

पुणे, ता. १९ : बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्या विविध कंपन्यांच्या माध्यमातून ११ हजारांहून अधिक ठेवीदारांची ६१० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात सादर केली आहे.
ठेवीदारांच्या न्यायाच्या प्रतीक्षेला गती मिळावी, यासाठी मुंबई येथील विशेष एमपीआयडी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या जलद सुनावणीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. नऊ वर्षांहून अधिक काळ ठेवी अडकल्या असल्याचे त्यात नमूद केले आहे. या गुन्ह्यात सुरुवातीला नागरिकांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारींमध्ये फसवणुकीची रक्कम एक हजार ३०० कोटी रुपये असल्याचे समोर आले होते. मात्र, संबंधितांचे बँक रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहार तपासल्यानंतर प्रत्यक्ष फसवणुकीची रक्कम समोर आली आहे.
याबाबत २८ ऑक्टोबर २०१७ रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि ‘एमपीआयडी’ कायद्यानुसार डीएसकेंसह १९ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांनी उच्च न्यायालयात नुकतीच माहिती दिली आहे.
डीएसके यांच्या विविध कंपन्या, संचालक आणि आरोपींच्या बँक खात्यांमधील व्यवहार तपासण्यात आले. जमा झालेली रक्कम, गुंतवणूकदारांना परत केलेली रक्कम तसेच इतर आर्थिक व्यवहारांची छाननी केल्यानंतर फसवणुकीचा नेमका आकडा निश्चित करण्यात आला. या प्रकरणात १९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होता. त्यापैकी चार जणांना न्यायालयाच्या आदेशाने गुन्ह्यातून मुक्त करण्यात आले होते. तर, १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
४६३ मालमत्ता सुरक्षिततेचा प्रस्ताव
आरोपींनी फसवणुकीतून स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशा ४६३ स्थावर मालमत्ता सुरक्षित करण्यासाठी पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे. तसेच, २० फेब्रुवारीला सहा मालमत्ता संरक्षित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नव्याने प्रस्ताव पाठविला आहे. या प्रकरणात एमपीआयडी तरतुदीनुसार आरोपींच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे. तसेच या प्रकरणाचा प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी विशेष सरकारी वकील आणि विशेष न्यायालयाची नियुक्ती केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.