

पान १४ साठी
‘एल-निनो’ स्थितीत रब्बी हंगामासाठी
आपत्कालीन पीक नियोजन
-------------------------
पेरणीची सर्वांत महत्त्वाची अट : योग्य ओलावा बघून रब्बी पिकाची पेरणी करावी. पुरेसा ओलावा + पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज यांचा विचार करून पेरणी करावी. जर चांगला पाऊस झाला व मातीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाला तर शक्य तितक्या लवकर पेरणी पूर्ण करावी. पेरणीला विलंब झाला तर कमी कालावधीच्या पिकांना/वाणांना प्राधान्य द्यावे.
-------------------------
डॉ. आनंद गोरे, डॉ. पपीता गौरखेडे व डॉ. गणेश गायकवाड
----------------------
मराठवाडा विभागातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. जवळपास ८३ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. खरीप हंगामात झालेला पाऊस, त्याचे जमिनीत झालेले संचयन, खरिपातील पिके आणि त्यांची काढणी हे रब्बी हंगामाचे प्रमुख आधार आहेत. कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका या खरीप पिकांबरोबरच रब्बी हंगामात रबी ज्वारी, हरभरा, करडई, गहू, जवस इत्यादी पिके घेतली जातात.
यंदा खरीप हंगामात अनेक भागांत मॉन्सूनच्या पावसाचे उशिरा आगमन, असमान वितरण, जुलैमधील समाधानकारक पावसानंतर पावसाचा दीर्घकालीन खंड, कमी पर्जन्यमान यामुळे खरीप पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामासाठी जमिनीत उपलब्ध असलेला ओलावा, जमिनीची खोली, पिकांची पाण्याची गरज आणि उपलब्ध संरक्षित सिंचन यांचा अत्यंत काटेकोरपणे विचार करून रब्बी पिकांचे नियोजन करणे योग्य ठरेल.
सद्यःस्थिती आणि त्यानुसार मुख्य निर्णय ः
संपूर्ण मराठवाडा विभागात या वर्षी पावसाचे आगमन उशिरा झाले असून जुलै महिन्यातील समाधानकारक पावसानंतर आलेला पावसाचा दीर्घकालीन खंड आणि सर्वसाधारणपणे सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि बऱ्याच क्षेत्रावर सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. अपवाद म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या १६ ते २२ दरम्यान झालेला ३० (६० ते ९०) ते १०० मिमी पाऊस. तरीसुद्धा आजरोजी बहुतेक ठिकाणी रबी पिकांच्यासाठी पेरणी योग्य ओलावा जमिनीत उपलब्ध नाही. अपवाद केवळ जिथे मध्यम ते भारी जमिनी आणि सप्टेंबर महिन्याच्या १६ ते २२ दरम्यान झालेला ६० ते १०० मिमी पाऊस.
रब्बीसाठी अत्यंत महत्त्वाचे...
- जमिनीत पेरणीयोग्य ओलावा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी विशेषतः हलक्या आणि मध्यम जमिनीत पेरणची घाई करू नये.
- हलक्या व मध्यम जमिनीत ओलावा उपलब्ध असेल, तर करडई, रब्बी ज्वारी, चारा पिकांच्या लागवडीचा विचार करावा. मात्र पिकांचे नियमित क्षेत्र कमी करावे. एक ते दोन सिंचन उपलब्ध असल्यास नियमित क्षेत्रावर पेरणी करावी. पशुधनासाठी रब्बी ज्वारीस प्राधान्य द्यावे.
- मध्यम ते भारी आणि खोल काळ्या भारी जमिनीत ओलावा उपलब्ध नसल्यास काही काळ पावसाची वाट पाहावी. थोड्या पावसावर ओलावा उपलब्ध झाल्यास कमी क्षेत्रावर करडई, रब्बी ज्वारी, चारा पिकांचा विचार करावा. एक ते दोन सिंचन उपलब्ध असल्यास नियमित क्षेत्रावर पेरणी करावी. रब्बी ज्वारी, हरभरा, करडई इत्यादी पिकांचा प्रामुख्याने विचार करावा. चाऱ्यासाठी रब्बी ज्वारीस प्राधान्य द्यावे.
- मध्यम ते भारी आणि खोल काळ्या भारी जमिनीत ओलावा उपलब्ध असल्यास, करडई, रब्बी ज्वारी, हरभरा अशा पिकांचा विचार करावा. एक ते दोन सिंचन उपलब्ध असल्यास नियमित क्षेत्रावर पेरणी करावी. हरभरा, रब्बी ज्वारी, करडई इत्यादी पिकांचा विचार करावा.
