दुष्काळामुळे ट्रॅक्टर विक्रीला ९० टक्के फटका

दुष्काळामुळे ट्रॅक्टर विक्रीला ९० टक्के फटका
Published on: 

दुष्काळाचा ट्रॅक्टर उद्योगाला ‘ब्रेक’!
विजयादशमीच्या मुहूर्तावर विक्रीत ९० टक्के घट; कृषी यांत्रिकीकरण योजनेला मंजुरीच नाही

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १९ : पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम हातचा गेला, तर रब्बीच्या आशाही धूसर झाल्या आहेत. या दुष्काळी परिस्थितीचा थेट फटका ट्रॅक्टर उद्योगाला बसला असून, विजयादशमीच्या मुहूर्तावर ट्रॅक्टर खरेदीच्या नोंदणीत तब्बल ९० टक्क्यांची घट झाली आहे. दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर २० ट्रॅक्टर विकणाऱ्या वितरकांकडे यंदा केवळ दोन ट्रॅक्टरची खरेदी होत आहे. त्यातच राज्य सरकारने यंदा कृषी यांत्रिकीकरण योजनेला मंजुरीच न दिल्याने बाजारातील मंदी अधिक गडद झाली आहे.
विजयादशमी हा ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या पसंतीचा मुहूर्त मानला जातो. त्यामुळे घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत वितरकांकडे मोठ्या प्रमाणावर चौकशी आणि नोंदणी होते. दरवर्षी या काळात एका वितरकाकडे साधारण ३० ते ३५ ट्रॅक्टरची नोंदणी होत होती. मात्र, यंदा हा आकडा अवघ्या चारवर आला आहे. दसऱ्याच्या दिवशीही अपेक्षित खरेदीऐवजी केवळ दोन ट्रॅक्टरची विक्री होणार असल्याचे वितरकांनी सांगितले.
खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, उत्पन्नाची अनिश्चितता आणि आगामी रब्बी हंगामाबाबतची चिंता यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाच्या खरेदीला तूर्तास ब्रेक लावला आहे. त्यातच कृषी यांत्रिकीकरण योजनेला मंजुरी न मिळाल्याने ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणाऱ्या सरकारी अनुदानाचा आधारही यंदा नाही. त्यामुळे दसऱ्यानंतर दिवाळीच्या काळातही ट्रॅक्टर बाजारातील मंदी कायम राहण्याची शक्यता वितरकांनी व्यक्त केली आहे.

चौकट
गतवर्षी ७५ कोटींचे अनुदान; यंदा योजनेला मंजुरीच नाही!
गतवर्षी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व अन्य कृषी अवजारांच्या अनुदानासाठी ‘महाडीबीटी’ पोर्टलवर जिल्ह्यातील एक लाख ९६ हजार ३३५ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ट्रॅक्टरसाठी ७७ हजार ७७३ शेतकऱ्यांची निवड झाली होती. त्यातील सुमारे सहा हजार शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी केले. त्यासाठी सुमारे ७५ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले. परिणामी, गतवर्षी दसरा-दिवाळीच्या काळात ट्रॅक्टर खरेदीला चांगली चालना मिळाली होती. यंदा मात्र राज्य सरकारने ‘महाडीबीटी’वरील कृषी यांत्रिकीकरण योजनेला मंजुरीच दिलेली नाही. त्यामुळे अनुदानाच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदीला मिळणारी चालना थांबली आहे.

PNE26W60301
गेल्या पाच वर्षांत यंदा पहिल्यांदाच विजयादशमीच्या मुहूर्तावर ट्रॅक्टर विक्री इतक्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. २०२३ मध्येही अशी परिस्थिती होती; मात्र यंदासारखी गंभीर नव्हती. पाऊस पडेल, ही आशा आता मावळली आहे. त्यामुळे रब्बी हंगामही वाया जाण्याची शक्यता आहे. परिणामी, दिवाळीतही ट्रॅक्टर बाजारातील मंदी कायम राहू शकते.
- संजय मेटकरी, ट्रॅक्टर वितरक, कोंडी, ता. उत्तर सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com