

पान १० - तातडीने
ॲग्रोमनी
-------------
‘एल निनो’ अन् तूर भावाचा विक्रम
…………
‘एल निनो’चे वर्ष आणि तूर भावाचा विक्रम, हे समीकरण ठरलेले आहे. यापूर्वी २०१५-१६ आणि २०२३-२४ मध्ये बाजाराने याचा अनुभव घेतलेला आहे. यंदा तर देशातील उत्पादन गेल्या दशकातील नीचांकी पातळी गाठण्याची शक्यता आहे. आयात करून मागणी आणि पुरवठ्यातील तफावत भरून काढणे कठीण आहे. त्यामुळे आताच १० हजारांची पातळी गाठलेला तूर बाजार पुढील काळात नवी पातळी गाठण्याची शक्यता आहे.
------
अनिल जाधव
-------
देशातील बाजारात तुरीच्या भावात मागील तीन महिन्यांमध्ये चांगली तेजी आली आहे. तुरीचा भाव ऑगस्टपर्यंत प्रति क्विंटल सात हजार रुपयांच्या आसपास होता. देशातील कमी पाऊस आणि तुरीच्या उत्पादनात घटीचे अंदाज आल्यानंतर अचानक तेजी आली. सप्टेंबर महिन्यात भाव आठ हजारावर पोचला. ऑक्टोबर महिन्यात देशातील सरासरी भाव ९ हजार ३०० रुपये होता आणि आता सरासरी भाव १० हजारांवर पोहोचला आहे. तुरीच्या भावात एवढी तेजी आपण तीन वर्षांनंतर पाहत आहोत. तूर बाजारातील कल पाहिला तर एल निनो आणि तुरीचा विक्रमी भाव, याचा संबंध दिसतो.
एल निनो वर्षात सरकारच्या मुक्त तूर आयात धोरणाला मर्यादा येतात. कारण देशातील उत्पादनात मोठी घट येते आणि निर्यातदार देशांमध्येही तुरीचे उत्पादन घटते. केवळ आयात करून देशातील पुरवठा त्या प्रमाणात वाढवणे शक्य होत नाही. त्यामुळे देशात तुरीच्या भावात एल निनो वर्षात चांगली तेजी दिसते. मागील तीन एल निनो वर्षात असाच ट्रेंड दिसला आहे.
एल निनो आणि तेजीचा संबंध ः
मागील दीड दशकाचा विचार करता सर्वांत कमी उत्पादन झाले होते २०१५-१६ मध्ये. २०१०-११ मध्ये देशात जवळपास २९ लाख टन उत्पादन झाले होते. परंतु २०१५-१६ मधील उत्पादन केवळ २६ लाख टनांवरच स्थिरावले. त्याचे कारण होते एल निनोमुळे कमी झालेला पाऊस. उत्पादनात घट झाल्यानंतर या वर्षात तुरीच्या भावात विक्रमी तेजी आली होती. आधीच्या दोन वर्षांत तुरीचा भाव हमीभावाच्या खाली होता. परंतु ऑगस्ट २०१५ पासून तुरीच्या भावात तेजी आली. ऑक्टोबर २०१५ मध्ये तुरीच्या भावाने विक्रम करत सर्वाधिक ११ हजारांचा भाव गाठला होता. काही बाजारांमध्ये भाव यापेक्षाही अधिक होते. पण देशपातळीवरील सरासरी भाव ११ हजार होता. तुरीच्या भावातील तेजी एक वर्ष चालली. या एका वर्षात तुरीचा भाव १० हजारांच्या आसपास राहीला. पण भाव वाढल्याने सरकारने शेतकऱ्यांना तुरीचे उत्पादन वाढविण्यास प्रोत्साहन दिले. मोफत बियाणे, हमीभावाने खरेदीची हमी दिली. त्यामुळे २०१६-१७ मधील तुरीचे उत्पादन विक्रमी ४८ लाख टनांवर पोहोचले. म्हणजे या दोन वर्षात तूर बाजाराने दोन विक्रम पाहिले, पहिला भावाचा आणि दुसरा उत्पादनाचा.
