
प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपासाठी हवा विद्यार्थी अन् प्राध्यापकांशी संवाद!
पुणे : कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा होणार आहे. अध्ययन, अध्यापनाची बदललेली परिस्थिती पाहता या लेखी परीक्षेसाठी विद्यापीठाने प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. उशिरा सुरू झालेली उन्हाळी सत्रे, वेळेत परीक्षा पार पाडण्याचे आव्हान आणि विद्यार्थ्यांची मानसिकता पाहता संपूर्ण परीक्षा सक्षमपणे पार पडण्यासाठी या दोन्ही घटकांशी सविस्तर चर्चा करणे गरजेचे आहे. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. कान्हू गिरमकर म्हणतात, ‘‘परीक्षेच्या बाबत आतापर्यंत प्राध्यापकांनी नेहमीच विद्यापीठाला सहकार्य केले आहे.
अधिक गतिमान परीक्षेसाठी विद्यापीठाने प्रत्येक महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापकांशी बोलायला हवे. कारण महाविद्यालयांतील कर्मचारीच परीक्षेचे काम करणार आहे. अजूनतरी विद्यापीठ प्रशासनाने प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपासंदर्भात प्राध्यापकांशी संवाद साधलेला नाही. विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्राध्यापकांशी चर्चा करायला हवी.’’ उन्हाळी सत्राची परीक्षा पावसाळ्यात होत आहे, तसेच दोन वर्षानंतर प्रत्यक्ष ऑफलाईन परीक्षा पार पडत आहे. अशा वेळी योग्य समन्वय आणि नियोजनासाठी अशा चर्चेची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
म्हणून चर्चा गरजेची..
अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिकेचे स्वरूप निश्चित करणे
स्थानिक स्तरावरील समस्यांचा आढावा घेणे
प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांची परीक्षेच्या दृष्टीने तयारी करणे
परीक्षा पार पडणाऱ्यासाठी अधिक अचूकता आणि महत्त्वपूर्ण बदल लक्षात घेणे
विद्यार्थी व प्राध्यापकांच्या शंकाचे निरसन होईल
पेपर तपासणी अधिक गतिमान करत, निकाल जलद गतीने लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना
ऑफलाईन परीक्षा होणार हे निश्चित झाले आहे. परीक्षा कशी घ्यावी या संदर्भातही चर्चा झाली आहे. मात्र प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि परीक्षेबद्दल अभिप्राय अजून प्राध्यापकांकडून मागविलेले नाही. सध्या तरी नेहमीप्रमाणे परीक्षा होणार आहे. यासंदर्भात काही धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल, तर सर्व घटकांशी चर्चा करावी लागणार आहे.
- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
महाविद्यालयातील प्राध्यापकांना कार्यशाळेत प्रशिक्षण दिलेले आहे. प्रत्येक महाविद्यालयात संबंधित अधिकाऱ्यांनी कामाला सुरवात केली आहे. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूप आणि कॅपचे विकेंद्रीकरणासंबंधी अधिष्ठाता स्तरावर चर्चा चालू आहे.
- डॉ. एन.एस.उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
Web Title: Education Department Communication With Students And Professors For Format Of Question Paper Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..