Election Results : ‘मावळ’च्या पाच ‘बुरजां’वर बारणेंचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल आणि उरण या सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मताधिक्‍य मिळविले. घाटावरील चिंचवड मतदारसंघ, तर घाटाखालील पनवेल मतदारसंघाचा त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा राहिला. केवळ कर्जत या एकमेव मतदारसंघावर प्रभाव ठेवण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले. पुणे जिल्ह्यातील मावळ मुलुख समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघाच्या पाच ‘बुरजां’वर बारणे यांना आपले वर्चस्व राखता आले.​

चिंचवड, पनवेल, पिंपरी, मावळ, उरण मतदारसंघात निर्विवाद मताधिक्य
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल आणि उरण या सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मताधिक्‍य मिळविले. घाटावरील चिंचवड मतदारसंघ, तर घाटाखालील पनवेल मतदारसंघाचा त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा राहिला. केवळ कर्जत या एकमेव मतदारसंघावर प्रभाव ठेवण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले. पुणे जिल्ह्यातील मावळ मुलुख समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघाच्या पाच ‘बुरजां’वर बारणे यांना आपले वर्चस्व राखता आले.

भाजपने पाळला युतीधर्म
पिंपरी -
एकेकाळी राष्ट्रवादीने चिंचवड मतदारसंघातील सर्वच भागांवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. मात्र २०१४ मधील लोकसभा निवडणुकीपासून उतरती कळा लागली. चिंचवडमध्ये ६४ हजार २४३ मताधिक्‍य घेत शिवसेनेचे बारणे यांनी राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावला. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपकडून त्याची पडझड झाली. महापालिका निवडणुकीत हा गड आणखीच खचला. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बारणे यांनी तब्बल ९६ हजार ७५८ मताधिक्‍य मिळविले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या वेळीचे मताधिक्‍य ३२ हजार ५१५ ने वाढले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरून आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली. शेकापचा उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढविली. मात्र त्या वेळी मोदीलाट असल्याने शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे दीड लाखाच्या फरकाने निवडून आले. त्यानंतर जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत विधानसभेची निवडणूक लढविली आणि विजय खेचून आणला. 

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चिंचवडमध्ये युतीचे उमेदवार बारणे यांना एक लाख ३७ हजार ७७२, लक्ष्मण जगताप यांना ७३ हजार ५२९, तर तिसऱ्या क्रमांकावर असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना १४ हजार ५२० मते मिळाली. त्या वेळी बारणे यांना ६४ हजार २४३ मताधिक्‍य चिंचवडमधून मिळाले होते. 

यंदाच्या निवडणुकीत बारणे यांना १,७६,४७५ मते मिळाली. यंदाच्या निवडणुकीत बारणे यांना ९६ हजार ७५८ मतांची आघाडी मिळाली. गेल्या निवडणुकीपेक्षा बारणे त्यांचे मताधिक्‍य ३२ हजार ५१५ ने वाढले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला ही धोक्‍याची घंटा मानली जाते. पवार घराण्यातील तिसरी पिढीने लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात प्रवेश केला. पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीतील सर्व गटतट एकत्र झाले. त्यांनी आक्रमक प्रचार यंत्रणाही राबविली. प्रचारासाठी बाहेरील कार्यकर्त्यांचाही वापर करण्यात आला. शहरात केलेल्या विकासकामांमुळे येथील नागरिक राष्ट्रवादीला साथ देतील, अशी अपेक्षा होती. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि युतीच्या कार्यकर्त्यांना घरोघरी प्रचार केला. यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली. दोन्ही बाजूंनी पैशाचे वाटप झाल्याच्या चर्चाही झाल्या. 
चिंचवड मतदारसंघ हा संमिश्र लोकवस्तीचा आहे. 

मात्र कोणत्याही परिसरात पार्थ पवार यांना मताधिक्‍य मिळालेले नाही. प्रत्येक फेरीमध्ये बारणे यांचे मताधिक्‍य वाढत गेले. गेल्या लोकसभा निवडणुकीत जगताप यांना बारणे यांच्यापेक्षा पिंपळे गुरव, सांगवी परिसरांतून जादा मतदान झाले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत जगताप-बारणे हे दोघेही एकत्र असल्याने युतीच्या मताधिक्‍यात वाढ झाली आहे.

