जोरदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील हा पूल पाण्याखाली 

रुपेश बुट्टे
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

जोरदार पावसामुळे खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण पुन्हा शंभर टक्के भरल्याने आणि धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने धरणातून 11 हजार 527 क्‍युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भामा नदीची दोन खोरी जोडणारा धामणे पूल पाण्याखाली गेला आहे. परिणामी दोन्ही भागातील दळणवळण ठप्प झाले असून, नागरिकांना रस्ता बंद झाल्याने माघारी परतावे लागले आहे. 

आंबेठाण (पुणे) : जोरदार पावसामुळे खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण पुन्हा शंभर टक्के भरल्याने आणि धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने धरणातून 11 हजार 527 क्‍युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भामा नदीची दोन खोरी जोडणारा धामणे पूल पाण्याखाली गेला आहे. परिणामी दोन्ही भागातील दळणवळण ठप्प झाले असून, नागरिकांना रस्ता बंद झाल्याने माघारी परतावे लागले आहे. 

भामा आसखेड धरणाच्या क्षेत्रात शुक्रवारपासून पावसाचे प्रमाण वाढले. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. सुरवातीला धरणाच्या चारही दरवाजातून 8006 क्‍युसेकने विसर्ग सुरू ठेवण्यात आला होता. त्यानंतर पावसाचे प्रमाण वाढले. त्यामुळे हा विसर्ग आज सकाळी 11 हजार 527 क्‍युसेक करण्यात आला आहे. विसर्ग वाढविण्यासाठी धरणाचे चारही दरवाजे 1.10 मीटरने उचलण्यात आले आहे, अशी माहिती भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन विभागाचे शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी दिली आहे. 

धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने धामणे गावाजवळ भामा नदीवर असणाऱ्या पुलावरून पाणी गेले आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणारे नागरिक, दुधव्यावसायिक आणि शालेय विद्यार्थी यांची मोठी अडचण झाली. तरीही काही नागरिक जीव धोक्‍यात घालून रस्ता ओलांडताना दिसत होते. 

भामा आसखेड हे खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता 8.14 टीएमसी इतकी आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात मागील काही दिवसांपासून संततधार सुरू असल्याने पाण्याची आवक वाढली आहे. आजपर्यंत धरण परिसरात 1576 मि.मी. पाऊस झाला आहे. शुक्रवारी (ता. 13) दिवसभरात 70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 

सावधानतेचा इशारा

आजही धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. पाऊस असाच सुरू राहिला; तर विसर्ग अजून वाढवावा लागेल. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन भामा आसखेड धरण प्रशासनाच्या वतीने भारत बेंद्रे आणि के. डी. पांडे यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to heavy rains in Pune district, the bridge under water