esakal | Vidhan Sabha 2019 : पुण्यात पाच विधानसभा मतदारसंघांतून आठ बंडखोर 
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 : पुण्यात पाच विधानसभा मतदारसंघांतून आठ बंडखोर 

विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांनी कॅंटोन्मेंट, पर्वती, कसबा, वडगाव शेरी आणि खडकवासला या मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केले.

Vidhan Sabha 2019 : पुण्यात पाच विधानसभा मतदारसंघांतून आठ बंडखोर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 
पुणे - विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांनी कॅंटोन्मेंट, पर्वती, कसबा, वडगाव शेरी आणि खडकवासला या मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेचे चार, काँग्रेसचे तीन, तर भाजपच्या एका बंडखोराचा त्यात समावेश आहे. आता पुढील तीन दिवसांत काय घडामोडी घडतील, यावर या बंडखोरांचे भवितव्य ठरेल. बंडखोरीची सर्वाधिक लागण कॅंटोन्मेंट मतदारसंघात झाली आहे.

पाच विधानसभा मतदारसंघात नगरसेवक, माजी नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी आणि भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या उमेदवारांना धावपळ करावी लागणार आहे. उमेदवारी अर्ज सोमवारी (ता. ७) मागे घेता येणार आहेत. 

कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी जावळे, भाजपच्या नगरसेविका कविता वैरागे यांची पती डॉ. भरत वैरागे, काँग्रेसच्या नगरसेविका सुजाता शेट्टी यांचे पती आणि माजी नगरसेवक सदानंद शेट्टी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरले आहेत. या मतदारसंघातील तिन्ही प्रमुख पक्षांत बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्वती विधानसभा मतदासंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले काँग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागूल यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्‍विनी कदम या आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, यासाठी बागूल यांनी प्रयत्न केले होते; परंतु त्यात यश आले नाही. त्यामुळे अखेर त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर कसबा विधानसभा मतदारसंघातून पुण्याच्या पहिल्या महिला महापौर आणि काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच मतदारसंघातून शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी अपक्ष म्हणून या पूर्वीच उमेदवारी अर्ज भरून प्रचारासाठी सुरवात केली आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून शिवसेनेचे नगरसेवक संजय भोसले यांनी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर खडकवासला मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  

बंडखोर उमेदवार
  कॅंटोन्मेंट - पल्लवी जावळे (शिवसेना), सदानंद शेट्टी (काँग्रेस), डॉ. भरत वैरागे (भाजप) 
  कसबा - विशाल धनवडे (शिवसेना), कमल व्यवहारे (काँग्रेस) 
  पर्वती - आबा बागूल (काँग्रेस) 
  वडगाव शेरी - संजय भोसले (शिवसेना) 
  खडकवासला - रमेश कोंडे (शिवसेना) 

रूपाली पाटील यांना पर्याय अमान्य
काँग्रेसचे सहयोगी सदस्य नगरसेवक रवींद्र धंगेकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्षा रूपाली पाटील ठोंबरे यांनी कसब्यातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले होते. पाटील यांना पर्वती, खडकवासला आणि वडगाव शेरीतून लढण्याचा पर्याय पक्षाने दिला होता. परंतु त्यांनी तो नाकारला.