५,०२,७४० - एकूण मतदार
२,८३,००४ - झालेले मतदान 
१,७६,४७५ - श्रीरंग बारणे
७९,७१७ - पार्थ पवार
१७,२०९ - राजाराम पाटील
९६,७५८ - बारणे यांचे मताधिक्‍य

एकजूटीनंतर राष्ट्रवादी अपयशी
वडगाव मावळ -
 मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे विजयी उमेदवार श्रीरंग बारणे यांना मावळ विधानसभा मतदारसंघातून सुमारे २२ हजार मतांची आघाडी मिळाली आहे. तालुक्‍यात महाआघाडी व महायुतीमध्ये सरळ झालेल्या सामन्यात अखेर महायुतीनेच बाजी मारल्याचे या मताधिक्‍यातून स्पष्ट झाले आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी लादलेली पार्थ पवार यांची उमेदवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारली. मतदारांनी मात्र झिडकारली असेच या निकालावरून दिसून येत आहे. दुसरीकडे कार्यकर्त्यांनी ईर्षेने केलेले काम, बारणेंचा गेल्या पाच वर्षातील जनसंपर्क व पंतप्रधान मोदींचा करिष्मा या बाबी युतीच्या यशात महत्त्वाच्या ठरल्या.

मावळ तालुक्‍यातून बारणे यांना एक लाख पाच हजार २७२, आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना ८३ हजार ४४६ तर वंचित आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांना ११ हजार ७३१ मते मिळाली. तालुक्‍यात बारणे व पार्थ यांच्यातच प्रामुख्याने लढत झाली. पार्थ यांच्या विजयासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी ताकद लावली होती. संपूर्ण पवार घराणे प्रचारात उतरले होते. तालुक्‍यातील सर्व गटतट एकत्र झाल्याचे चित्र दिसून आले. तालुक्‍यातील सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले. जाहीर सभा, विविध समाजघटकांचे मेळावे, घोंगडी बैठका, रॅली असा प्रचाराचा झंझावात निर्माण केला. परंतु सक्षम उमेदवार म्हणून पार्थ यांची मतदारांवर शेवटपर्यंत छाप पडू शकली नाही. सोशल मिडीयातून अनेकदा ट्रोल झाल्याने त्यांची नकारात्मक बाजूच मतदारांसमोर आली. त्याचाच परिणाम निकालात दिसून आला. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेस, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, शेकाप, मनसे या सर्वांची साथ मिळाल्याने मावळमधून पार्थ यांना मोठ्या मताधिक्‍याची अपेक्षा होती. परंतु ती सपशेल फोल ठरली.

मतदारांनी बाहेरील उमेदवारी नाकारल्याचेच स्पष्ट झाले. गेल्या निवडणुकीत बारणेंना मिळालेली ४३ हजार मतांची आघाडी निम्म्यावर आणण्यात मात्र आघाडीने यश मिळवले. 

दुसरीकडे बारणे यांची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब झाल्याने त्यांना मावळात प्रचाराला कमी कालावधी मिळाला होता. किंबहूना ते तालुक्‍यात फारसे फिरकलेच नाही. घाटाखालीच त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. परंतु त्यांचा गेल्या पाच वर्षांत तालुक्‍यात चांगला संपर्क राहिला होता. इतर पक्षातील नेत्यांशी व कार्यकर्त्यांशीही त्यांनी सलोख्याचे संबंध राखले होते. ते त्यांच्या कामी आले. बारणे यांच्या अनुपस्थितीत आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली युतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. तळागाळापर्यंत पोचलेल्या पक्ष संघटनेच्या जोरावर त्यांनी बारणे यांची उमेदवारी घरोघरी पोचवली. अजित पवारांच्या कारकिर्दीत घडलेले मावळ गोळीबार प्रकरण व घराणेशाहीचा मुद्दाही त्यांनी नेटाने मतदारांच्या मनावर बिंबवला. सुप्तावस्थेत असलेल्या मोदी लाटेचाही बारणेंना फायदा झाला. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी बारणेंना मत म्हणजेच मोदींना मत अशी भावना ठेवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केले व त्याचे फळ त्यांना मिळाल्याचे निकालात दिसून आले.

