Election Results : उत्सुकता अन्‌ जल्लोष...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मे 2019

सोशल मीडियावर धुमश्‍चक्री
मतमोजणीचे अपडेट्‌स दूरचित्रवाणीपेक्षा यंदा मोबाईलवर फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्‌सॲपवर मिळत होते. त्यात राजकीय मल्लिनाथी करून ते फॉरवर्ड करण्यावर नेटिझन्सचा भर असल्याचे दिसून आले. ‘लाव रे तो व्हिडिओ’पासून ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ आदींसारख्या घोषणांसाठी विविध छायाचित्रे फॉरवर्ड करण्यात येत असल्याचे दिसत होते. तर, बापटांपासून विविध नेत्यांबरोबर घेतलेल्या सेल्फी फेसबुकवर टाकण्यात येते होत्या अन्‌ प्रचारांतील फोटोही पुनःपुन्हा फॉरवर्ड करण्यात येत होते.

पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-उतारांमुळे राजकीय वातावरण भर उन्हात तापले. उन्हाचा कडाका असल्यामुळे पुणेकरांनीही दिवसभर घरात बसूनच निकालांची माहिती घेतली, तर सोशल मीडियामध्ये निकालाच्या तपशिलापेक्षा राजकीय उखाळ्या-पाखाळ्यांनाच भर आला होता.

पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाची मोजणी कोरेगाव पार्कमध्ये भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामांत; तर शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील मतांची मोजणी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरीमध्ये झाली. मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली; तरी सहा वाजल्यापासूनच भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची पावले तिकडे वळत होती. मतमोजणीचे तपशील नोंदवून घेण्यासाठी डायऱ्या आणि कागदपत्रांच्या तयारीने ते आल्याचे दिसत होते. पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, आमदारांनीही आवर्जून मतमोजणी केंद्रांवर हजेरी लावली.

राजकीय हिंदोळ्यांवर कार्यकर्ते स्वार!
मतमोजणी सुरू झाल्यावर पहिल्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. परंतु, नंतर सुळे यांनी आघाडी घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुखावले. शिरूर लोकसभा मतदारसंघातही असेच चित्र होते. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुरवातीपासूनच आघाडी घेतली. ही आघाडी तुटेल, असे शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांना वाटत होते.

परंतु, त्यांची अपेक्षापूर्ती झाली नाही. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सुरवातीला घेतलेली आघाडी कमी होईल, असा दाट विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या समर्थकांना वाटत होता. परंतु, त्यांचा अपेक्षाभंग झाल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रांतून हळूहळू परतण्यास सुरवात केली.

पुण्यातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट हे दुपारपर्यंत घरीच होते, तर काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी मतमोजणी केंद्रावर हजेरी लावली. परंतु, बापट यांची आघाडी वाढू लागल्यावर काँग्रेसचे कार्यकर्ते टप्प्याटप्प्याने बाहेर पडले, तर बापट यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी सकाळी दहा वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागल्याचे दिसत होते.

राजकीय वातावरण बदलले!
शहरात मात्र मतमोजणीमुळे प्रमुख रस्त्यांवर नेहमीपेक्षा कमी गर्दी दिसत होती. घराघरांत दूरचित्रवाणी संच सकाळी सात वाजताच सुरू झाले होते. नागरिकांना निकालाची प्रतीक्षा तीव्रतेने दिसत होती. काही राजकीय पक्षांनी चौकाचौकांत मोठ्या आकाराचे एलईडी डिस्प्ले बोर्ड लावले होते. भर उन्हातही रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक आवर्जून तेथे थांबून निकालाच्या तपशिलांची माहिती घेत होते. पुणे लोकसभा मतदारसंघात बापट आघाडीवर आहेत, हे स्पष्ट होऊ लागले. त्यानंतर रस्त्यावर भाजपचा झेंडा लावलेल्या गाड्यांची संख्या वाढू लागली. कार्यकर्ते भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बापट यांच्या विजयाच्या घोषणा देत फिरू लागले.

भाजपला राष्ट्रीय स्तरावर बहुमत मिळण्याची चिन्हे दिसू लागल्यामुळे युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दुणावला अन्‌ त्यांचा जल्लोष वाढला.

