
मंचर ते भीमाशंकर रस्त्यावरून जाताना घोडेगाव (ता. आंबेगाव) पासून पुढे शिनोली हद्दीत बोगदेवाडी, नेवाळवाडी जवळ घोडनदीच्या कडेने झाडांची दाट झाडी लागते. त्यातील एका झाडावर आठ आग्या मोहोळाची पोळी आढळून आली.
एकाच झाडावर आग्या मोहोळाची आठ पोळी
फुलवडे - मंचर ते भीमाशंकर रस्त्यावरून जाताना घोडेगाव (ता. आंबेगाव) पासून पुढे शिनोली हद्दीत बोगदेवाडी, नेवाळवाडी जवळ घोडनदीच्या कडेने झाडांची दाट झाडी लागते. त्यातील एका झाडावर आठ आग्या मोहोळाची पोळी आढळून आली असून सध्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने काही ठिकाणी आग्या मोहोळाच्या मधमाश्यांचे हल्ले होतानाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. याबाबत घोडेगाव वनविभागाला कळविण्यात आले आहे.
मराठी नाव - आग्या मोहोळ
इंग्लिश नाव - Rock bees
शास्त्रीय नाव - Apis dorsata
भारतात सापडणाऱ्या मधमाश्यांच्या पाच जातींपैकी सर्वात मोठ्या आकाराच्या माश्या असतात. एका पोळ्यात एक राणी माशी ( Queen ), ४० ते १०० नर माश्या (Drone) आणि साधारणपणे ३०००० ते ८०००० पर्यत कामकरी माश्या (Workers) असतात. सुपा एवढ्या किंवा त्याहून मोठ्या आकाराचे पोळे तयार करतात. आग्या मोहळाच्या मधमाशा फुलांची व पाण्याची उपलब्धता शोधून समूहाने एकाच झाडावर, कड्या कपारी, बोगद्यांच्या ठिकाणी पोळी बांधून राहतात. त्यासाठी मधमाश्या साधारण कुणीही त्रास देणार नाही अशी शांत जागा निवडतात. मधमाशा स्वतःहून कधीही कुणाला त्रास देत नाहीत, परंतु कुणी खोडसाळपणे त्रास दिला तर सोडत नाहीत. असे पुणे येथील केंद्रीय मधमाशी संशोधन आणि अनुसंधान संस्थेचे मुख्य प्रशिक्षक प्रा. हेमंतकुमार डुंबरे यांनी सांगितले.
निसर्गाच्या सानिध्यात जिथे मधमाश्यांची वसतीस्थाने आहेत, तिथे गेल्यावर गडबड, गोंगाट, ध्वनी प्रदूषण करू नये. मधमाश्यांनी जर अटॅक केलाच तर जागेवरच शांत झोपावे किंवा बसावे. चुकून हल्ला केला तर त्वरित डॉक्टरांकडे जावे. असा सल्लाही त्यांनी दिला.
Web Title: Eight Agya Mohol On One Tree
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..