

ई-पीक पाहणीसाठी ५०० रुपये; सहायकावर गुन्हा
शेतकऱ्याची अडवणूक केल्याचा आरोप; तहसीलदारांच्या आदेशानंतर पोलिसांत फिर्याद
सकाळ वृत्तसेवा
उपळाई बुद्रूक, ता. ३ : ई-पीक पाहणीची नोंद करण्यासाठी शासनाकडून नियमानुसार मानधन मिळत असतानाही शेतकऱ्याकडे अतिरिक्त पैशांची मागणी करून अडवणूक केल्याचा प्रकार उपळाई बुद्रूक (ता. माढा) येथे समोर आला आहे. प्रतिगट १०० रुपयांप्रमाणे पाच गटांसाठी ५०० रुपये मागितल्याच्या आरोपावरून तहसीलदारांच्या आदेशानुसार ई-पीक पाहणी सहायक चैतन्य दिगंबर शेटे याच्याविरुद्ध माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्राम महसूल अधिकारी श्रावण भोये यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शासनाच्या ३ ऑगस्ट २०२६ रोजीच्या निर्णयानुसार ई-पीक पाहणी सहायकांना नोंदणी केलेल्या पिकांसाठी नियमानुसार मानधन देण्याची तरतूद आहे. त्यानुसार शेटे यांची २० ऑगस्ट रोजी उपळाई बुद्रूक येथील ई-पीक पाहणी सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
ई-पीक पाहणीचे काम सुरू असताना शेटे यांनी शेतकरी दादासाहेब भारत गावडे यांना दूरध्वनी करून पाच गटांसाठी ५०० रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पैसे न दिल्यास ई-पीक पाहणीची नोंद होणार नाही, तसेच शेतकऱ्यांना दुष्काळाचे शासकीय अनुदान मिळणार नाही, अशी भीती दाखवून दबाव टाकल्याचाही आरोप आहे.
या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप २७ सप्टेंबर रोजी सोशल मीडिया तसेच वृत्तवाहिनीवर प्रसारित झाल्यानंतर महसूल विभागाने या प्रकरणाची दखल घेतली. ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी २८ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना याबाबत लेखी माहिती दिली. त्यानंतर तहसीलदारांनी ई-पीक पाहणी सहायकाची नोंदणी रद्द करून फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ३ ऑक्टोबर रोजी माढा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
---
तालुक्यातील अन्य गावांतही तक्रारी
तालुक्यातील अन्य गावांतही ई-पीक पाहणीच्या नोंदीसाठी पैसे मागितल्याच्या तक्रारी असल्याचे सांगण्यात येत आहेत. मात्र, याबाबत लेखी तक्रारी दाखल झालेल्या नसल्याने त्याची अधिकृत नोंद झालेली नाही. ई-पीक पाहणीची नोंद होणार नाही, या भीतीने अनेक शेतकरी तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अशा प्रकारे पैसे मागणाऱ्या सहायकांकडून शेतकऱ्यांच्या भीतीचा फायदा घेतला जात असल्याचे चित्र आहे. याआधी गावातील काही तलाठ्यांनी नागरिकांकडून पैसे घेतल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आता गावोगावी अशा सहायकांवर कारवाई होणार का, असा सवाल शेतकऱ्यांच्या मनात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.