Video : अजित पवार हात जोडून करताहेत नमस्कार; कारण...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 March 2020

 कोरोनापासून जागरुकता राखण्याचा प्रयत्न जसे नागरिक करीत आहेत.

बारामती : कोरोनापासून जागरुकता राखण्याचा प्रयत्न जसे नागरिक करीत आहेत. तशीच जागरुकता आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दाखविली. बारामतीत झालेल्या आज विविध कार्यक्रमांदरम्यान अजित पवार यांनी एकाही व्यक्तीच्या हातात हात न देता हात जोडून नमस्कार करणेच पसंत केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

उपमुख्यमंत्री झाल्याने मी काही वेगळा झालो आहे, असे काहींना वाटेल पण डॉक्टरांनीच दिलेल्या सल्ल्यानुसार हस्तांदोलन टाळून हात जोडून नमस्कार करीत असल्याचा खुलासा अजित पवार यांनी केला.

बारामतीत डॉ. रमेश भोईटे यांनी आयोजित केलेल्या मोफत कर्करोग निदान शिबीराच्या उदघाटन प्रसंगी बोलताना अजित पवार यांनी हा खुलासा केला. पवार यांच्या हस्ते आज बरेच सत्कार झाले. अनेकांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, हात जोडून पवार यांनी नम्रतेने व हसत हस्तांदोलन टाळले.

डॉक्टर एकीकडे तुम्हीच सांगता हस्तांदोलन करु नका आणि तुम्ही हस्तांदोलन करण्याचा आग्रह करता, असे म्हणत त्यांनी डॉक्टरांनाही हळूच चिमटा काढला. मात्र, जोपर्यंत कोरोना संपूर्णपणे जात नाही तोपर्यंत आपण हस्तांदोलन करणार नाही, असा खुलासा करायलाही अजित पवार विसरले नाहीत. तुम्हीही हात जोडूनच नमस्कार करा...घरी हातात हात दिला तरी चालेल पण बाहेर मात्र हात जोडूनच नमस्कार करा, असे ते म्हणताच हास्याचा स्फोट झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dy CM Ajit Pawar Talked about Coronavirus