esakal | अजित पवारांनी करून दाखवलं अन् माळेगावचं मैदान मारलं
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

अत्यंत व्यस्त कार्यक्रम असतानाही अजित पवार यांनी वेळ देत माळेगावसाठी फिल्डींग लावली होती. नवीन चेहरे देत त्यांनी चंद्रराव व रंजन तावरे यांच्यापुढे तगडे आव्हान उभे केले होते. चार सभा घेत तसेच अनेकांशी वैयक्तिक संपर्क साधत अजित पवार यांनी सत्ता खेचून आणली. 

अजित पवारांनी करून दाखवलं अन् माळेगावचं मैदान मारलं

sakal_logo
By
मिलिंद संगई, कल्याण पाचांगणे

बारामती/ माळेगाव : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत राष्ट्रवादी पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनेलने बाजी मारली असून कारखान्यात सत्तापरिवर्तन झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या या निवडणूकीत राष्ट्रवादीने मुसंडी मारत यश खेचून आणले आहे. चंद्रराव तावरे, रंजन तावरे व बाळासाहेब तावरे हे तिघेही पुन्हा एकदा संचालक म्हणून कारखान्यावर निवडून गेले आहेत, मात्र चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरुशिष्यांच्या जोडीला अजित पवार यांनी शह देत माळेगावची सत्ता खेचून आणली. सकाळी सहा वाजेपर्यंत जाहिर झालेल्या अठरा जागांपैकी तेरा जागांवर विजय मिळवित राष्ट्रवादीने आज पुन्हा एकदा कारखान्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 

काल सकाळी मतमोजणीला साडेतीन तास उशीर झाल्यामुळे रात्रभर मतमोजणीची प्रक्रीया सुरु होती. आज सकाळीही मतमोजणी पूर्ण करुनच यंत्रणा थांबणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान सांगवी आणि नीरावागज या गटामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पुन्हा मतमोजणी घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व गटनेते सचिन सातव यांनी दिली. 

अत्यंत व्यस्त कार्यक्रम असतानाही अजित पवार यांनी वेळ देत माळेगावसाठी फिल्डींग लावली होती. नवीन चेहरे देत त्यांनी चंद्रराव व रंजन तावरे यांच्यापुढे तगडे आव्हान उभे केले होते. चार सभा घेत तसेच अनेकांशी वैयक्तिक संपर्क साधत अजित पवार यांनी सत्ता खेचून आणली. 

शल्य दूर करण्यात यश.....
अजित पवार यांनी गेली अनेक वर्षे बारामतीवर निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली, मात्र माळेगाव कारखान्यातील पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्या मुळे यंदा काहीही करुन या पराभवाचे शल्य दूर करण्याचा त्यांचा निश्चय होता. सुरवातीला चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्यासाठी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अजित पवार यांनी मैदानात उतरुन आपल्या बाजूला खेचून आणली. अत्यंत आत्मविश्वासाने व प्रसंगी इशारा देत केलेली भाषणे व सभासदांना भाव देण्याचा दिलेला शब्द या मुळे हे यश मिळाले. सहकारातील तज्ज्ञ समजल्या जाणा-या व माळेगावची रेघ न रेघ माहिती असलेल्या चंद्रराव व रंजन तावरे या जोडगोळीकडून कारखान्याची सत्ता ताब्यात घेणे एक आव्हानच होते, मात्र अजित पवार यांनी सूत्रे आपल्या हातात घेत राष्ट्रवादीच्या सर्वांना कामाला लावत ही सत्ता खेचून आणली. 

माळेगावचे गटनिहाय विजयी उमेदवार-
ब वर्ग प्रतिनिधी- स्वप्नील जगताप (राष्ट्रवादी)
माळेगाव- रंजन तावरे (सहकार बचाव), बाळासाहेब तावरे (राष्ट्रवादी), संजय काटे (राष्ट्रवादी.)
पणदरे- तानाजी कोकरे, केशवराव जगताप व योगेश जगताप (तिघेही राष्ट्रवादी)
सांगवी- चंद्रराव तावरे व रणजित खलाटे (सहकार बचाव) व सुरेश खलाटे (राष्ट्रवादी)
नीरावागज- मदनराव देवकाते, बन्सीलाल आटोळे (राष्ट्रवादी), प्रताप आटोळे (सहकार बचाव)
बारामती- नितीन सातव, राजेंद्र ढवाण (राष्ट्रवादी), गुलाबराब गावडे (सहकार बचाव)
महिला प्रतिनिधी- अलका पोंदकुले व संगीता कोकरे (राष्ट्रवादी) (मतमोजणीत आघाडीवर)

loading image