रांजणगावात ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electronic Manufacturing Cluster in Ranjangaon

Pune : रांजणगावात ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’

नवी दिल्ली : ‘पुणे जिल्ह्यातील रांजणगावच्या औद्योगिक वसाहतीमध्ये २९७.११ एकर क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादनाचे क्लस्टर उभारण्यात येणार आहे.

यासाठी ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. यातून ५००० जणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे,’ अशी घोषणा इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज केली. उद्योग प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावरून महाराष्ट्रात राजकीय आरोप- प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू असताना रांजणगाव येथील प्रकल्पाला केंद्राने मंजूर दिल्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, सेमीकंडक्टर डिझाईनचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी पुण्यातील ‘सी-डॅक’च्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांची आर्थिक आणि औद्योगिक प्रोत्साहनाची ‘फ्यूचर डिझाईन योजना’ राबविली जाणार आहे.

कोरोना संकटानंतर जगभरातील इलेक्ट्रॉनिक उद्योग पुरवठा साखळीसाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून भारताकडे पाहात आहे. त्याअंतर्गत तमिळनाडू, नोएडा (उत्तरप्रदेश), कर्नाटक तसेच तिरुपती येथेही इलेक्ट्रॉनिक हब विकसित झाले आहेत. याअंतर्गत आता महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनाचे केंद्र बनविण्यासाठी हे क्लस्टर महत्त्वाचे ठरेल. यात किमान दोन ते तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असल्याचा दावा राजीव चंद्रशेखर यांनी केला.

वादाचा संदर्भ टाळला

महाराष्ट्रातील राजकीय वादाचा संदर्भ टाळताना राज्यमंत्री चंद्रशेखर यांनी रांजणगावच्या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने पाठपुरावा करत होते, असे आवर्जून नमूद केले. ते म्हणाले, की ‘सर्वत्र स्पर्धा आहे. चीनमधून बाहेर पडून उद्योग भारतात न्यावा की व्हिएतनाममध्ये न्यावा याची स्पर्धा लागली आहे. भारतात आल्यानंतर तमिळनाडू, कर्नाटक, नोएडा, तिरुपती येथे जावे की महाराष्ट्रात जावे यासाठीही स्पर्धा लागली आहे.’

हे राज्यातील पहिलेच क्लस्टर

केंद्राच्या ‘ईएमसी २.०’ (इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर) योजनेअंतर्गत महाराष्ट्रात उभारले जाणारे हे पहिलेच क्लस्टर असेल. रांजणगावच्या क्लस्टरमध्ये ‘आयएफबी रेफ्रिजरेशन लिमिटेड’ या मुख्य कंपनीने (अॅंकर क्लायन्ट) ४० एकर क्षेत्र ताब्यात घेऊन बांधकाम सुरू केले आहे. या कंपनीची ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. येथील २९७.११ एकर क्षेत्रापैकी २०० एकर भूखंडातील जागा इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादन तसेच पुरवठा साखळीच्या पूरक उद्योगांसाठी राखीव असेल.

ही प्रदीर्घ काळाची संधी

राज्याराज्यांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादने, सेमीकंडक्टर उत्पादने ही एक-दोन वर्षांची नव्हे तर प्रदीर्घ काळाची संधी आहे. एक कंपनी एका राज्यात आली किंवा दुसऱ्या राज्यात गेली याबाबत चिंता करण्याचे कारण नाही. या कंपन्यांसाठीचे स्टार्टअप महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सुरू होतील. इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचा १.५ ट्रिलियन डॉलरचा हिस्सा सर्व राज्यांच्या वाट्याला येईल, अशी पुस्ती चंद्रशेखर यांनी जोडली.

एक हजार कोटी रुपयांची फ्यूचर डिझाइन

मंत्री चंद्रशेखर यांनी सांगितले, की ‘‘ सेमीकंडक्टरसाठी २०२१ मध्ये ७६ हजार कोटी रुपयांच्या योजनेची पंतप्रधानांनी घोषणा केली होती. याअंतर्गत सेमीकंडक्टर डिझाईनचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी पुण्यातील ‘सी-डॅक’ संस्थेच्या माध्यमातून या स्टार्टअपला आर्थिक आणि औद्योगिक प्रोत्साहन दिले जाईल. यासाठी ‘सी-डॅक’मार्फत एक हजार कोटी रुपयांची ‘फ्यूचर डिझाईन योजना’ सुरू केली जाईल. या योजनेला दोन महिन्यांपूर्वीच मंजुरी देण्यात आली होती.’’

असे असेल क्लस्टर (प्रमाण कोटी रुपयांत)

  • ४९२.८५ - अपेक्षित खर्च

  • २०७.९८ - केंद्राचे योगदान

  • २८४.८७ - औद्योगिक विकास महामंडळाचा वाटा

  • २००० - अपेक्षित गुंतवणूक

  • ५००० - रोजगार निर्माण होणार