विधानसभा निवडणुकीसाठी फायदा
तालुक्‍यात आघाडी व युतीमध्ये सरळ झालेल्या या लढतीकडे आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच पाहिले जात होते. त्यात युतीने मताधिक्‍य मिळविल्याने विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची बाजू भक्कम झाल्याचे मानले जात आहे. विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढले आहे. एकत्रित आघाडीचाही आपण यशस्वीपणे सामना करू शकतो, असा विश्‍वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र पुन्हा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.

१,०५,२७२ - श्रीरंग बारणे
८३,४४५ - पार्थ पवार
११,७३१ - राजाराम पाटील
२१,८२७ - बारणे यांचे मताधिक्‍य 

राष्ट्रवादीची अपेक्षा फोल ठरली
पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक मताधिक्‍य मिळेल, मावळची निवडणूक पार्थ पवार सहजपणे जिंकेल, असा विश्‍वास पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना होता. मात्र, निवडणुकीत या मतदारसंघातले चित्र खूपच वेगळे दिसले. पिंपरीतल्या मतदारांनी पार्थच्या पारड्यात ६१ हजार ९४१ मते टाकली आणि बारणे यांना एक लाख तीन हजार २३५ मते दिली. शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. लोकसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याअगोदर भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांच्यातील मतभेद मिटले. त्यामुळे युतीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीदरम्यान चांगले काम केल्याने बारणे यांचा विजय सहजशक्‍य झाला. 

पिंपरी मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्‍य राहील, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची कल्पना होती. मात्र, प्रत्यक्षात तिथले चित्र वेगळेच राहिले. या वेळेच्या निवडणुकीत बारणे यांना पिंपरीतून ४१ हजार २९४ मतांचे मताधिक्‍य मिळाले असले तरी २०१४ च्या तुलनेत ते १६ हजार २३६ मतांनी कमी झाले आहे. गेल्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारणे यांना ९५ हजार ८८९ आणि लक्ष्मण जगताप यांना ३८ हजार ३५९ मते मिळाली होती. या निवडणुकीत बारणे यांना मिळालेल्या मतांमध्ये वाढ झाली असली, तरी गेल्या वेळेच्या तुलनेत मताधिक्‍य मात्र कमी झाले आहे. या वेळी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील मावळ मतदार संघातून रिंगणात होते. त्यांना पिंपरीतून १७ हजार ७९४ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा फटका युती आणि आघाडीच्या उमेदवारांना बसला आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून या परिसरात झोपडपट्ट्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे याचा फायदा आपल्याला होईल, अशी राष्ट्रवादीला अपेक्षा मात्र, फोल ठरली. बारणे यांना या मतदारसंघात आकुर्डी, निगडी, पिंपरी कॅम्पमध्ये चांगली मते मिळाली. भाजप आणि शिवसेनेत झालेली युती, कार्यकर्त्यांनी केलेला प्रचार, नरेंद्र मोदी फॅक्‍टर यामुळे बारणेंना निवडणुकीत मोठा विजय मिळाला. 

लोकसभेच्या निमित्ताने पवार घराण्यातील तिसरी पिढी असणारे पार्थ पवार मावळ लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. पिंपरी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बऱ्यापैकी वर्चस्व असणारा भाग असल्यामुळे येथील मतदार राष्ट्रवादीला मते देतील आणि पार्थ निवडून येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती पूर्ण झाली नाही.

१,०३,२३५ - श्रीरंग बारणे
६१,९४१ - पार्थ पवार
१७,७९४ - राजाराम पाटील
४१,२९४ - बारणे यांचे मताधिक्‍य 

‘शेकाप’ला आत्मचिंतनाची गरज
पनवेल -
मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांना दुसऱ्या क्रमाकांचे ५४ हजार ६५८ मताधिक्‍य मिळवून देण्यात स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांना यश आले आहे. स्वाभाविकच पनवेल मतदारसंघात आमदार ठाकूर यांचे एक हाती असलेले वर्चस्व अधोरेखित झाले आहे.

