

गोदामातील आणि ई-पॉसमधील
साठा नियमितपणे अद्ययावत ठेवा
पंकज आशिया ः एफएफएस ॲपद्वारे होणार खतांचे आरक्षण
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः जिल्ह्यात ६५ हजार टनांपेक्षा अधिक खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे टंचाईची शक्यता नाही. जिल्ह्यातील परवान्यांचे अद्ययावतीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित प्रकरणांमधील तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण कराव्यात, तसेच खत वितरणातील पारदर्शकतेसाठी गोदामातील प्रत्यक्ष साठा व ई-पॉसमधील डिजिटल साठा नियमितपणे अद्ययावत ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
केंद्र शासनाचे रसायन व खत मंत्रालय आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या नवीन Framework for Fertilizer Sale (FFS) डिजिटल प्रणालीच्या प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची विशेष आढावा बैठक झाली.
या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे व विविध रासायनिक खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, तसेच जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संघटनेचे प्रतिनिधी छबूराव हराळ यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी बैठकीमध्ये एफएफएस ॲप कार्यपद्धती व खत नियोजन, शेतकऱ्यांसाठी पारदर्शक, सुलभ व तंत्रज्ञानाधारित खत वितरण व्यवस्थेवर भर देण्याबाबत चर्चा झाली.
चौकट ----
शेतकऱ्यांसाठी सूचना
- सातबारा व पीक नोंदीनुसार जमिनीच्या क्षेत्रफळानुसार अचूक खतांचे प्रमाण ॲपद्वारे सुचविले जाते. ज्यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत होईल.
- शेतकऱ्यांना वाजवी व शासकीय दरात खते उपलब्ध होणार. कोणत्याही सक्तीशिवाय केवळ आवश्यक खतांचीच खरेदी करणे शक्य होणार आहे.
- शेतकरी दुकानात जाण्यापूर्वीच तालुक्यातील अधिकृत कृषी सेवा केंद्रांमधील उपलब्ध प्रत्यक्ष साठा तपासून स्वतःच्या पसंतीचे केंद्र निवडू शकतात.
- डिजिटल QR पास व प्रतिनिधी सुविधा ॲपवर बुकिंगनंतर मिळणारा QR कोड e-PoS वर स्कॅन करून खत मिळेल. शेतकरी स्वतः अथवा अधिकृत प्रतिनिधीद्वारे ३ दिवसांच्या आत खत खरेदी करू शकतात.
कोट ----
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आधुनिक व पारदर्शक खत वितरणासाठी एफएफएस ॲपचा जास्तीत जास्त वापर करावा. आवश्यक असणाऱ्या खतांचे आरक्षण करून ऐन हंगामात होणारी गैरसोय टाळावी.
- सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.