esakal | निवडणुका ऑगस्टनंतरच शक्य
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणुका

निवडणुका ऑगस्टनंतरच शक्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील रखडलेल्या निवडणुकांमुळे बहुतांश सोसायट्यांमधील पदाधिकारी त्रासले आहेत. त्यामुळे सोसायटीच्या कामकाजावर परिणाम होत आहे. किमान आता तरी गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी सोसायट्यांकडून केली जात आहे. दरम्यान, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे ऑगस्टनंतर निवडणुका होतील, अशी पदाधिकाऱ्यांना अपेक्षा आहे.

अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका त्यांनी स्वत:च घ्याव्यात, असा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. परंतु निवडणुका कशा घ्याव्यात, याबाबत नियमावली नव्हती. सहकार विभागाकडून त्याला विलंब होत असल्यामुळे सोसायट्यांच्या संचालक मंडळाला ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली होती. विधानसभा निवडणुकीनंतर नियमावली जाहीर करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. परंतु ते शक्य झाले नाही.

महाविकास आघाडी सरकारने कृषी कर्जमाफी आणि मार्चनंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणुका पुन्हा ३१ डिसेंबर २०२० पर्यंत पुढे ढकलल्या. नियमावली जाहीर झाल्यानंतर निवडणुका होतील, अशी अपेक्षा होती. परंतु पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे कारण देत राज्य सरकारने ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या. राज्य सरकारकडून या सततच्या मुदतवाढीच्या निर्णयाला अनेक सोसायट्यांमधील पदाधिकारी त्रासले आहेत. संचालकांची मुदत संपूनही कामकाज करावे लागत आहे. तर, दुसरीकडे सोसायटीच्या सेवेसाठी काही सभासदांना निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. परंतु निवडणुकीला मुदतवाढ मिळत असल्यामुळे इच्छुक सभासदांचाही हिरमोड होत आहे.

  • राज्यातील गृहनिर्माण संस्था ः सुमारे एक लाख

  • अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या संस्था ः ८५ हजार

  • पुणे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्था ः १८ हजार

  • अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या संस्था ः १५ हजार

''गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका रखडल्यामुळे कामेही अडली आहेत. बहुतांश सोसायट्यांमध्ये निवडणूक बिनविरोध किंवा केवळ औपचारिकता असते. नागरिकही आता कोरोनाबाबत जागृत असून, लसीचा पहिला किंवा दुसरा डोस झाला आहे. राज्य सरकारने कोरोनाचे नियम पालन करून निवडणुका घ्याव्यात.''

- सुहास पटवर्धन, अध्यक्ष, पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था महासंघ

''काही अन्य राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. तसेच, राज्यात सध्या हॉटेलसह सर्व व्यवहार सुरू आहेत. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये हॉल, मोकळी जागा असते. अशा ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन करून, निवडणूक घेण्यास हरकत नाही.''

- अॅड. एन. पी. मुळे, पदाधिकारी, अजिंक्य समृद्धी गृहरचना सहकारी संस्था, कात्रज.

loading image
go to top