीच तेथील गवताची कापणी केली जाईल. याशिवाय अतिरिक्त अग्निप्रतिबंधक पट्ट्यांची गरज तपासणे, फायर ब्लोअर खरेदी आणि गस्तीसाठी वाहने भाड्याने घेणे यांसारख्या उपाययोजना केल्या जाणार आहेत, असे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.