लागवड वाढल्यानंतर तुरीच्या भावात नरमाई येत गेली. दुसरीकडे आयातही विक्रमी साडेसहा लाख टनांवर पोहोचली. परिणामी, जानेवारी २०१७ मध्ये तुरीचा भाव हमीभावाच्या खाली आला. त्यानंतर पुढील तीन वर्षे तुरीने हमीभावाची पातळीच ओलांडली नाही. या काळात शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले. सरकारने उत्पादन वाढवताना हमीभावाने खरेदीची शाश्वती दिली होती. पण सरकारने खरेदी खूपच कमी केली. शेतकऱ्यांना कमी भावात तूर विकावी लागली. सरकारवर शेतकऱ्यांची नाराजी वाढली होती. त्यामुळे सरकारने त्यानंतर तुरीचे भाव कमी ठेवण्यासाठी देशातील उत्पादन वाढविण्याऐवजी आयातीवर भर दिला. आयातीचा दबाव कायम बाजारावर राहत गेला. भावाची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवले नाही. परिणामी, आतापर्यंत तुरीच्या उत्पादनाचा गेल्या १० वर्षांतील विक्रमी मोडलेला नाही. कोरोना काळात तुरीचा भाव हमीभावापेक्षा काहीसा वाढला होता. पण खरी तेजी आली ती २०२३-२४ मध्ये. कारण होते एल निनो आणि घटलेले उत्पादन. आधीच्या वर्षी उत्पादन २२ टक्क्यांनी घटले होतेच. त्यात एल निनोमुळे उत्पादन केवळ ३४ लाख टनांवर स्थिरावले. एल निनोमुळे म्यानमार आणि आफ्रिकेतील देशांमध्येच उत्पादन कमी राहिले. परिणामी आयातीवर मर्यादा आल्या होत्या. या वर्षात आयात ७ लाख ७१ हजार टन झाली. आयात वाढूनही देशातील उत्पादनात झालेल्या घटीमुळे निर्माण झालेली तफावत भरून निघाली नाही. त्यामुळे तुरीच्या भावात तेजी आली. तेजी २०२४ मध्येही टिकून होती. यावर्षी जून महिन्यात विक्रमी ११ हजार ३०० रुपयांवर सरासरी दरपातळी पोचली. सलग दोन वर्षे तुरीचा भाव हमीभावापेक्षा अधिक होता. त्यामुळे सरकारने मुक्त तूर आयातीचे धोरण स्विकारले. परिणामी देशातील तूर आयात वाढत गेली. २०२४ मध्ये १२ लाख २३ हजार टन आयात झाली. मागील सलग दोन हंगामांमध्ये तूर उत्पादन ३६ लाख टनांच्या आसपासच राहिले. देशातील तूर वापर ४९ लाख टन आहे. पण तेजी आली नाही. कारण आयात वाढत गेली. मागील वर्षी विक्रमी १४ लाख टनांच्या दरम्यान तूर आयात झाली. त्यामुळे जानेवारी २०२५ पासून तुरीचा भाव हमीभावाच्या खाली होता. केवळ सप्टेंबर २०२६ पासून तुरीने हमीभावाची पातळी ओलांडली आहे. त्याचे कारणही यंदाचे एल निनो वर्ष आणि जागतिक पातळीवर घटलेले तुरीचे उत्पादन हे आहे.
म्हणजेच काय, सरकारचे धोरण आयातीला बळ देणारे असल्यामुळे देशातील तूर उत्पादन वाढीवर मर्यादा येत आहेत. शेतकऱ्यांना एखाद्या वर्षी हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळतो. तर पुढील किमान दोन वर्षे हमीभावही मिळत नाही, अशी परिस्थिती असते. तेजीच्या वर्षातही शेतकऱ्यांना तोटाच होत असतो. कारण त्यांचे उत्पादन घटलेले असते. त्यामुळे एखाद्या वर्षात तुरीने भावाचा विक्रमी केला तरी त्याचा फार फायदा होत नाही. घटलेले उत्पादन, वाढलेला महागाई आणि उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीतच असतात.
यंदाचे गणित काय?
