जिल्हा परिषद : अर्थ विभागाचे ३० कर्मचारी निघाले उजळणी प्रशिक्षणाला

जिल्हा परिषद : अर्थ विभागाचे ३० कर्मचारी निघाले उजळणी प्रशिक्षणाला
Published on: 

दुष्काळाची चिंता बाजूला; ‘प्रशिक्षण’ ला पाच दिवसांची सुट्टी!

जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील ३० कर्मचारी प्रशिक्षणाला

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ४ ः एकीकडे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती गंभीर बनली असून शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पंचनामे, विविध प्रस्ताव आणि प्रशासकीय कार्यवाहीला वेग देण्याचे आदेश आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील तब्बल ३० कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिर होणार आहे. त्यामुळे दुष्काळी कामांना प्राधान्य की प्रशिक्षणाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर प्रशासनाची यंत्रणा मदतकार्य आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीत व्यस्त आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या अर्थ खात्यातील ३० कर्मचारी सलग पाच दिवस प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. त्यामुळे या कालावधीत अर्थ विभागातील दैनंदिन कामकाजावर तसेच विविध आर्थिक प्रस्तावांच्या कार्यवाहीवर परिणाम होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
दुष्काळी परिस्थितीत निधी वितरण, विविध योजनांचे देयक, प्रशासकीय मंजुरी, खर्चाची नोंद आणि संबंधित आर्थिक प्रक्रिया यांना महत्त्व असते. अशा वेळी अर्थ विभागातील मोठ्या संख्येने कर्मचारी प्रशिक्षणासाठी उपलब्ध नसल्यास उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. प्रशिक्षण आवश्यक असले तरी त्यासाठीची वेळ, कर्मचाऱ्यांची संख्या आणि सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता प्रशासनाने कामकाजावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेणे अपेक्षित आहे.

निधी वितरणाची प्रक्रिया मंदावू शकते
दुष्काळी उपाययोजनांसाठी मंजूर निधीचे वितरण, खर्चासंबंधी कागदपत्रांची तपासणी आणि आर्थिक प्रक्रिया यासाठी अर्थ विभागाची भूमिका असते. कर्मचारी कमी उपलब्ध असल्यास फाइलच्या हालचालीला विलंब होण्याची शक्यता आहे. टँकर, विहिरी अधिग्रहण, पाणीपुरवठा, चारा किंवा इतर तातडीच्या उपाययोजनांशी संबंधित देयकांची आर्थिक प्रक्रिया वेळेत होणे आवश्यक असते. ३० कर्मचारी एकाच वेळी पाच दिवस प्रशिक्षणाला गेल्यास त्यांच्या नियमित कामाचा भार उपलब्ध कर्मचाऱ्यांवर पडू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com