शेतकरी कामगार पक्षाला सोडचिठ्ठी देत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून प्रशांत ठाकूर यांच्यासाठी आमदारकीची उमेदवारी मिळवून देण्यात, तसेच त्यांना निवडून आणण्यात यश मिळविले. तेव्हापासून तालुक्‍यातील राजकारणात ठाकूर कुटुंबीयांचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळते. २०१४ मध्ये टोलवसुलीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा पक्ष 
बदलला. तालुक्‍यात अस्तित्वहीन असलेल्या भाजपमध्ये प्रवेश 
करून थेट विधानसभा निवडणूक जिंकण्याची किमया करणाऱ्या 
प्रशांत ठाकूर यांनी शहरी मतदारांवर असलेली आपली पकड आणखी घट्ट केली. त्याचे प्रत्यंतर यंदाच्या लोकसभेच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
रामशेठ ठाकूर यांनी पक्षबदल केल्यानंतर जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या काही जागा वगळता काही युती तसेच काही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मिळवलेला विजय सोडल्यास शेतकरी कामगार पक्षाला सातत्याने अपयश आले. तालुक्‍याचे झपाट्याने होत असलेले शहरीकरण, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे शेकापला आता आत्मचिंतनाची गरज निर्माण झाली आहे.
 शहरी भागातील मतदारांपर्यंत आपली ओळख पोचविण्यात शेकाप कमी पडत असून, ग्रामीण भागातील ताकदही कमी होत चालली असल्याचे चित्र या निवडणुकीच्या निकालावरून दिसून येत आहे.

शेकापमध्ये असंतोष
लोकसभा निकालाचा परिणाम शेतकरी कामगार पक्ष आघाडीच्या पनवेल पालिकेतील संख्याबळावर होण्याची दाट शक्‍यता आहे. निवडणूककाळात शेकापच्या दोन नगरसेविकांच्या पतींनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, नगरसेविकांचा पक्षप्रवेश ही केवळ औपचारिकता पूर्ण करणे बाकी आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्याअगोदर शेकाप नेत्यांनी आत्मचिंतन न केल्यास पालिकेतील आघाडीच्या संख्याबळावर आणखी परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

वंचितची मते लक्षणीय
तालुक्‍यात नामोल्लेखही नसलेल्या वंचित विकास आघाडीच्या राजाराम पाटील यांच्या खात्यात तालुक्‍यातील मतदारांनी तब्बल १५ हजार ६१९ मते टाकली. तालुक्‍यात वंचित विकास फॅक्‍टर चालला कसा, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणुकांची गणिते पाहिली असता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तसेच मनसे उमेदवारांना मागील निवडणुकीत पडलेल्या मतांपेक्षा वंचित आघाडीला मतदारसंघातून दुप्पट मतदान झाल्याचे निदर्शनास आले आहे.

१,६०,३८५ - श्रीरंग बारणे
१,०५,७२७ - पार्थ पवार
१५,९२६ - राजाराम पाटील
५४,६५८ - बारणे यांचे मताधिक्‍य

