

पुणे, ता. २० : कर्करोगाबाबतची (कॅन्सर) वाढती जनजागृती आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेमुळे रुग्णांचे लवकर निदान होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्याऐवजी सुरुवातीच्या काळातच उपचार मिळत असल्याने रुग्णांचे जीवनमान उंचावले असल्याचे मत कर्करोगतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
बदललेली जीवनशैली, खानपान आणि पिकांवर रासायनिक खतांचा वापर व कीटकनाशकांची फवारणी यामुळे कर्करोगाचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत अलीकडील काळात वाढले आहे. यामध्ये पुरुषांमध्ये जबड्याच्या, तर स्त्रियांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. दोन-तीन दशकांपूर्वी उपचारांची मर्यादित उपलब्धता आणि मोठा खर्च यामुळे हा आजार दुर्धर समजला जात असे. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे.
अलीकडील काळात ही परिस्थिती बदलली आहे. आता कर्करोगावर अत्याधुनिक उपचारपद्धती उपलब्ध झाल्या आहेत. उपचाराचे पर्याय आले आहेत व पूर्वीच्या तुलनेत उपचारही स्वस्त झाले आहेत. कारण अनेक पेटंट औषधे ही खुल्या बाजारात उपलब्ध झाल्याने ती औषधे अनेक फार्मा कंपन्यांनी स्वस्त दरांत उत्पादित केली आहेत. महत्त्वाचे म्हणजे चौदा वर्षांपूर्वी राज्य शासनाने मोफत उपचारांसाठी राजीव गांधी जीवनदायी योजना (आताची महात्मा फुले जनआरोग्य योजना) सुरू केली. या योजनेत आणखी सुधारणा झाली व उपचारांची संख्याही वाढल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
- कारण न सापडता वजन कमी होणे व ॲनेमिया
- सतत जुलाब किंवा बद्धकोष्ठता होणे, तसेच लघवी किंवा शौचामध्ये रक्त आढळणे
- त्वचेवर, तोंडात किंवा शरीराच्या इतर भागावर झालेली जखम बराच काळ होऊनही न भरणे
- शरीराच्या कोणत्याही भागातून अनपेक्षित किंवा असामान्य स्राव
- स्तन, वृषण किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागात नवीन गाठ
- दीर्घकाळ अपचन होणे किंवा अन्न गिळताना त्रास होणे
- तीळ, मस किंवा जन्मखुणेचा आकार, रंग किंवा स्वरूप बदलणे
- काही आठवडे खोकला किंवा घशात खवखव किंवा आवाज बसणे कायम राहणे
महात्मा फुले जनआरोग्य योजनेमुळे समाजातील शेवटच्या घटकांतील नागरिकांपर्यंत किमान वैद्यकीय सल्ला घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे, गेल्या ५ ते १० वर्षांत रुग्ण कर्करोग तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात जाण्याआधीच निदान करून घेण्यासाठी किंवा कर्करोगतज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी येत आहेत. जर एखाद्याला निदान झाले तर उपचाराकडेही वळत आहेत. त्याचा परिणाम हा जीवनमान वाढण्यावर झाला आहे. हा मोठा सकारात्मक फरक आहे.
- डॉ. संजय देशमुख, कर्करोग शल्यचिकित्सक, रूबी हॉल क्लिनिक
बहुतांश कर्करोग हे तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात आल्यानंतर त्याचे निदान होते. आता उपचारपद्धतीत झालेल्या प्रगतीमुळे तिसऱ्या टप्प्यातील कर्करोगाचे रुग्णदेखील बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. लिम्फोमा (लसिका ग्रंथींचा कर्करोग) याचे प्रामुख्याने चौथ्या टप्प्यात निदान होते. मात्र, तो बरा होतो. तसेच, स्तन कर्करोग, फुप्फुस कर्करोग हे चौथ्या टप्प्यात निदान झाल्यास पूर्णपणे बरे होत नाहीत, मात्र उपचारांनी त्यांचे आयुष्य वाढवू शकतो.
- डॉ. तुषार पाटील, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.