

टुडे १
----------
मायणीतील नागरिक धुळीने त्रस्त
दहिवडी- विटा रस्त्याच्या कामाचा परिणाम; रस्त्यांवर पाणी मारणे आवश्यक
संजय जगताप : सकाळ वृत्तसेवा
मायणी, ता. २८ : दहिवडी- विटा मार्गाच्या कामामुळे प्रचंड धूळ पसरत असून, रस्त्याकडेचे लोक धुळीमुळे त्रस्त झाले आहेत. लोकांच्या आरोग्यावर धुळीचा दुष्परिणाम होत आहे. कंत्राटदाराने वारंवार रस्त्यांवर पाणी मारून वाहनचालक व रस्त्याकडेच्या नागरी वस्तीला धुळीपासून दिलासा देणे आवश्यक आहे.
येथून जाणाऱ्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० वरील फलटण ते म्हैसाळ (जि. सांगली) दरम्यानचे रस्त्याचे उन्नतीकरण व विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी पॅकेज क्रमांक दोन दहिवडी ते विटादरम्यानच्या अस्तित्वातील सुमारे ५० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम जोमात सुरू आहे. त्यामध्ये आधीचा अस्तित्वात असलेला रस्ता पूर्ण उखडण्यात येत आहे. ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात येत आहे. पूर्वीच्या ओढ्या नाल्यावरील मोऱ्या, पूल तोडून त्याठिकाणी मोठे आणि काँक्रिटचे पूल बांधण्यात येत आहेत. त्यासाठी बाजूने रस्ता तयार करण्यात येत आहे. छोट्या-छोट्या मोऱ्यांवरही काँक्रिटचे मजबूत काम करण्यात येत आहे. त्या विविध कामामुळे प्रचंड धूळ वातावरणात पसरत आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नागरी वस्तीला त्याचा दुष्परिणाम भोगावा लागत आहे. सर्व घरादारात धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे. अन्नपाण्यावरही धुळीचे अस्तित्व दिसत आहे. सुकविण्यासाठी टाकलेले कपडे धुळीने माखत आहेत. भिंतीवर धूळ साचत आहे. सरकत्या खिडक्यांमध्ये धूळ साचल्याने त्यांच्या सरकण्यात बाधा येत आहे. आजूबाजूच्या पिकांवरही धूळ साचत असून, पीकवाढीवर व फलन प्रक्रियेवर दुष्परिणाम होत आहे. रस्त्याने ये- जा करणाऱ्या वाहनचालकांनाही धुळीचा त्रास होत असून, वाहने अतिशय धीम्या गतीने चालवावी लागत आहेत. धुळीमुळे दृश्यमानता कमी होत असून, अपघाताला निमंत्रण मिळत आहे. सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण होत असल्याने लोकांना श्वसनाचे आजार होत आहे. नाकातोंडात धूळ जाऊन खोकला, ॲलर्जिक सर्दी आदी त्रास होत आहे. किमान नागरी वस्ती लगतच्या रस्त्यावर वारंवार पाण्याचे फवारे मारावेत, अशी मागणी लोक करीत आहेत.
कोट -
रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून धुळीचा प्रचंड त्रास होत आहे. खोकला, सर्दीसारखे आजार होत असून, घरातील सामानावर धुळीचे थर साचत आहेत.
- राजेंद्र भिसे, नागरिक, मायणी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.