शिरूर बाजार समितीत "ई-नाम' सुविधा

नितीन बारवकर
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केट (ई-नाम) या केंद्र सरकारच्या योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली असून, त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात समावेश झालेल्या राज्यातील तीस बाजार समित्यांमध्ये शिरूर बाजार समितीची निवड झाली आहे.

शिरूर (पुणे) : नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केट (ई-नाम) या केंद्र सरकारच्या योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली असून, त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात समावेश झालेल्या राज्यातील तीस बाजार समित्यांमध्ये शिरूर बाजार समितीची निवड झाली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतून कृषिमालास स्पर्धात्मक दर मिळण्यास हातभार लागणार आहे. 

ई-नाम योजनेच्या अनुषंगाने शिरूर बाजार समितीने सद्यःस्थितीत आवक गेट एंट्री, लॉट मॅनेजमेंट, असायनिंग (शेतमालाची गुणवत्ता तपासणी), ई-ऑक्‍शन, शेतमालाचे वजन, सेल ऍग्रिमेंट, सेल बिल, ऑनलाइन पेमेंट व गेट एंट्री याप्रमाणे कामकाजाला सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कृषी उत्पादनांना स्पर्धात्मक किंमत मिळणार असून, वजन व विक्री झालेल्या शेतमालाचे पैसे तत्काळ संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले यांनी दिली.

राज्याच्या इतर बाजारांमधील नोंदणीकृत खरेदीदार शेतमाल खरेदीवेळी बोली लावणार असल्याने खरेदीदार वाढून दराबाबत स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यास फायदा होणार आहे. शेतमाल किमतीत चढउतार झाल्याने बाजारात स्थैर्य निर्माण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

ई-नाम योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे, राज्य व राष्ट्रीय स्तरावर सामाईक बाजाराची स्थापना, विक्री व्यवहार पद्धतीत सुसूत्रता व समानता, पारदर्शक विक्री व्यवस्था, स्पर्धात्मक किंमत आणि तत्पर ऑनलाइन पेमेंट, शेतमालाचे ग्रेडिंग आहे. त्यामुळे खरेदीदारांना गुणवत्तेची माहिती, स्थिर किमतीमुळे ग्राहकांना वाजवी किमतीत चांगल्या गुणवत्तेचा माल उपलब्ध होईल, असे बाजार समितीचे उपसभापती विश्‍वास ढमढेरे यांनी सांगितले. 

आज प्रशिक्षण कार्यक्रम 
बाजार समितीमध्ये येणारा शेतकरी हा प्रामुख्याने ग्रामीण भागातून येतो. ग्रामीण जनतेला ई-नाम योजनेचे महत्त्व व फायदे याची सखोल माहिती होणे गरजेचे आहे. ई-नाम योजनेची सविस्तर माहिती जास्तीत जास्त शेतकरी, व्यापारी, खरेदीदार, हमाल, मापाडी, कर्मचारी यांना होण्यासाठी शुक्रवारी (6 डिसेंबर) दुपारी 12 वाजता बाजार समितीमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व संबंधित घटकांनी व कृषिक्षेत्राशी निगडित संघटना प्रतिनिधींनी उपस्थित राहावे. ही योजना समजावून घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांना समजावून सांगावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: E-Name facility in Shirur Market Committee