देशात यंदाही ‘एल निनो’मुळे पाऊस कमी झालेला आहे. शेतकऱ्यांनी कमी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन तुरीच्या लागवडीत तीन टक्क्यांची वाढ केली. पण महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रमुख तूर उत्पादक राज्यांत पाऊस खूपच कमी आहे. त्यातही तूर उत्पादक पट्ट्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, अहिल्यानगर आणि सोलापूरमध्ये पावसात मोठी तूट राहिली. याचा फटका पिकाला बसत आहे. तसेच तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. यामुळे तुरीच्या उत्पादनात यंदा मोठी घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या हंगामात देशात ३६ लाख टन उत्पादन झाले होते. तर आयात १४ लाख टनांच्या दरम्यान झाली होती. त्यामुळे पुरवठा ५० लाख टन म्हणजेच मागणीच्या पातळीवर पोचला होता. पण यंदाचे गणित वेगळे असणार आहे. त्यामुळेच तुरीच्या भावात मागील तीन महिन्यात चांगली तेजी आली आहे.
व्यापारी आणि उद्योगांच्या मते, यंदा देशातील उत्पादन २५ लाख टनांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे. म्हणजेच उत्पादन २०१५-१६ च्या पातळीच्या दरम्यान राहील. विशेष म्हणजे यंदा तुरीचा शिल्लक साठाही देशात कमी आहे. भारताला निर्यात करणाऱ्या म्यानमार आणि आफ्रिकेतील देशांमध्येही तुरीचे उत्पादन कमीच राहण्याची शक्यता आहे. यंदाची आयात १० ते ११ लाख टनांच्या दरम्यान स्थिरावू शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत. किंवा यंदा विक्रमी आयात झाली तरी देशातील मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत असणार आहे. ही शक्यता लक्षात घेऊनच बाजारात सध्या व्यवहार सुरू आहेत.
---------
इन्फो ः
तेजी टिकेल का?
सध्या देशातील बाजारात तुरीची आवक कमीच आहे. त्यामुळे तुरीचा देशातील सरासरी भाव १० हजारांच्या दरम्यान आहे. भाव गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचलेले असतानाही आवकेत सुधारणा होताना दिसत नाही. यामुळे बाजारात तुरीची उपलब्धता कमी असल्याचे स्पष्ट होते. सध्या उद्योगांच्या पातळीवर तूर पिकाला दुष्काळाचा किती फटका बसला आणि उत्पादनात किती घट होईल, याचे अंदाज काढण्याचे काम सुरु आहे. पावसाचे प्रमाण पाहता यंदा उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी कमी राहील, असा ढोबळ अंदाज आहे. त्यामुळे भावात तेजी आली आहे.
तुरीसाठी पुढील दोन महिन्यांचा काळ खूप महत्त्वाचा असणार आहे. या काळात वातावरण पोषक नसेल तर उत्पादनात आणखी घट येऊ शकते. तुरीची काढणी सुरू झाल्यानंतरच उत्पादनात नेमकी किती घट आली हे कळेल. पण यंदा देशात मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी राहणार आहे. तुरीच्या भावातही चांगली तेजी येण्याची शक्यता आहे. एल निनोच्या वर्षात आयात वाढली तरी देशातील उत्पादनातील घटीमुळे एकूण पुरवठा कमीच राहतो. पुढच्या वर्षी देशातील उत्पादन वाढून वाढत्या आयातीमुळे भाव कमी होतात, हा आजवरचा अनुभव आहे. सरकारकडेही सध्या पाच ते साडे पाच लाख टनांचा तुरीचा साठा असल्याचे सांगितले जात आहे. परंतु सरकार हा साठा लगेच बाजारात आणणार की पुढे भाव आणखी वाढल्यानंतर त्याचा वापर करणार, हे नक्की नाही. पण यंदा सरकारने कितीही प्रयत्न केला तरी मागणी आणि पुरवठ्यातील तफावत आयातीने भरून काढणे कठीण आहे. निर्यातदार देशातही तुरीच्या भावात मागील दोन महिन्यांमध्ये ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. भारतात तूर उत्पादन घटल्यानंतर निर्यातदार देशही तेजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत स्वस्त आयातीचा पर्याय नसतो. त्यामुळे तूर यंदा भावाचा नवा विक्रमी करण्याची शक्यता आहे, असा अंदाज बहुतांशी अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. पण सरकारही भाव कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहे. त्यामुळे बाजारात चढ-उतारही राहतील, असेही अभ्यासकांचे म्हणणे आहे.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.