- पेरणीची तारीख ठरविताना जमिनीतील ओलावाही लक्षात घ्यावा.
- खरीप पिकांची काढणी केल्यानंतर जमिनीतील ओलावा कमी होण्यापूर्वी रब्बी पिकांची पेरणी करावी.
- जमिनीत पेरणीयोग्य ओलावा उपलब्ध नसल्यास पेरणीसाठीची घाई करू नये. हवामान अंदाजानुसार पुढील निर्णय घ्यावा.
- उपलब्ध ओलावा कमी असेल, सिंचन नसेल आणि पुढील काळात पावसाचा अंदाज नसेल, तर रब्बी ज्वारी, करडई आणि चारा पिकांच्या लागवडीवर भर द्यावा. पिकांचे नियमित क्षेत्र कमी करून कमी क्षेत्रावर पेरणी करावी.
--------------------
जमिनीच्या खोलीनुसार कोरडवाहू पीक नियोजन ः
अ) हलकी जमीन ः
हलक्या जमिनीत पाणी धारण करण्याची क्षमता तुलनेने कमी असते. त्यामुळे खरीपातील कमी पाऊस, पावसातील लहान खंडांमुळे किंवा सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्यास पिकावर पाण्याचा ताण येऊ शकतो. परिणामी उत्पादनात घट येण्याची शक्यता असते. त्यामुळे अत्यंत कमी ओलावा असल्यास हलक्या उथळ जमिनीत पेरणीची घाई करू नये. अशा जमिनीत योग्य ओलावा असल्यास चारा पिके, जवस आणि एखादे पाणी देण्याची सोय असल्यास रब्बी ज्वारी, करडई अशी पिके घ्यावीत. कमी कालावधीच्या हरभरा, स्थानिक परिस्थितीनुसार रब्बी ज्वारी, चारा किंवा इतर पर्यायी पिकांचा विचार करावा.
ब) मध्यम खोल जमीन ः मध्यम जमिनीत उपलब्ध ओलावा समाधानकारक असल्यास करडई, हरभरा, रब्बी ज्वारी, स्थानिक परिस्थितीनुसार जवस अशा पिकांचा लागवडीसाठी विचार करावा.
क) मध्यम ते खोल जमीन ः मध्यम खोल काळ्या जमिनीत खरीपानंतर चांगला ओलावा असल्यास रब्बी उत्पादनाची शक्यता तुलनेने चांगली असते. अशावेळी हरभरा, रब्बी ज्वारी आणि करडई या पिकांना प्राधान्य द्यावे. पेरणीची वेळ आणि उपलब्ध ओलाव्यानुसार पीक निवड करावी.
ड) खोल काळी जमीन ः खोल काळ्या जमिनीत ओलावा दीर्घकाळ उपलब्ध राहू शकतो. अशा जमिनीत हरभरा, रब्बी ज्वारी आणि करडई या पिकांना प्राधान्य देता येईल. खात्रीशीर सिंचन असेल तरच गव्हाचे क्षेत्र निश्चित करावे.
--------------
रब्बीची पूर्वतयारी ः
खरीप पीक काढणीनंतर अनावश्यक खोल मशागत करू नये. कारण प्रत्येक मशागतीमुळे जमिनीतील काही प्रमाणात ओलावा कमी होतो. शक्य असल्यास पीक अवशेष जतन करावेत. मागील पीक अवशेष जाळू नयेत, त्याचे मातीवर आच्छादन करावे. बांधांची दुरुस्ती करावी. पाणी वाहून जाणारे मार्ग नियंत्रित करावेत. आवश्यकतेनुसार मृदा-जलसंधारण उपाययोजनांचा अवलंब करावा.
या वर्षी रब्बीमध्ये सर्व साधारणपणे पूर्णपणे कोरडवाहू क्षेत्रासाठी मध्यम ते भारी जमिनीत करडई, रब्बी ज्वारी, हरभरा या पिकांची लागवडीसाठी निवड करावी. खोली व उपलब्ध ओलाव्यानुसार यात बदल करता येतो. मर्यादित संरक्षित सिंचन उपलब्ध असल्यास हरभरा, रब्बी ज्वारी आणि करडई
असे प्राधान्य देता येईल. पाण्याच्या उपलब्धतेनुसार मर्यादित क्षेत्रात गहू पिक हे खात्रीशीर सिंचन असल्यास घेता येईल. स्थानिक परिस्थितीनुसार इतर योग्य पिकांची निवड करता येईल.
...................
- डॉ. आनंद गोरे, ९५८८६४८२४२
(अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.