
विद्यार्थ्यांची शाळा १५ जूनपासून होणार सुरू - सूरज मांढरे
पुणे : मुलांची शाळा नेमकी कधीपासून सुरू होणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर इकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांची शाळा येत्या बुधवारपासून म्हणजेच १५ जूनपासून सुरू होणार आहे. होय, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये राज्यात १५ जूनपासून, तर विदर्भात २७ जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात याव्यात, असा आदेश राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना दिला आहे. राज्यातील शालेय शिक्षणातील २०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष येत्या आठवड्यात सुरू होत आहे. त्यानुसार जूनमधील दुसऱ्या सोमवारी (ता.१३) शाळा सुरू होतील.
परंतु सोमवारी (ता.१३) आणि मंगळवारी (ता.१४) शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, सौंदर्यीकरण करणे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उद्बोधन करणे याचे आयोजन करावे. आणि विद्यार्थ्यांना १५ जूनपासून प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना द्याव्यात, असे मांढरे यांनी आदेशात नमूद केले आहे. तसेच, विदर्भात २४ आणि २५ जून रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण करावे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत उद्बोधन करण्यात यावे. त्यानंतर २७ जूनपासून विद्यार्थ्यांना शाळेत येण्याच्या सूचना द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘‘राज्यातील विद्यार्थ्यांसाठी १५ जूनपासून आणि विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी २७ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. परंतु शाळा सुरू होण्यापूर्वीची पूर्वतयारी म्हणून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन दिवस आधी शाळेत बोलविण्यात आले आहे. तसेच राज्यातील शाळांमध्ये तब्बल दोन वर्षांनी प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शाळांमध्ये तयारी करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.’’
- सूरज मांढरे, राज्य शिक्षण आयुक्त
Web Title: Education News Students School Will Start From 15th June Suraj Mandhare Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..