डीएसके प्रकरण : फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट कोर्टात दाखल करा; वकिलांनी केली मागणी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

डीएसके यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट महत्त्वाचा असल्याचे पोलिस आणि सरकारी वकिलांकडून सांगण्यात येते आहे.

पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील अंतिम फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट न्यायालयात दाखल करण्यात यावा, अशी मागणी डीएसके यांच्या वकिलांनी केली आहे. या बाबत आदेश होऊन गेली दोन वर्ष उलटल्यानंतरही अद्याप रिपोर्ट दाखल करण्यात आलेला नाही.

मारटकर खून प्रकरण : वेश्‍यावस्तीत वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठीच खून​

डीएसके यांचे वकील ऍड. प्रतीक राजोपाध्ये, ऍड. आशिष पाटणकर यांनी शुक्रवारी (ता.९) ही मागणी केली आहे. विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. डीएसके यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट महत्त्वाचा असल्याचे पोलिस आणि सरकारी वकिलांकडून सांगण्यात येते आहे. मात्र, गेली दोन वर्षे वारंवार मागणी करूनही हा रिपोर्ट न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेला नाही.

डीएसके यांनी गुंतवणूकदारांची कशी फसवणूक केली, याची माहिती या रिपोर्टमध्ये असल्याचे सांगण्यात येते आहे. त्यामुळे हा रिपोर्ट दाखल केला नाही म्हणून तपास अधिकाऱ्यांवर चुकीची माहिती दिल्याप्रकरणी कारवाई करावी, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. आम्ही दाखल केलेल्या अर्जाची दखल घेऊन पुढील सुनावणीच्या वेळी रिपोर्ट दाखल करण्यात यावा, असे तोंडी निर्देश न्यायालयाने दिल्याची माहिती ऍड. राजोपाध्ये यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DSKs lawyers have demanded that a final forensic audit report be filed in court