महत्त्वाची बातमी! आषाढी वारीबाबत निर्णय होणार आज?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आज शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी चार वाजता चर्चा होणार

आळंदी : अवघ्या महाराष्ट्राचा आध्यात्मिक भक्तिसोहळा असलेल्या आषाढी वारीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आज शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी चार वाजता चर्चा होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वारीच्या स्वरुपाबाबत सर्व सोहळा प्रमुख तसेच मानकऱ्यांची भूमिका ऐकून घेऊन सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या दोन महिन्यांपासून जगभर कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. भारतात त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॅाकडाउन करण्यात आला. राज्यात संचारबंदी लावल्याने यात्रा, जत्रा, उत्सव रद्द केले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पंढरपूरच्या चैत्र वारीत निर्णय होतो. मात्र, ती वारी रद्द झाल्याने त्याबाबत निर्णय झाला नाही. कोरोनामुळे राज्य सरकार उपाययोजनेमध्ये व्यस्त असल्याने वारीच्या स्वरुपाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. वारकरी संप्रदाय या काळात सरकारच्या मागे उभा आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राज्यात सर्वात लांबून येणारा संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचे नियोजित प्रस्थान २७ मे रोजी आहे. त्यामुळे सरकारचा निर्णयाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. पालखी सोहळ्यांचे म्हणणे ऐकून त्यातून योग्य तो निर्णय सरकारने काढण्याची मागणी केली जात आहे. संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रमुखांची जिल्हाधिका-यांनी तीन दिवसांपूर्वी बैठक घेवून प्राथमिक चर्चा केली होती. त्यावर आणखी चर्चा आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. यामध्ये या दोन सोहळ्यासमवेत अन्य संतांच्या पालखी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबाबत सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे यांनी व्हिडिओ कॅान्फरन्सद्वारे वारीतील संबंधित मानक-यांशी चर्चा केली आहे. तसेच दिंड्याप्रमुख, मानकरी, ग्रामस्थ यांनी देवस्थानकडे सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये ग्रामस्थांनी वीस वारकरी घेऊन एक दिवसात वाहनातून वारी करण्याची सूचना केली आहे. तर चोपदारांनी पायी वारी कशा पद्धतीने नेता येईल याबाबतचा पर्याय दिला आहे. या सर्व सूचनांचा विचार करून देवस्थान काय भूमिका मांडणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

संत तुकाराम महाराज सोहळ्याकडून विभागीय आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे. वारीची परंपरा चुकू नये, हा एकमेव हेतू आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकार घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे त्यात म्हटले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संत सोपानदेव महाराज सोहळ्याचे प्रमुख आज आपली भूमिका मांडतील. आषाढी वारीबाबतच्या निर्णयाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आजची बैठक महत्वपूर्ण आहे. वारीतील आळंदीतील माउलींच्या पालखी प्रस्थानच्या दिवसापासून पुण्यातील मुक्काम, त्यानंतर वाटचालीतील मुक्कामांच्या गावातील परिस्थीती, निरा स्नान, रिंगण सोहळे, वाखरीत गेल्यावर पंढरपूरात प्रवेश करताना काय दक्षता घ्यायची, पंढरपूरातील स्थानिकांची सोय गैरसोय, व्यापाऱ्यांची परिस्थिती आणि त्यासाठीच्या उपाययोजना, पंढरपूरातील परंपरा याबाबतचा विचार आजच्या बैठकीत होईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामुळे पायी वारी न्यायची असेल तर तिचे नेमके स्वरुप कसे असेल. त्यात किती लोकांना प्रवेश दिला जाईल किंवा अन्य कोणता पर्याय पुढे येतो, यावर वारीच्या यंदाच्या स्वरुपाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. पालखी सोहळ्याबाबत राज्यभरातील वारकरी आजच्या बैठकीकडे आस लावून आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dy CM Ajit Pawar may take decision about ashadhi vari 2020 today