शनिवार पेठ, कसबा पेठ, दगडूशेठ हलवाई गणपती चौक, रविवार पेठ आदी विविध ठिकाणी भाजपचे झेंडे फडकवत आणि ध्वनिवर्धकांवर गाणी लावून बापटसमर्थकांनी विजय साजरा केला. तसेच, बापटसमर्थकांनी बुधवारी रात्रीपासूनच शहरात विविध ठिकाणी बापट यांचे अभिनंदन करणारे फ्लेक्‍स लावले होते.

कांचन कुल यांचे देव-देव
बारामतीमधील भाजपच्या उमेदवार कांचन कुल या पती आमदार राहुल यांच्यासमवेत गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास कोरेगाव पार्कमधील मतमोजणी केंद्रावर निघाल्या. त्या वेळी त्यांनी सुरवातीला सारसबाग, त्यानंतर बाजीराव रस्त्यावर दक्षिणमुखी मारुती आणि त्यानंतर शनिवार पेठेतील ओंकारेश्‍वरचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या कोरेगाव पार्कला रवाना झाल्या.

मतमोजणी केंद्रांबाहेरची गर्दी आटली 
मतमोजणी केंद्राबाहेर एरवी कार्यकर्ते, नागरिकांची मोठी गर्दी असायची. परंतु, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून निकालाचे थेट प्रक्षेपण सुरू होते. त्यातच सोशल मीडियावरूनही निकालांचे तपशील मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड होत होते. त्यामुळे मोबाईलवरच निकालाची माहिती घेण्याचे प्रमाण मोठे होते. बंदोबस्तावरील पोलिसांचाही त्याला अपवाद नव्हता. त्यामुळे यंदा मतमोजणी केंद्रांबाहेर गर्दी नव्हती.

मावळ लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांनी उमेदवार लादला. त्या वेळी ‘मी कोण पार्थ पवार, मी ओळखत नाही,’ असे विधान केले होते. मावळमधील मतदारांनीही पवार घराण्यातील या उमेदवाराला नाकारले आहे. या निवडणुकीत पैशाचा वापर झाला. मात्र, मावळमधील जनतेने या पैशाला झिडकारले, हे निकालावर स्पष्ट झाले. विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहण्याचा मतदारांचा दृष्टिकोन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दिलेली संधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविलेला विश्‍वास, तसेच मतदारसंघातील युतीचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर मी विजयी झालो. 
- श्रीरंग बारणे (मावळ) 

‘‘बारामती लोकसभा मतदार-संघातील मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला, त्या विश्वासाबद्दल मी त्यांच्या समोर नतमस्तक आहे. आगामी पाच वर्षांत देशात अव्वल लोकसभा मतदारसंघ म्हणून बारामतीचा नावलौकिक अधिकाधिक वाढविण्याचा प्रयत्न मी करेन, पक्ष संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याने केलेले काम व मतदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच हे यश मी मिळवू शकले. पाणी, रेल्वे मंत्रालयासह इतरही विषयात विविध कामे मार्गी लावण्यासह हा मतदारसंघ कुपोषणमुक्त व ॲनिमियामुक्त करण्यास प्राधान्य असेल. शिक्षणाला प्राधान्य देत माझ्या मनात जी स्वप्ने आहेत, ती पूर्ण करण्यासाठी मी निश्‍चित काम करेन. 
- सुप्रिया सुळे (बारामती) 

शिरूर लोकसभा मतदार-संघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे विजय मिळाला असून, त्याचे श्रेय जनतेलाच आहे. जातीपातीच्या राजकारणाला आजचा तरुण जुमानत नाही, हेच या विजयातून सिद्ध झाले. जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आणि मला निवडून दिले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मार्गदर्शन, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नियोजन महत्त्वाचे ठरले. या विजयाचा मी नम्रतापूर्व स्वीकार करतो. मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावणे आणि दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करणे यासाठी प्राधान्य देणार आहे. 
- डॉ. अमोल कोल्हे (शिरूर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Results Pune Baramati Shirur Maval Constituency Politics