विधानसभेची गणिते बिघडणार?
नेरळ -
 कर्जत विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना आघाडी मिळाली आहे. मात्र, आघाडीनंतर आघाडी त्रस्त आहे. कारण, या मतदारसंघातील युतीचे नेते शांत असतानाही त्यांना मतदारांनी भरभरून मते दिली. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीची गणिते बिघडविणारे हे निकाल असल्याने कदाचित भाजपसोबत युती राहिल्यास शिवसेनेला या मतदारसंघावर पाणी सोडावे लागेल, अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी कर्जत विधानसभा मतदारसंघात एक लाख ८९ हजार मतदान झाले होते. मतदानापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांच्याविरुद्ध असलेली नाराजी बाजूला सारून शेकापने पार्थ यांच्यासाठी सक्रिय होऊन त्यांची बाजू मजबूत केली. तसेच, राष्ट्रवादीला शेकापनंतर काँग्रेस आणि मनसेची साथ मिळाल्याने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील युतीचे २८ हजारांचे मताधिक्‍य मोडले जाईल, असे वाटत होते. मात्र, २० एप्रिलपासून शिवसेना-भाजप-आरपीआय युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार यंत्रणेत कमतरता दिसली. त्यामुळे पार्थ मोठी आघाडी घेतील अशी परिस्थिती होती. कर्जतकडे शिवसेना, भाजपच्या नेत्यांचे दुर्लक्ष हेरून अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, धनंजय मुंढे, चित्रा वाघ, सुरेश लाड यांनी रान उठविले.

मतदानाच्या दिवशी युतीचे तालुक्‍यातील नेते मतदारांना बाहेर काढण्यासाठी फारसे गंभीर नसल्याचे दिसले. त्यामुळे गत निवडणुकीतील आघाडी पार्थ सहज मोडून काढतील असे वाटत होते. मात्र, शिवसेना आणि भाजपचा मतदार आपल्या मतावर ठाम असतो हे दिसून आले आणि २०१४ पेक्षा तब्बल १० टक्के जास्त मतदान झाले. 

मतमोजणीच्या वेळी कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे पार्थ यांना जेमतेम १८५० मतांची आघाडी मिळाली. सर्व शहरी भागात युतीचे बारणे यांना आघाडी मिळाली. कर्जत, खोपोली, माथेरान येथील मतदार युतीच्या पाठीशी असल्याचे दिसून आले. शेकापला २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ५५ हजार मते मिळाली होती. ती आणि आमदार लाड यांना पडलेली ५७ हजार मते तसेच मनसेची एकगठ्ठा मते पार्थकडे वळविण्यात आघाडीला यश आले नाही. ग्रामीण भागात बीड, पाथरज, कळंब या जिल्हा परिषद गटात पार्थ यांना अपेक्षेप्रमाणे आघाडी मिळाली. आघाडीला दामत, हाळ, पोशिर ग्रामपंचायत, कळंब येथे भरघोस मतदान झाले. पण अन्य भागांत युतीचे मतदार ठाम असल्याचे दिसून आले. कळंब आणि पाथरजमध्ये शेकापच्या अपेक्षेएवढे मतदान झाले नाही. तर नेरळ, सावेळे, उमरोली, खालापूर, वावोशी या गटात युतीने आपल्या मतदारांना कायम राखले. आदिवासी समाजाने अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर केलेला पाठिंबा किती फसवा होता हे स्पष्टपणे दिसले.

उमेदवार हवालदिल
आगामी लोकसभा निवडणुकीत याच आघाड्या आणि युती कायम राहतील अशी स्थिती आहे. मात्र, निकाल अपेक्षित लागल्याने युतीचे संभाव्य उमेदवार हवालदिल आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात कर्जत विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडला जाईल, असा निर्णय झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप कर्जत विधानसभा मतदारसंघात लढेल. युतीच्या धोरणानुसार सलग दोनवेळा पराभव झाल्यास मतदारसंघ अदलाबदल होते.

त्यानुसार युती कायम राहिल्यास कर्जत विधानसभा मतदारसंघात भाजप दावेदार असणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे इच्छुक धास्तावले आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघावर शेकापचा डोळा होता. मात्र, पार्थ यांच्या पराजयाने शेकापला मतदारसंघ सोडला जाण्याबाबत संभ्रम आहे. त्यातही युतीचे मतदार हे ठाम असल्याने कर्जत विधानसभा मतदारसंघ मोठी ताकद लावून किरकोळ आघाडी देऊ शकतो, तर काहीही होऊ शकते याचा अंदाज आघाडीला आला असेल.

८३,९९६ - श्रीरंग बारणे
८५,८४६ - पार्थ पवार
७,९४१ - राजाराम पाटील
१,८५० - पार्थ यांचे मताधिक्‍य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Results Maval Constituency Shrirang Barne Politics