
चार्जिंग अभावी ई-बस बंद; सिंहगडावर नागरिकांचे हाल
किरकटवाडी: शाळांना लागलेली उन्हाळ्याची सुट्टी व रविवारची सुट्टी यामुळे सिंहगडावर आलेल्या पर्यटक व दुर्गप्रेमींना चार्जिंग संपलेल्या ई-बसमुळे मोठा मनःस्ताप सहन करावा लागला आहे. भर उन्हात दोन-तीन तास रांगेत थांबूनही सिंहगडावरुन खाली येण्यासाठी बस मिळत नसल्याने लहान मुले, वृद्ध महिलांसह नागरिकांना पायी चालत खाली येण्याची वेळ आली. त्यामुळे संतप्त झालेले नागरिक वनविभाग व पीएमटी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाच्या विरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत होते.
1 मे 2022 पासून सिंहगड किल्यावर ये-जा करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ई-बस सुरू करण्यात आली आहे. डोणजे येथे खाजगी वाहनांना पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून तेथून ई-बसची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येकी पन्नास रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आला आहे. ई-बस चार्जिंग करण्यासाठी सिंहगड किल्ल्यावरील वाहन तळावर दोन चार्जिंग पॉईंट उभारण्यात आले आहेत.
आज रविवार असल्याने मोठ्याप्रमाणात पर्यटक व दुर्गप्रेमी सिंहगडावर आले होते. तब्बल नव्वद फेऱ्यांमधून सुमारे तीन हजार पेक्षा जास्त नागरिक सिंहगडावर पोहोचले होते, परंतु दुपारनंतर एकूण वीस गाड्यांपैकी बारा गाड्या चार्जिंग अभावी बंद पडल्या होत्या. पाच सीएनजी बस मागविण्यात आल्या परंतु त्यांचेही ब्रेकपॅड गरम होत असल्याने त्यांना थंड होण्यासाठी थांबावे लागत होते. तासंतास रांगेत उभे राहून संतापलेले नागरिक पीएमटीच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत होते. पीएमटीचे कर्मचारी मात्र चार्जिंग अभावी बंद पडलेल्या बसमुळे हतबल झालेले दिसत होते.
"तीन तास रांगेत थांबलो परंतु बस मिळाली नाही. मुलीच्या पायाचे ऑपरेशन झालेले आहे, तरीही पर्याय नसल्याने आम्हाला चालत खाली यावं लागलं आहे." नीता रमेश ठक्कर,महिला ज्येष्ठ नागरिक. "सर्वसामान्य नागरिकांना पन्नास रुपये तिकीट दर परवडत नाही. आमचे चौघांचे दोनशे रुपये गेले. एवढे पैसे देऊनही सेवा नीट मिळत नाही. अक्षरशः वैतागून आम्ही पायी चालत खाली निघालो आहोत." रुपाली रविंद्र तेलंगी,पिंपरी चिंचवड "गडावर जाताना घाटात बस बंद पडली. आम्हाला दुसऱ्या बसमध्ये बसविण्यात आले. चढावरुन दुसरी बसही अचानक मागे यायला लागली होती.आम्ही घाबरून उड्या मारल्या. नागरिकांचा जीव धोक्यात घातला जात आहे." गणेश काळे, थेरगाव.
"सुट्टी असल्याने जवळच्या नातेवाईकांसह सिंहगडावर निघालो होतो. लहान मुलांसह इतर आठ सदस्य बसमधून गेले परंतु गर्दी झाल्याने आम्हा दोघांना बसू दिले नाही. वर काही झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासनाला जमत नाही तर हे बंद करून टाकावं." सारिका अशोक कोतवाल, सिंहगड रोड. "नवीन सुरुवात असल्याने नियोजनात थोडा गोंधळ होत आहे. पार्किंगलाही चार्जिंग ची सोय करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून सर्व सुरळीत होईल." प्रदीप संकपाळ, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी,वनविभाग. "चार्जिंग अभावी दहा ते बारा बस बंद आहेत. एका बसला चार्जिंग होण्यासाठी सुमारे एक तास लागत आहे. स्वारगेट बस डेपोला याबाबत माहिती देण्यात आली असून बस मागविण्यात आल्या आहेत. सर्वांना खाली पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे." अशोक ठोंबरे, सहाय्यक वाहतूक नियंत्रण, पीएमटी, स्वारगेट डेपो.