
उरुळी कांचन (पुणे) : पोलिसांच्या चाणाक्ष नजरेमुळे मोठमोठे गुन्हेगार पोलिस कोठडीत गेल्याचे अथवा अनेक गंभीर गुन्हे घडण्यापासून वाचल्याच्या घटना आपण एक तर पुस्तकात वाचतो अथवा हिंदी सिनेमात पहातो. मात्र उरुळी कांचनवासियांनी पोलिसांची चाणाक्ष नजर व समयसुचकता स्वतःच्या डोळ्याने आज सकाळी साडेआठच्या सुमारास उरुळी कांचन येथील बस स्थानकावर अनुभवली.
उमाकांत कुंजीर (पोलिस हवालदार, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा) व महेंद्र गायकवाड (पोलिस हवालदार, लोणी काळभोर पोलिस ठाणे) या दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या चाणाक्ष नजरेमुळे व समयसुचकतेमुळे, कात्रजहून एका अनोळखी इसमाने पळवून आणलेली दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी रविवारी (ता. २७) सकाळी साडेआठच्या सुमारास सुखरुपपणे संबधित मुलीच्या पालकांच्या ताब्यात मिळू शकली.
स्थळ- उरुळी कांचन बसस्थानक, वेळ सकाळची साठेआठची, स्वाती (नाव बदलले आहे) ही दहा वर्षाय मुलगी घाबरलेल्या अवस्थेत उभी होती, मुलीच्या डोळ्यात पाणी, बस स्थानकावर येणाऱ्या-जाणाऱ्यांची गर्दी, मात्र रडणाऱ्या स्वातीकडे गर्दीमधील एकाचेही लक्ष गेले नाही. त्याचवेळी दोन पोलिस कर्मचारी चहा पिण्याच्या बहाण्याने बसस्थानकावर येतात काय व त्यांचे मुलीकडे लक्ष जाते व पोलिसांच्या चाणाक्ष नजरेत मुलीची अवस्था लक्षात येते व पोलिस मुलीजवळ जाऊन विचारपूस करतात.. मुलगी घडलेली घटना सांगते व तासाभरात मुलगी पालकांच्या ताब्यात ही सिनेमा स्टाईल स्टोरी उरुळी कांचन ग्रामस्थांनी अनुभवली. तसेच पोलिसांच्या चाणाक्ष नजरेला दाद देतानाच, पोलिसांचे टाळ्या वाजवून अभिनंदनही केले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास उरुळी कांचन बस स्थानकावर घाबरलेल्या अवस्थेत उभी होती. बस स्थानकात प्रवाशांची गर्दी असली तरी, रडणाऱ्या स्वातीकडे कोणाचेही लक्ष नव्हते. त्याचवेळी स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे उमाकांत कुंजीर व लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील हवालदार महेंद्र गायकवाड चहा पिण्यासाठी बस स्थानकाजवळच्या एका हॉटेलमधे निघाले होते. हॉटेलमध्ये शिरताना उमाकांच कुंजीर यांचे लक्ष अचानक रडणाऱ्या स्वातीकडे गेले. यावर उमाकांत कुंजीर यांनी महेंद्र गायकवाड यांचेही लक्ष स्वाती वेधले. यावर दोघांच्याही चाणाक्ष नजरेला स्वातीच्या वागण्यातील बदल लक्षात आला. यावर उमाकांत यांनी स्वाती जवळ जाऊन विचारपुस करण्याचा प्रयत्न केला. मात्र उमांकात जवळ गेल्याने स्वाती अधिकच रडु लागली.
दरम्यान महेंद्र गायकवाड व उमाकांत कुंजीर या दोघांनी समयसुचकता दाखवत स्वातीला गोड बोलून शेजारच्या हॉटेलमध्ये नेले. व त्या ठिकाणी गेल्यावर तिला गोड बोलून व तिच्याशी सलगी दाखवून शांत केले. स्वाती शांत होताच, उमाकांत यांनी स्वातीकडून तिच्या बद्दलची माहिती काढून घेण्यास सुरुवात केली.
स्वातीने दिलेल्या माहितीनुसार, स्वातीला कात्रजहून एका अनोळखी इसमाने उरुळी कांचन येथे आणल्याचे पोलिसांना समजले. दरम्यान ही बाब उरुळी कांचनचे साहय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी यांना समजताच, तेही घटनास्थळी दाखल झाले. दरम्यानच्या काळात उमाकांत कुंजीर यांनी स्वातीबाबत विचारपूस करण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांशी संपर्क साधला असता, स्वाती देत असलेली माहिती खरी असल्याचे लक्षात आले. यावर पवन चौधरी व उमाकांत कुंजीर यांनी स्वातीच्या पालकांशी संपर्क साधून, स्वातीला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पालकांच्या हवाली केले.
याबाबत बोलतांना उमाकांत कुंजीर म्हणाले, ''उरुळी कांचन बस स्थानकाजवळच्या हॉटेलमध्ये शिरत असताना, स्वातीकडे सहज लक्ष गेले. स्वातीचे वय व तिची घाबरलेली अवस्था पाहून तिच्याबाबत काही तरी विपरीत घडल्याचे लक्षात आले. स्वातीजवळ जाऊन विचारपूस केली असता, स्वातीला कात्रजहून पळवून आणल्याची बाब पुढे आली. स्वातीला पळवून आणलेल्या इसमाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र इसम सापडून आला नाही. एका अल्पवयीन मुलीला न्याय देता आला हेच आमचे भाग्य आहे व पोलिस असल्याचा अभिमानही आहे.
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.