esakal | वेळेचे बंधन फळभाज्यांच्या मुळावर; विक्रीअभावी शेतमाल फेकून देण्याची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

Market Yard

वेळेचे बंधन फळभाज्यांच्या मुळावर; विक्रीअभावी शेतमाल फेकून देण्याची वेळ

sakal_logo
By
टिम इसकाळ

मार्केट यार्ड, लॉकडाउनच्या वेळेच्या बंधनामुळे भाजी विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. दुपारी चारनंतर विक्रीला परवानगी नसल्याने भाजीविक्री साधारणः ५० टक्‍क्‍यांनी घटली आहे. गाळ्यावर शेतमाल शिल्लक राहत असून, भाज्यांच्या भावातही ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली आहे. परिणामी भाव मिळत नसल्याने शेतकरीही हवालदिल झाले आहेत.

लसूण, भेंडी, गवार, दोडका, हिरवी मिरची, दुधी भोपळा, काकडी, कारली, फ्लॉवर, कोबी, वांगी, शेवगा आणि गाजर या भाज्यांच्या भावात रविवारच्या तुलनेत बुधवारी ३० ते ४० टक्के घट झाली आहे. शेतमाल गाळ्यावर शिल्लक राहत असल्याने विक्रीअभावी माल फेकून देण्याची वेळ आली. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे व्यापारी अमोल घुले यांनी सांगितले.

रात्री अकरा वाजेपर्यंत हॉटेल व्यावसायिकांना पार्सल विक्री करण्यास परवानगी आहे. परंतु ग्राहक नसल्याने हॉटेल, रेस्टॉरंट चालकाकडून भाज्यांना अपेक्षित मागणी नाही. शाळा, कॉलेज सुरू नसल्याने विद्यार्थी परगावी गेले आहेत. किरकोळ विक्रेते मार्केट यार्डातील घाऊक बाजारातून माल घेऊन शहरातील विविध भागात किरकोळ विक्री करत असतात. मात्र आता दुपारी चारपर्यंतच माल विकण्यास परवानगी असल्याने ते कमी माल खरेदी करत आहेत. (due to Time limit in pune Sellers of Market Yard throw away theire Fruits and vegetables)

का झाली विक्री कमी?

- हॉटेल, रेस्टॉरंटचालकांकडून अपेक्षित मागणी नाही

- वेळेच्या मर्यादेमुळे ग्राहकांकडून भाज्यांची खरेदी कमी

- खाणावळी चालविणाऱ्यांकडूनही मागणीत घट

- कार्यालयातून घरी जाताना नागरिकांकडून भाज्यांची खरेदी होत नाही

- माल खरेदी करून विक्रीच्या ठिकाणी पोचेपर्यंत दुकान बंद करण्याची वेळ येते

प्रशासनाने सायंकाळी 7 वाजेपर्यंत तरी भाजीविक्रीस परवानगी द्यायला हवी. मुख्यत्वेकरून हॉटेल व्यवसाय सायंकाळी, रात्री होत असतो. अटी, शर्तींचे पालन करून 25 टक्के क्षमता का असेना, हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी दिली पाहिजे. जेणेकरून भाजीपाल्याचा खप वाढेल. परिणामी भाव जास्त मिळून शेतकऱ्यांचा फायदा होईल.

- अमोल घुले, उपाध्यक्ष, अडते असोसिएशन

वेळेची मर्यादा दुपारी चारपर्यंत असल्याने हॉटेल तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून मालाची २५ टक्केच खरेदी होत आहे. मागणीच नसल्याने भाव घसरले आहेत. यामुळे शासनाने किमान किरकोळ विक्रेत्यांना सात वाजेपर्यंत आणि हॉटेल व्यावसायिकांना रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी द्यायला हवी.

- विलास भुजबळ, अध्यक्ष, अडते असोसिएशन

मी बुधवारी १०० कॅरेट वांगी विक्रीसाठी घाऊक बाजारात आणली होती. त्यापैकी ७० कॅरेटची विक्री ८-१० रुपये किलोने झाली, तर ३० कॅरेट विक्रीअभावी शिल्लक राहिली. त्यामुळे वाहतूक खर्चही निघणे अवघड झाले आहे. शेतीमाल हा नाशवंत आहे. याच्या विक्रीसाठी रात्रीपर्यंत परवानगी द्यायला हवी. तरच शेतकऱ्यांचे नुकसान टळेल.

- गणेश गाडे, शेतकरी, राहुरी

फळभाज्यांचे घाऊक बाजारातील दहा किलोचे भाव

रविवार (ता. ११) -- बुधवार (ता. १४)

फ्लॉवर - 60 : 80 -- 30 : 60

कोबी - 100 : 150 -- 60 : 100

वांगी - 100 : 200 -- 80: 120

शेवगा - 400 : 450 -- 280 :350

गाजर - 200 : 220 -- 140 :160

लसूण - 300 : 1000 -- 750 : 800

भेंडी - 100 : 200 -- 80 :120

गवार - गावरान व सुरती 150 : 250 -- 100 : 120

दोडका - 150: 200 -- 140 : 160

हिरवी मिरची - 400 : 450 -- 250 : 300

दुधी भोपळा - 120 : 160 -- 80-120

काकडी - 100 : 150 -- 80 :100

कारली : हिरवी - 150 : 200 -- 120-160

loading image