पारनेर - तालुक्यात 55 हजार 159 शेतकऱ्यांना पाच हजाराचे अनुदान वर्ग

पारनेर - तालुक्यात 55 हजार 159 शेतकऱ्यांना पाच हजाराचे अनुदान वर्ग
Published on: 

पारनेरमध्ये ५५ हजार शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान
२७ कोटी ५८ लाखांचे वाटप; ४१ हजार ३११ जणांचे अनुदान अद्याप प्रलंबित

मार्तंड बुचुडे, सकाळ वृत्तसेवा

पारनेर, ता. १७ : पारनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पाच हजार रुपये याप्रमाणे देण्यात येणाऱ्या अनुदानाचे आतापर्यंत ५५ हजार १५९ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. त्यांच्या बँक खात्यांवर एकूण २७ कोटी ५७ लाख ९५ हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. तालुक्यातील एकूण बाधित शेतकऱ्यांपैकी ५०.१९ टक्के शेतकऱ्यांपर्यंत हे अनुदान पोहोचले आहे.

राज्याचे वित्तीय सल्लागार व सहसचिव अरुण कोल्हे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात दुष्काळ निधी वाटपाचा आढावा, तसेच नैसर्गिक आपत्ती निधी व दुष्काळांतर्गत लेखापरीक्षण केले.
कोल्हे म्हणाले, की पारनेर तालुक्यात दुष्काळामुळे बाधित झालेली १३१ गावे असून, बाधित शेतकऱ्यांची एकूण संख्या एक लाख नऊ हजार ९०८ आहे. पहिल्या टप्प्यात प्रति शेतकरी पाच हजार रुपयांप्रमाणे अनुदान वाटप सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत ५५ हजार १५९ शेतकऱ्यांच्या खात्यांवर अनुदान जमा झाले आहे. मात्र, काही तांत्रिक व कागदपत्रांतील त्रुटींमुळे उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित आहे. संबंधित शेतकऱ्यांनी या त्रुटी तातडीने दूर कराव्यात.
अनुदान प्रलंबित राहण्यामागे अॅग्रीस्टॅकचा परिपूर्ण डेटा पोर्टलवर उपलब्ध नसणे, सामाईक क्षेत्रातील बाधित शेतकऱ्यांचे संमतीपत्र नसणे, बाधित शेतकरी मयत असल्याने त्यांचा फार्मर आयडी उपलब्ध नसणे, तसेच दोन ते तीन महिन्यांपूर्वी फार्मर आयडी काढूनही त्याची नोंद पोर्टलवर अद्ययावत न होणे, अशी प्रमुख कारणे आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांनी प्राधान्याने अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी. संयुक्त खातेदारांनी आवश्यक संमतीपत्र द्यावे. आधार कार्ड व बँक खाते लिंक करून घ्यावे, तसेच ज्या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी झालेली नाही, त्यांनी ई-केवायसीसह आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन कोल्हे यांनी केले.
----------
अनुदान वाटपाची सद्यस्थिती
एकूण बाधित गावे : १३१
एकूण बाधित शेतकरी : १ लाख ९ हजार ९०८
मंजूर अनुदान : ३२ कोटी ७९ लाख ८५ हजार रुपये
अनुदान मिळालेले शेतकरी : ५५ हजार १५९
वितरित अनुदान : २७ कोटी ५७ लाख ९५ हजार रुपये
अनुदान वाटप प्रलंबित शेतकरी : ४१ हजार ३११
अनुदान वाटपाची टक्केवारी : ५०.१९ टक्के
चौकट :
गावपातळीवर मेळावे घ्या
प्रतिशेतकरी पाच हजार रुपये अनुदान वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गावपातळीवर, तसेच तलाठी स्तरावर शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करावे. ज्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही, त्यांच्या अडचणी व त्रुटी शोधून त्या दूर कराव्यात. एकही दुष्काळग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश राज्याचे वित्तीय सल्लागार व सहसचिव अरुण कोल्हे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.