मद्यधुंद तरुणांचा सिंहगडावर धिंगाणा; दोघांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime case

सिंहगडावरील हवाई पॉईंटजवळ काही मद्यधुंद तरुणांनी हातात मद्द्याच्या बाटल्या घेऊन आरडाओरडा करत धिंगाणा घातल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे.

मद्यधुंद तरुणांचा सिंहगडावर धिंगाणा; दोघांवर गुन्हा दाखल

किरकटवाडी - सिंहगडावरील हवाई पॉईंटजवळ काही मद्यधुंद तरुणांनी हातात मद्द्याच्या बाटल्या घेऊन आरडाओरडा करत धिंगाणा घातल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित तरुणांना पकडून हवेली पोलीसांच्या ताब्यात दिले आहे याप्रकरणी दोघांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रविण रामचंद्र नेवासकर (वय 34) व सुभाष मच्छिंद्र देवकर (दोघेही रा. वांबोरी ता. राहुरी जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तळीरामांची नावे आहेत.

वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार वन कर्मचारी संदीप कोळी व वनरक्षक बाळासाहेब जिवडे हे वन विभागाच्या गोळेवाडी येथील तपासणी नाक्यावर कर्तव्य बजावत असताना सिंहगडावर काही तरुण मद्यपान करत धिंगाणा घालत असल्याची माहिती त्यांना पर्यटकांनी दिली. त्यानुसार वन कर्मचारी संदीप कोळी व वनरक्षक बाळासाहेब जिवडे हे तातडीने गडावरील हवाई पॉईंटजवळ गेले. तेथे हे तरुण हातात मद्याच्या बाटल्या घेऊन मोठमोठ्याने आरडाओरड करत गोंधळ घालत असल्याचे त्यांना दिसून आले.

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मद्याच्या बाटल्यांसह संबंधित तरुणांना ताब्यात घेतले व प्राथमिक विचारपूस करुन हवेली पोलीसांच्या ताब्यात दिले. दोघांचीही ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली व त्यानुसार त्यांच्यावर दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तेगबिरसिंह संधु यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार अजित शिंदे याबाबत पुढील तपास करीत आहेत.

'सिंहगडाचे पावित्र्य राखावे असे आवाहन वेळोवेळी करण्यात आले आहे. तसे फलकही गडावर लावण्यात आलेले आहेत. पर्यटकांनी असे बेजबाबदार वर्तन करु नये. असा प्रकार निदर्शनास आल्यास तातडीने वन विभागाला माहिती द्यावी. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.'

- प्रदीप संकपाळ, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी.

Web Title: Drunken Youths Throng Sinhagad Both Were Charged Crime Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top